

मिलिंद म्हाडगूत
फोंडा: कला अकादमीच्या ५० व्या कोकणी नाट्य स्पर्धेची स्थिती सध्या ‘किस्मत की हवा कभी नरम कभी गरम’ अशी होताना दिसत आहे. कालच्या ‘देश राग' या नाटकाने उंचावलेल्या अपेक्षा आजच्या गौरी तनय कला संघ, धोणशी, नागेशी या संस्थेने सादर केलेल्या ‘पिकिल्ली पानां तुटिल्ली मना’ या नाटकाने चकनाचूर करून टाकल्या. या स्पर्धेतील हे चौथे पुष्प.
दुर्गादास नायक यांची ही संहिता नेमके काय सांगायला शोधते, हे शेवटपर्यंत कळू शकले नाही. आई, बाबा आणि त्यांची मुले रिमा आणि राघव या चौघा भोवती नाटकाची कथा फिरते. पण यातून हाती काहीच लागत नाही. नाटकाच्या सुरुवातीला एक पुरुष, एका बाईचा हात ओढतो, असे दाखवले आहे. पण नंतर याचा उर्वरित कथेशी कोणताही संदर्भ आलेला दिसला नाही.
रिमाचे लग्न झाले असून तिचा सासरी छळ होतो, असे रिमा आपल्या आईबाबांना व भावाला सांगताना दिसते. त्यात परत आपले जुने घर मोडून राघवला नवे घर बांधायचे असते. पण त्याला त्याच्या बाबाचा विरोध असतो. आपल्या या घरात आठवणी गुंतल्या आहेत, हे बाबा रडत रडत सांगतात. तशी या नाटकातील चारही पात्रे एक तर रडताना दिसत होती नाही, तर ओरडताना. मागच्या आठवणी काढून भावनाप्रधान होणे हा चारही पात्रांचा समान धागा.
अनेक विषय घुसडल्यामुळे नाटकाचा मुख्य विषय काय हेच कळत नव्हते. त्यामुळे नाटकाची अवस्था ‘एक ना धड भारंभार चिंध्या’ अशी झाल्यासारखी वाटत होती. यामुळे लेखक आपल्या संहितेद्वारा नेमका काय? संदेश देऊ पाहत आहे, हे नाटक संपले तरी उमजले नाही. नाटकाच्या शेवटी तर प्रत्येक पात्र मोठे मोठे संवाद बोलताना दिसत होते. लेखक हेच दिग्दर्शक असल्यामुळे सादरीकरणावर मर्यादा येणे साहाजिकच होते. त्यामुळे मग पात्रांना रंगमंचावर इकडून तिकडे फेऱ्या मारायला लावणे, बोलता बोलता आवाज चढवायला लावणे, असे प्रकार करायला लावून दिग्दर्शकाने आपल्या दिग्दर्शनाची ‘झलक’ दाखविली.
शेवटी चारही पात्रांना झाडाभोवती फिरताना दाखवून दिग्दर्शक काय सूचित करू पाहत होते, हे तेच जाणे. आता संहिताच तकलादू असल्यावर पात्रे तरी काय करणार? ती चावी दिलेल्या बाहुल्यासारखी पूर्ण नाटक भर रंगमंचावर फिरताना दिसत होती. ओरडणे व रडणे म्हणजेच अभिनय हे समीकरण मनाशी बांधून तशा प्रकारचा अभिनय करताना बघायला मिळत होती. त्यामुळे एकही पात्र मनात ठसू शकले नाही. मात्र यातल्या काही कलाकारांना चांगली संहिता व कल्पक दिग्दर्शक लाभला असता तर ती आपल्या अभिनयाचे नाणे वाजवू शकली नाही. तांत्रिक बाबीबद्दल बोलायचे, तर रोहन मंगेशकर यांची प्रकाशयोजना ठीक होती.
सत्यवान शिलकर यांचे पार्श्वसंगीतही बरे असले तरी नाटकात संगीताची गरज आहे, असे कधी भासलेच नाही. या नाटकात सर्वात जास्त लक्षात राहिले, ते प्रसाद धोणशिकर यांचे नेपथ्य. दोन अंकात दोन प्रकारचे दर्जेदार नेपथ्य करून त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली. एकंदरीत पूर्णपणे फसलेला प्रयोग असे या नाट्यप्रयोगाचे वर्णन करता येईल, असे प्रयोग करण्यापूर्वी स्पर्धेच्या निकषांचा विचार करणे आवश्यक असते. उगाच खोगीर भरती करता स्पर्धेत दाखल झाल्यास स्पर्धेची मजा किरकिरी करण्या पलीकडे दुसरी काही हाती लागू शकत नाही. या नाट्य प्रयोगाचा हाच संदेश असून सूज्ञास अधिक सांगणे न लगे हेच खरे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.