भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस मंगळवारी घाईघाईने गोव्यात येण्यामागे राज्यातील नेत्यांच्या तीन बायकांनी त्यांच्या नाकात आणलेला दम हेच खरे कारण असल्याचे लपून राहत नाही. मायकल लोबो यांच्या पत्नी दलायला, विश्वजित राणे यांच्या दिव्या आणि सर्वात महत्त्वाचे बाबू कवळेकर यांच्या सावित्री या तीनही महिलांनी भाजपच्या नेत्यांना सळोकीपळो करुन सोडले आहे. लक्षात घ्यायला हवे हे तिन्ही नेते बाहेरुन भाजपमध्ये आले आहेत. ते अलिकडेच सत्ताधारी पक्षात येऊन मोठे झाले आहेत. परंतु तिघांचाही आपल्याच नाही, तर शेजारी मतदारसंघावरही प्रचंड प्रभाव आहे. शिवाय दिव्या आणि सावित्री या तर गेली पाच वर्षे या भागात कसून काम करीत आहेत.
सावित्री यांनी तर मी येणारी निवडणूक लढणारच त्यात मी माझ्या मिस्टरांचेही ऐकणार नाही, असे गोव्यात जाहीर करून टाकले आहे. गंमत म्हणजे ‘फॅमिली राज’नको म्हणणारी भाजपा या तिन्ही नेत्यांपुढे सध्या हतबल झालेली दिसत आहे. ‘फॅमिली राज’ विरोधात भूमिका घेतली तर नेते फुटण्याची भीती आणि त्याचे समर्थन केले तर मतदार नाराज होण्याचा धोका या कात्रित सध्या गोव्यातील भाजपा अडकला आहे. त्यामुळे फडणवीस यांना आता वारंवार गोव्यात धाव घ्यावी लागणार, यात शंका नाही.
फडणवीस यांनी गोव्यातील मंत्र्यांच्या पत्नींना तिकीट देण्याची ग्वाही दिलेली नाही. त्यामुळे कुटुंबात एकापेक्षा जास्त व्यक्तींना उमेदवारी मिळणार की नाही. याबाबत हे तीन्ही मंत्री संभ्रमात असून, ते द्विधा मनस्थितीत अडकले आहे. लोबो आणि आरोग्यमंत्री राणे यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे; परंतु त्यांना पत्नींच्या तिकिटाबाबत अजूनतरी कोणतेही आश्वासन मिळाले नाही. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे त्यांची पत्नी सावित्री यांच्या तिकिटाकरिता प्रयत्न करीत असले तरी त्यांनी अद्याप फडणवीसांची भेट घेतली नाही. मात्र आमदार बाबूश मोन्सेरात यांनी फडणवीसांची मुंबईत भेट घेतली होती, पत्नी जेनिफर बरोबरच पुत्र रोहित यांच्यासाठीही तिकीट मिळविण्याची त्यांची धडपड सद्या सुरू आहे.
दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या 22 ऑगस्टला झालेल्या सांगे दौऱ्यात माजी आमदार सुभाष फळदेसाई यांना मिळालेले महत्त्व पाहता सावित्री कवळेकर यांचा उमेदवारीसाठीचा पत्ता मुख्यमंत्र्यांकडूनच कापल्यातचे बोलले जात आहे. फळदेसाई यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत मुख्यमंत्र्यांनी पुढील निवडणूक सांगेतील कार्यकर्त्यांनी फळदेसाई व माजी आमदार वासुदेव मेंग गावकर यांच्या नेतृत्वाखाली लढवावी, असे स्पष्टपणे सांगत फळदेसाई हेच भाजपचे सांगेतील पुढील उमेदवार असल्याचे अधोरेखित केले होते.
गोव्यातील दलायला, दिव्या आणि सर्वात महत्त्वाचे बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री या तीन्ही महिलांची सध्या गोव्यातील राजकारणामध्ये जोरदार चर्चा आहे. सांगेत 'बाहेरचा' कोण आणि 'आतला' कोण हे सांगेकरच ठरवतील. 2022 च्या निवडणुकीत हे सगळे स्पष्ट होईल, असे वक्तव्य भाजप महिला मोर्चाच्या राज्य कार्यकारिणी उपाध्यक्षा सावित्री कवळेकर यांनी करत आपले आगामी इरादे तेव्हाच स्पष्ट केले होते. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांनी सांगे मतदारसंघात भाजप उमेदवारीवर दावा केला होता. मात्र माजी आमदार सुभाष फळदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त सांगेत आलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगेचा विकास करण्यासाठी बाहेरच्या माणसांची गरज नाही, असे म्हणत सावित्री यांना फटकारले होते. सावित्री कवळेकर या केपे मतदारसंघातील असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांना हा टोमणा मारला होता.
गेली दहा वर्षे सावित्री कवळेकर या अत्यंत जोमाने काम करत आहे. त्या जिंकून येण्याची आशा भाजपला वाटते आहे. कवळेकर, लोबो यांनी यापूर्वीच आपल्या पत्नींना अपक्ष म्हणून निवडणूक लढवू द्यावी, अशी विनंती अमित शहा यांच्याकडे केली होती. मात्र त्यांनी त्यांच्या या प्रस्तावाला नकार दिला होता. बाबू कवळेकर यांच्या निष्ठेबद्दल शहा खूष आहेत, आणि भाजपमध्येही त्यांच्याविषयी चांगले वातावरण आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.