Goa Election: मडकईत 'राहू मस्त, बिनधास्त'चे वातावरण !

सुदिन यांचा प्रचाराची गरज नसल्याचा दावा : लवू यांचे शर्थीचे प्रयत्न
Lavoo Mamledar and Sudin Dhavalikar
Lavoo Mamledar and Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

सध्या फोंडा तालुक्यातील निवडणुकीचे वातावरण तप्त होत चालले असले तरी मडकईत मात्र ‘राहू मस्त, बिनधास्त’ असे दिसत आहे. फोंडा तालुक्यातील चार मतदारसंघांपैकी सर्वात ‘सुशेगाद’ मतदारसंघ कोणता, असे विचारल्यास मडकईकडे बोट दाखवावे लागेल. इथे फेरफटका मारल्यास कुठे ही निवडणुकीचा दबाव वा धावपळ वा तसा माहोल दिसत नाही. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार तसेच माजी मंत्री सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी तर आपल्याला मडकईत प्रचार करण्याची गरज नसल्याचे जाहीर करून टाकले आहे.

Lavoo Mamledar and Sudin Dhavalikar
भाजपकडून मनोहर पर्रीकरांच्या तत्वांना मूठमाती; उत्पल पर्रीकरांची खंत

मागच्या वेळी सुदिन ढवळीकर हे पंधरा हजार मताधिक्क्याने निवडून आल्यामुळे त्यांचा दावाही खरा ही वाटतो आहे. आणि सांगितल्याप्रमाणे सुदिन मडकई सोडून प्रियोळ, सावर्डे, मांद्रे पेडणे येथील मगोप उमेदवारांचा प्रचार करताना दिसत असून मडकईकतील धुरा त्यांचे कार्यकर्ते सांभाळताहेत. हे पाहता मडकईत ‘मॅच फिक्सिंग’ असल्यासारखे दिसायला लागले आहे. खरेतर हा इतर मतदारसंघातील आमदारांना एक ‘वस्तुपाठच’ म्हणायला हवा. सुदिन ढवळीकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्यात कसे यश मिळविले आहे, याचा अभ्यास इतर आमदारांनी करायला हवा, असे दिसते. इतर आमदार प्रचाराकरिता घाम गाळत असताना सुदिन मात्र ‘राहू मस्त बिनस्धात’ असे वाटत असल्याने हा एवढा मोठा फरक का याची कारणे इतर आमदारांनी शोधून काढायला हवी असे दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे सुदिनांच्या प्रचाराचा ‘रतीब’ हा पाच वर्षे सुरुच असतो. त्यात परत मतदारसंघातील (Constituency) बहुतेक घरात एखादी तरी सरकारी नोकरी दिल्यामुळे या रतीबाचा ‘सुकाळ’ झाल्यासारखा वाटतो. वास्तवीक सुदिन गेली पावणे तीन वर्षे मंत्री नाहीत, एवढेच नव्हे तर सरकारच्या विरोधात ते आवाज उठवीत असतात. एवढे असूनही या काळात त्यांनी मडकईतील काही युवक युवतींना सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्याची माहिती मिळाली आहे. आणि यामुळेच ते हा मतदारसंघ गृहीत धरून चालताना दिसताहेत. आणि याकरिताच फोंडा व प्रियोळमध्ये जशी चुरस दिसून येते तशी मडकईत दिसून येत नाही.

कॉंग्रेसच्या (Congress) दृष्टीने मडकई हा सर्वात उपेक्षित मतदारसंघ. लवूंना कार्यकर्ते जमवतानाही बरीच मेहनत घ्यावी लागते. नाटकाच्या‘क्लायमॅक्स’ची सुरुवात होण्याआधीच माहिती असावी, असे मडकईतील नाट्य बघून वाटायला लागते. या तीन प्रमुख उमेदवारांशिवाय उमेश तेंडूलकर (आप), रवींद्र तळावलीकर (राष्ट्रवादी), प्रेमानंद गावडे (आरजी), हरिश्‍चंद्र नाईक (जय महाभारत), संतोष तारी (गोंयचो स्वाभिमान)हे पाच उमेदवार रिंगणात आहेत. खरेतर आपची उमेदवारी गुरुदास नाईक यांना जाहीर झाली होती. पण त्यांनी रिंगणातून माघार घेतल्याने ही उमेदवारी उमेश तेंडूलकर यांच्या गळ्यात पडली. राष्ट्रवादींने रवींद्र तळावलीकर या काहींशा अपरिचित चेहऱ्याला बोहल्यावर चढविले आहे. आरजीतर्फे प्रेमानंद गावडे हे धडपड करताना दिसताहेत. हे सगळे उमेदवार किती मते घेतील ,हे सांगणे कठीण असले तरी त्याचा अंतिम निकालावर परिणामाची शक्यता कमीच दिसते.

Lavoo Mamledar and Sudin Dhavalikar
कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा देणार नाही : उत्पल पर्रीकर

सुदेश भिंगी ढवळीकरांना देणार शह ?

भाजपतर्फे रिंगणात उतरलेले सुदेश भिंगी हे ही एकेकाळचे सुदिनचे कट्टर समर्थक म्हणून गणले जात असत. पण गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या जि. पं. निवडणुकीत कवळेची उमेदवारी भिंगींऐवजी गणपत नाईक यांना दिल्यामुळे त्यांच्यात ‘अनबन’ झाली. ढवळीकरांना शह देण्यासाठी भिंगीचे प्रयत्न सुरू आहेत.

काँग्रेससमोर आव्हानेच आव्हाने !

काँग्रेसचे उमेदवार लवू मामलेदार यांच्यापुढे आव्हानेच आव्हाने आहेत. सुदिनांमुळेच लवू फोंड्यातही तेही रवी नाईकांसारख्या बलाढ्य उमेदवाराविरूध्द जिंकू शकले हे सर्वज्ञात आहे. त्यांच्यात वितुष्ट आल्यामुळे लवूंनी सुदिनांच्या विरोधात दंड थोपटले आहे. सुदिनांना लवूंचे कच्चे दुवे माहीत असल्याने कशी मात करायची, हे ही त्यांना माहीत असल्याचे दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com