मडगाव : सांगे, सावर्डे, कुडचडे व केपे या चारही खाण पट्ट्यातील मतदारसंघातून यावेळी मोठ्या प्रमाणावर मतदार मतदानास बाहेर पडले असून या चारही मतदारसंघात 80 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. हा वाढीव टक्का सत्ताधारी भाजपच्या विरोधात तर नाही ना असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.
यावेळी सावर्डे मतदारसंघात 86.43 टक्के, सांगेत 86.19 टक्के, केपेत 83.45 टक्के तर कुडचडे येथे 80.29 टक्के मतदान झाले आहे. यातील कुडचडे मतदारसंघ सोडल्यास अन्य तिन्ही मतदारसंघात भाजप काहीशी अडचणीत आल्याचे चित्र असून कुडचडेतही 'सायलंट' मतदार काय करतील ते कळणे कठीण असल्याचे सांगितले जाते. (Mining Belt in Goa News Updates)
या पट्ट्यात खाण अवलंबितांचे आंदोलन चालविणारे गोवा मायनिंग फ्रंटचे निमंत्रक पूती गावकर यांच्या मते, सत्ताधारी भाजप सरकारला धडा शिकविण्यासाठीच हे लोक बाहेर पडले असून खाण बाधितांच्या या विरोधाच्या वणव्यात खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही होरपळून जाणार अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
गावकर म्हणाले, भाजपने केवळ लोकांना आश्वासने देऊन झुलवत ठेवले. बंद पडलेल्या खाणी (Mining) परत सुरू करण्यास त्यांनी काहीही प्रयत्न केले नाही. त्यामुळे लोक सरकार विरोधात प्रचंड नाराज होते. तीच नाराजी लोकांनी मतदानातून व्यक्त केलेली आहे.
सावर्डे मतदारसंघात सर्वात जास्त मतदान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सावर्डेचे काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ स्थानिक नेते त्रिबोलो सोझा याना विचारले असता, हे प्रस्थापितांच्या विरोधात कौल जाण्याचे संकेत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, खाणी भाजपने बंद केल्या आणि पूर्ण दोन टर्म सरकार असतानाही त्या पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे लोक आर्थिक अडचणीत आले. अशा परिस्थितीत लोकांना सरकारचा राग येणे साहजिकच होते.
कुडचडेचे माजी नगराध्यक्ष पिंटी होडारकर यांनीही सरकारच्या विरोधात झालेले जे मतदान अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. कुडचडे येथेही झालेले मतदानही भाजपच्याच विरोधात असून लोक केवळ ते बोलून दाखवत नाहीत एव्हढेच असे ते म्हणाले.
मात्र भाजपचे (BJP) कार्यकर्ते असलेले सावर्डेचे माजी पंच व विद्यमान पंच संजय नाईक यांनी हा दावा फेटाळून लावताना, या चारही मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांची मजबूत आणि शिस्तबद्ध फळी असून हे कार्यकर्ते मतदारांना त्यांच्या घरी जाऊन बाहेर काढत असल्यामुळेच या मतदारसंघात नेहमीच चांगले मतदान होते असे मत त्यांनी मांडले.
सावर्डे बद्दल बोलताना नाईक म्हणाले, सावर्डेत एकतर्फी लढत असून बहुतेक मतदारांनी गणेश गावकर यांनाच मतदान केले आहे. जवळच्या सांगे मतदारसंघातही भाजपचे सुभाष फळदेसाई आणि सावित्री कवळेकर यांच्यात लढत असून काँग्रेसचे प्रसाद गावकर हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले जाण्याची शक्यता आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.