पणजी: भंडारी समाजाचा मुख्यमंत्री देऊ असे सांगत आणि त्यानंतर अमित पालेकर यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करत अरविंद केजरीवालांच्या प्रागतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आम आदमी पक्षाने गोव्यातील राजकारणातला जातीय कोन धारदार असल्याचे दाखवून दिले आहे. इतर पक्षांनी जातीय समीकरणांना उघडपणे उचलून धरलले नसले तरी उमेदवारांच्या निवडीमागे त्याची जात हा देखील महत्त्वाचा निकष दिसतो. (Goa News Update)
भंडारी समाजाचे राजकारणातले महत्त्व जाणले ते मनोहर पर्रीकरांच्या (Manohar Parrikar) काळातल्या भाजपने. पर्रीकरांनी विक्रमी संख्येने या समाजातील नेत्यांना उमेदवारी दिली. अर्थात या समाजातील नेते त्याआधी मगोप व कॉंग्रेसच्या राजकारणातून पुढे येतच होते. मगोपने रवी नाईक, अशोक नाईक साळगावकर, धर्मा चोडणकर यांना पुढे आणले तर कॉंग्रेसमधून सुभाष शिरोडकर, पांडू वासू नाईक यांना प्रकाशझोतात आणले. कालांतराने रवी नाईकही कॉंग्रेसच्या छावणीत गेले. पण, भंडारी समाजाला राजकीय आत्मविश्वास देण्याचे काम भाजपचेच. आजही या पक्षाने आठ उमेदवार या ओबीसी समाजातले दिले आहेत.
अनुसूचित जातीची संख्याही गोव्यात लक्षणीय आहे (12 टक्क्यांच्या आसपास). या समाजाच्या संघटनालाही भाजपानेच राजकीय आयाम दिले. राजकीय क्षेत्रात फारसे परिचित नसलेले अनुसुचित जातीतले तरुण भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजयी झाले. वासुदेव मेंग गावकर, प्रभाकर गावकर, रमेश तवडकर, गणेश गावकर ही नावे अजूनही राजकारणात थोडीफार सक्रीय आहेत.भाजपाने यावेळी प्रियोळ, कुंभारजुवे, सावर्डे, काणकोण तसेच केपेतूनही अनुसूचित समाजातील व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. अन्य पक्षांनी तेवढी तत्परता दाखवलेली नसली तरी या समाजातील काही नेत्यांना आपल्या बाजूने वळवले आहे.
कॉंग्रेसने दोन एसटी उमेदवारांना तिकीट दिलेली आहे. भंडारी समाजाइतके नसले तरी गोव्यात (Goa) क्षत्रीय मराठा समाजाचे प्राबल्य काही मतदारसंघांत आहे. त्या समाजाला संतुष्ट ठेवण्याचा यत्नही पक्षांकडून झालेला असून अर्थातच पाच उमेदवारांसह भाजपनेच यात आघाडी घेतली आहे तर कॉंग्रेसने चार उमेदवार उभे केले आहेत.
भाजपने यावेळी अनुसूचित जातीतल्या दोन उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे. यातील पेडणे हा राखीव मतदारसंघ आहे. मात्र, सारस्वत समाजाची लक्षणीय मते असलेल्या मडगाव या उच्चभ्रू मतदारसंघातूनही भाजपने मनोहर आजगावकर यांना तिकीट दिलेय. यामागे राजकीय हतबलता आहे (आजगावकरांना पेडणेची उमेदवारी नाकारली गेली) की मडगाव शहराच्या बदलत्या लोकसांख्यिक चेहऱ्याचे गणित आहे, हे निकालानंतर स्पष्ट होईल. भाजपचे दोन तर कॉंग्रेस - गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) चार उमेदवार सारस्वत समाजातील आहेत.
ख्रिस्ती उमेदवारांनाही संधी...
भाजपने धार्मिक गणिते जुळवताना 23 टक्के लोकसंख्या असलेल्या ख्रिस्ती धर्मातले 12 उमेदवार रिंगणात आहेत. ख्रिस्ती धर्मांत जातीव्यवस्था नसली तरी धर्मांतरपूर्व जातीचा पगडा काही प्रमाणात असून त्याचे भान पक्षाने राखल्याचे दिसते. कॉंग्रेसतर्फे 17 ख्रिस्तीधर्मीय उमेदवार लढत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.