Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धेत चुरशीचा अभाव, रसिकांचा अल्‍प प्रतिसाद; स्पर्धकांची संख्याही घटली

Konkani Drama Competition Goa 2025: कला अकादमीची ४९वी कोकणी नाट्यस्पर्धा नुकतीच संपली. यंदा १८ पथकांनी आपल्या कलाकृती सादर केल्या.
Amchan Kul Play Review
Konkani Drama Competition Amchan KulDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: कला अकादमीची ४९वी कोकणी नाट्यस्पर्धा नुकतीच संपली. यंदा १८ पथकांनी आपल्या कलाकृती सादर केल्या. वास्तविक सुरुवातीला २१ स्पर्धक पथके रिंगणात होती. पण शेवटी १८ शिल्लक राहिली. गेल्या वर्षीचा विचार करता यंदा या स्‍पर्धेत तशी चुरस पाहायला मिळाली नाही. नाट्यप्रयोगांचा दर्जाही खालावलेला दिसला.

गेल्या वर्षी रंग खेव, बर्थ ऑफ डेथ, हयवदन, तो आणि दोन पिशे, द ट्रॅप, काळमाया, निमणो पेलो यांसारख्या अभिजात कलाकृती पाहायला मिळाल्या होत्या. तशा कलाकृती यावर्षी पाहायला मिळाल्या नाहीत. गेल्या वर्षीची स्पर्धा गाजविलेल्या काही संस्थांनी यावर्षी भाग न घेतल्याचे दिसून आले. त्‍यामुळे स्‍पर्धक पथकांची संख्‍या घटली. गतसाली २३ पथके सहभागी झाली होती. यंदा संख्‍या पाचने घटली. तसेच १८ नाटकांपैकी पाच-सहा नाटके वगळता इतर नाटकांनी निराशाच केली.

आणखी एक ठळकपणे लक्षात येणारी गोष्ट म्हणजे नव्या संहितांचा अभाव. एक तर जुन्या नाही तर अनुवादित केलेल्या संहिताच अधिक प्रमाणात यंदा दिसून आल्या.

कला अकादमीची स्पर्धा म्‍हणजे काहीतरी नवीन मिळविण्याचे व्यासपीठ असते. चावून-चावून चोथा झालेल्या संहितांचे प्रयोग बघितल्यावर स्पर्धेची नजाकतच लुप्त झाल्यासारखी वाटायला लागते. कला अकादमी खास स्पर्धेसाठी लिहिलेल्या संहितांसाठी बक्षीस ठेवते. पण त्याऐवजी जर फक्त स्पर्धेसाठी लिहिल्या गेलेल्या संहिताचेच प्रयोग व्हायला हवे अशी जर अट घातली तर त्याचा फायदा कोकणी रंगभूमीला होऊ शकेल. सुरवातीला या गोष्टीला प्रतिसाद कमी मिळेल ही. पण भविष्यात त्यातून नवे-नवे आशय हाताळू शकणारे लेखक तयार होतील.

स्पर्धेसाठी जुने किंवा अनुवादित म्हणजे सर्वसाधारण असे दोन गट तयार होतात. त्यामुळे स्पर्धेतील रस कमी व्हायला लागतो. ही दरी जर कमी केली तर स्पर्धेला धार प्राप्त होऊ शकेल.

पण यंदा स्पर्धेसाठी हा निकष धरूनसुद्धा काही ‘हटके’ संहिता पाहायला मिळाल्या नाहीत. गेल्या वर्षी बर्थ ऑफ डेथ, रंग खेव यांसारख्या अफलातून संहिता बघायला मिळाल्या होत्या. तसे काही यंदा झाले नाही. मग यावर्षीची गोळाबेरीज काय, असे विचारल्यास काही कलाकारांच्या अभिनयाकडे तसेच काहींच्या सर्जनशील दिग्दर्शनाकडे बोट दाखवावे लागेल.

‘फुक्या सोवाय’सारखे विशेष दम नसलेले नाटक तारले गेले ते अभिनयाच्या जोरावर. तीच गोष्ट ‘द इन्‍सिडियस’ या नाटकाची. शेफाली नाईक या उदयोन्मुख दिग्दर्शिकेच्या कसबी दिग्दर्शनामुळे या नाटकाचा स्तर उंचावू शकला.

सदोष ध्वनियंत्रणा

राजीव गांधी कला मंदिर येथील सदोष ध्वनियंत्रणा रसभंग करून गेली. प्रेक्षकांना नाटकातील संवाद योग्य प्रकारे ऐकू येत नसल्यामुळे त्यांना प्रयोगाचा आस्वाद चांगल्‍या पद्धतीने घेता आला नाही.

योग्य प्रसिद्धी झालीच नाही!

‘डॅडी’ला झालेली हाऊसफुल्ल गर्दी तसेच ‘फायनल ड्राफ्ट’ व ‘उठ गा देवा’ या नाटकांना लाभलेला चांगला प्रतिसाद वगळता अन्‍य नाटकांना गर्दी झालीच नाही. फोंडा बसस्‍थानक तसेच मोक्‍याच्‍या ठिकाणी नाट्यस्‍पर्धेबाबत माहिती देणारे फलक लावले असते, चांगल्‍या प्रकारे जाहिरात केली असती तर गर्दी निश्‍चितच वाढली असती. आता पुढच्या वर्षी तरी कला अकादमीने योग्य उपाययोजना आखाव्‍यात, अशी अपेक्षा.

Amchan Kul Play Review
Konkani Drama Competition: डॅडी, सकारात्मक दृष्टिकोनाचे वेधक चित्रण; नाट्यसमीक्षा

‘गोमन्‍तक’च्‍या परीक्षणाची स्‍तुती

या नाट्यस्पर्धेचे दै. ‘गोमन्‍तक’मधून प्रसिद्ध होणारे परीक्षण अनेकांच्या पसंतीस उतरल्याचे त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांवरून समजले. अनेक रंगकर्मी, साहित्यिकांबरोबरच सामान्य नाट्यप्रेमीही या परीक्षणाची स्तुती करताना दिसले. मुख्य म्हणजे अशा प्रकारचे परीक्षण प्रसिद्ध करणारे ‘गोमन्‍तक’ हे एकमेव दैनिक असल्यामुळे त्याचे महत्त्व अधिकच अधोरेखित होत होते.

Amchan Kul Play Review
Konkani Drama Competition: सुरिंग, गाजलेल्या संहितेचे परिपूर्ण सादरीकरण; नाट्यसमीक्षा

कला अकादमीचे, रसिकांचे आभार

नाट्यस्पर्धेचे परीक्षण करण्यात सहकार्य दिल्याबद्दल कला अकादमीचे अधिकारी प्रदीप गावकर, संजीव झर्मेकर, विशांत गावडे, फोटोग्राफर अजित कळंगुटकर यांचे मनापासून आभार. तसेच या परीक्षणाची वाट पाहणारे, वेळोवेळी फीड-बॅक देणारे, परीक्षणाबद्दल चर्चा करणारे नाट्यकलाकार, साहित्यिक आणि हजारो नाट्यप्रेमींचेसुद्धा आभार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com