मडगाव : मडगावात काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत विजयी झाले आहेत. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा कामतांनी दारुण पराभव केला आहे. मोठ्या मताधिक्याने दिगंबर कामतांना विजय मिळाला असला तरीही बाबू आजगावकरांनी कामतांसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं.
मडगाव हा दक्षिण गोव्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक मानला जातो. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) दिगंबर कामत यांनी 12105 मतं मिळवत भाजपच्या शर्मद रायतूरकर यांचा 4176 मतांनी पराभव केला होता. तर 2012 साली दिगंबर कामतांनी भाजपच्या रुपेश महात्मे यांचा 4452 मतांनी पराभव केला होता. कामतांना 2012 मध्ये 12041 मतं मिळाली होती.
यावेळी उपमुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांना दिगंबर कामतांच्या (Digambar Kamat) विरोधात उभे करून भारतीय जनता पक्षाने त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले होते. यापूर्वी कधी केला नसेल एवढा मोठ्या प्रमाणात कामत यांनी प्रचार केला. केवळ 15 दिवसांत बाबू आजगावकर यांनी पूर्ण मडगाव मतदारसंघ पिंजून काढला.
बाबू मूळ मडगावचेच असल्याने त्यांनी प्रचारात चांगलीच धार आणली होती. दिगंबर कामत झोपडपट्टीतील मतदारांच्या आधारे निवडून येत असत असं बोललं जात होतं, पण यावेळी बाबू आजगावकर यांनीही झोपडपट्टीपर्यंत आपली मजल मारली व त्या परिसरातील मते आपल्याकडे झुकतील अशी स्थिती निर्माण केली होती. मात्र इतकं असूनही दिगंबर कामतांनी आपला गड राखत भाजपच्या (BJP) बाबू उर्फ मनोहर आजगावकर यांचा पराभव केला आहे. यावेळी मडगावात 29505 पैकी 22156 मतदान झाले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.