
मडगाव: ख्यातनाम दिग्दर्शक दिगंबर सिंगबाळ (वय ७१ वर्षे) यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांवरील मान्यवरांनी आदरांजली वाहिली.
१९७५ च्या दरम्यान फुटकळ दर्जाचे फार्स म्हणजे कोकणी नाटक, अशी प्रतिमा बनलेली असताना नाट्य लेखनाच्या क्षेत्रात पुंडलिक नायक तर दिग्दर्शनाच्या क्षेत्रात दिगंबर सिंगबाळ ही दोन नावे कोकणी रंगमंचावर अवतरली आणि त्यांनी कोकणी नाटकांची प्रतिमा बदलत या नाटकांना एका बऱ्याच उंचीवर नेऊन पोहचवले.
या जोडीने कोकणी नाट्यक्षेत्रात एक वेगळीच क्रांती घडवून आणली. १९७८ साली या जोडीने रंगमंचावर आणलेल्या ‘एका जुव्यार जंय’, ‘मर्णकटो’ आणि ‘पावणी’ या नाटकांनी प्रेक्षकांना अगदी भारावून सोडले.
कला आणि नाट्य क्षेत्रातील त्यांचेच जवळचे सहकारी असलेले श्रीधर कामत बांबोळकर यांच्या मते, दिगंबर सिंगबाळ हे चित्रकार असले तरी स्वतंत्र प्रतिभेचे दिग्दर्शक होते. कोकणी नाटकात येण्यापूर्वी महाविद्यालयस्तरीय कोकणी एकांकिका स्पर्धेत त्यांनी रंग, रेषा, प्रकाश आणि नेपथ्य यांचे आधुनिक परिणाम दिले.
‘राखण’, ‘मुक्तताय’ आणि ‘सुरिंग’ या त्यांच्या अप्रतिम अशा कलाकृती होत्या. पुंडलिक नायक यांचेच ‘छप्पन ठिगळी येसवंत’ हे गाजलेले एकपात्री नाटकही त्यांनीच दिग्दर्शित केले होते.
हल्लीच्या काळात ते युवा प्रतिभेचे साहित्यिक आणि नाटककार प्रकाश पर्येकर यांच्यासोबत म्हादई संवर्धन मोहिमेतही सक्रिय झाले होते. म्हादईचे बरेच डॉक्युमेंटेशन त्यांनी केले होते.
गोवा कला महाविद्यालयात ते पेंटिंग विभागातील साहाय्यक प्रोफेसर म्हणून ते निवृत्त झाले. त्यांच्या हाताखालून अनेक चित्रकार तयार झाले तरी त्यांची खरी ओळख होती ती एक निष्णात नाट्यदिग्दर्शक हीच. कोकणी नाटकात मैलाचा दगड म्हणून ज्याकडे पाहिले जाते, त्या पुंडलिक नायक यांच्या गाजलेल्या ‘शबै शबै बहुजन समाज’ या नाटकाचे दिग्दर्शन सिंगबाळ यांनीच केले होते. त्यांच्या नाटक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन राज्य सरकारने २०१३ साली त्यांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन गौरव केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.