

Akshaye Khanna Dhurandhar reaction: दिग्दर्शक आदित्य धर यांचा 'धुरंधर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट धावतोय. चित्रपटातील प्रत्येक पात्राचे कौतुक होत असले तरी, सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे अभिनेता अक्षय खन्नाची. चित्रपटात 'रेहमान डकैत' ही भूमिका साकारणाऱ्या अक्षयने आपल्या अभिनयाने आणि 'FA9LA' या गाण्यावरील आपल्या खास डान्सने सोशल मीडियावर अक्षरशः वादळ निर्माण केलेय. मात्र, चित्रपटाच्या या अफाट यशानंतरही अक्षय खन्ना प्रसिद्धीच्या झगमगाटापासून आणि कॅमेऱ्यांपासून लांब राहणेच पसंत करतोय.
चित्रपटातील इतर कलाकार यशाचे सेलिब्रेशन करण्यात आणि मुलाखती देण्यात व्यग्र असताना, अक्षयने मात्र अद्याप एकही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, नुकतेच 'धुरंधर'चे कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी अक्षयच्या या रिॲक्शनमागचे गुपित उघड केले.
मुकेश छाब्रा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांनी जेव्हा अक्षयशी संवाद साधला आणि त्याला विचारले की, "तुझा डान्स आणि अभिनय सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला आहे, तुला कसे वाटतेय?" त्यावर अक्षयने अत्यंत संयमाने आणि शांतपणे केवळ "हो, मजा आली" (Haan, mazza aaya) एवढेच उत्तर दिले. अक्षयला या यशाचा अजिबात गर्व नसून तो आपल्या कामात मिळालेल्या समाधानातच सुखी आहे, असे छाब्रा यांनी स्पष्ट केले.
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाने कराचीतील 'ल्यारी' भागातील एका पाकिस्तानी गँगस्टरची, म्हणजेच रेहमान डकैतची भूमिका साकारली आहे. त्याचा पडद्यावरील वावर इतका प्रभावी आहे की, अनेकांनी समाजमाध्यमांवर असा दावा केला की अक्षयच्या परफॉर्मन्सने चित्रपटाचा मुख्य नायक रणवीर सिंगलाही झाकोळून टाकले आहे.
विशेषतः फ्लिपरॅचीच्या 'FA9LA' गाण्यावर त्याने केलेल्या डान्स स्टेप्स सध्या 'ट्रेंड'मध्ये आहेत. अक्षयचा हा 'स्वॅग' आणि त्याचा अभिनय यांमुळेच प्रेक्षक पुन्हा पुन्हा चित्रपटगृहाकडे खेचले जात आहेत.
मुकेश छाब्रा यांनी अक्षयच्या कामाच्या पद्धतीवरही प्रकाश टाकला. अक्षय खन्ना हा असा कलाकार आहे जो कोणाचीही कॉपी करत नाही. तो सेटवर असताना स्वतःच्या एका वेगळ्याच ओरामध्ये असतो. तो आपले सीन अनेक वेळा वाचतो आणि पूर्ण तयारीनिशी सेटवर येतो.
तो कोणाशीही फाफटपसारा न बोलता केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतो, हीच त्याची जादू पडद्यावर दिसून येते, असे छाब्रा म्हणाले. सध्याच्या काळात जिथे कलाकार स्वतःचे ब्रँडिंग करण्यासाठी धडपडत असतात, तिथे अक्षय मात्र अलिबागच्या आपल्या निवासस्थानी 'वास्तू शांती' पूजेत तल्लीन असल्याचे पाहायला मिळाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.