पणजी: गोव्यासारख्या छोट्या राज्यात भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांना प्रचारासाठी पुन्हा पुन्हा यावे लागत आहे. भाजपच्या खात्रीशीर मतदारसंघांमध्ये निर्माण झालेले आव्हान हे त्याचे प्रमुख कारण आहे. पक्षाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना स्वत:लाही ठिकठिकाणी परिस्थितीत सुधारणा आणण्यासाठी उपाय योजावे लागत आहेत. आता प्रत्यक्ष मतदानाला आठ दिवस उरले असताना कालपर्यंत मरगळलेल्या अवस्थेत असलेल्या काँग्रेसने मात्र मुसंडी मारली आहे. त्यामुळे गोव्याच्या निवडणुकीला (Goa Election) रंगतदार वळण आले असून भाजप काँग्रेसमध्ये ‘कांटे की टक्कर’ दिसून येणार आहे. (BJP and Congress in Goa)
हळदोणेसह केपे, मांद्रे, डिचोली, थिवी, शिरोडा, कुंभारजुवे, फोंडा, मुरगाव, म्हापसा, कुठ्ठाळी, दाबोळी, सावर्डे आदी मतदारसंघांत भाजपला कठीण परिस्थितीशी सामना करावा लागत आहे.
‘गोमन्तक’ने आपल्या प्रतिनिधींबरोबर तसेच राजकीय अभ्यासकांबरोबर परिस्थितीचा आढावा घेतला. गेल्या आठवड्यात भाजपची (BJP) स्थिती खूपच मजबूत दिसत होती. परंतु, शुक्रवारी झालेली राहुल गांधी यांची सभा, शिवाय अल्पसंख्याकांचा राग, प्रस्थापितविरोधी प्रतिक्रिया (भाजप गेली दहा वर्षे सत्तेवर आहे) याचा एकत्रित परिणाम निवडणूक परिस्थितीत भर घालत आहे. बेरोजगारीचा प्रश्न सत्ताधारी पक्षाला सतावू लागला आहे. भाजपचे उमेदवार घरोघरी भेट देतात, तेव्हा लोकांचा रोष त्यांना सहन करावा लागत आहे.
हळदोणा मतदारसंघापाठोपाठ दाबोळी मतदारसंघात भाजपचे मंत्री आणि सुकाणू समितीचे सदस्य माविन गुदिन्हो हे ‘डेंजर झोन’मध्ये गेल्याची माहिती मिळते. तेथे कॅप्टन विरीयेतो फर्नांडिस यांनी गेल्या आठवडाभरात माविनविरोधी मोठे आव्हान उभे केले असून ते स्वत:च्याच मतदारसंघात अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांनी शेजारच्या मतदारसंघातही प्रचार करण्यास नकार दिला आहे.
दिगंबर कामतांचे जोशपूर्ण भाषण
काँग्रेसने (Congress) फुटिरांना फेरप्रवेश देण्यास केलेला विरोध व कुडतरीचे आलेक्स रेजिनाल्ड यांची केलेली परतपाठवणी ही पक्षाची प्रतिमा वाढविण्यास उपयोगी ठरली. राहुल गांधी यांच्या साखळी येथील सभेत 68 वर्षीय विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचे आवेशपूर्ण भाषण आणि गिरीश चोडणकर यांची बोलण्याची शैली हे आत्मविश्वासाचे द्योतक आहे.
पंतप्रधान 11 रोजी गोव्यात
भाजपनेही पुढील आठ दिवसांत आपली संपूर्ण ताकद वापरून निसटत चाललेला जनादेश पुन्हा प्राप्त करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. 11 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा भेटीवर येत आहेत.
पंतप्रधान मोदी हे आभासी पद्धतीने 50 हजार नागरिकांशी संवाद साधणार आहेत. उद्या रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंगळवारी गृहमंत्री अमित शहा उत्तर गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.