Clafacio Dias
Clafacio DiasDainik Gomantak

भाजपात प्रवेश केल्यानेच कुंकळ्ळीचा विकास करता आला: आमदार क्लाफास डायस

क्लाफास डायस यांना अडीच हजार मतांनी निवडून येण्याची खात्री
Published on

मडगाव: 25 कोटी रुपये खर्चून गुडी ते काराळी पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण, कुंकळ्ळीच्या विजेच्या समस्येवर पूर्णपणे तोडगा, कुंकळ्ळीचे भविष्य बदलू शकणारा एनआयटीचा प्रकल्प अशी अनेक विकासकामे आपण फक्त भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यामुळेच करू शकलो अशी कबुली कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस यांनी दिली. तसेच यंदाची निवडणूक मी कुंकळ्ळीतून किमान अडीच हजार मतांची आघाडी घेऊन सहज जिंकेन, अशी खात्री दै. 'गोमन्तक'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.

Clafacio Dias
'मनोहर पर्रीकरांचे सोनेरी गोव्याचे स्वप्न साकार करा'

प्रश्न: तुम्ही काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आला होता, पण नंतर भाजपात गेलात त्याचा तुम्हाला काय फायदा झाला?

उत्तर: फायदाच झाला; पण मला वैयक्तीक नव्हे, माझ्या मतदारसंघाला. मी जेव्हा काँग्रेसमध्ये (Congress) होतो तेव्हा माझी मंजूर करून घेतलेली कामेही तत्कालीन मंत्री विजय सरदेसाई ज्योकी आलेमाव यांच्या सांगण्यावरून अडवून ठेवत असत. त्यामुळे मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला भाजपात जाण्याशिवाय पर्याय नाही हे माझ्या मतदारांनी मला सांगितले आणि त्यांच्या परवानगीनेच मी भाजपात सामील झालो.

प्रश्न: तुम्ही केलेली विकासकामे कोणती?

उत्तर: गुडी ते काराळी या रस्त्यावर अनेक अपघात घडून लोकांचा जीव जात होता. त्यामुळे रस्ता रुंद करावा ही लोकांची कित्येक काळाची मागणी होती. आता 25 कोटी रुपये खर्चून हे काम हातात घेतले आहे. कुंकळ्ळीत अग्निशमन दलाचे केंद्र मी आणले. कमी दाबाच्या वीज समस्येने लोक त्रस्त झाले होते. मी त्यावर तोडगा काढला. कुंकळ्ळी आरोग्य केंद्राचे नूतनीकरण झाले. लवकरच त्याच्या दर्जात वाढ केली जाणार आहे. चांदर येथे रेल्वे ओव्हरब्रिज आला. कुंकळ्ळी इस्पितळ उभारण्यासाठी जागा निश्चित केली आहे. भूमिगत वीज वाहिनीचे काम मार्गी लागणार आहे. मी सत्ताधारी पक्षात असल्यामुळेच चांदरचा राज्य हमरस्ता रद्द झाला. कुंकळ्ळी प्रशासकीय संकुल उभारण्यासाठी फाईल पुढे गेली आहे. अशी अनेक कामे मी केली आहेत.

प्रश्न: भविष्यात आणखी काही प्रकल्प येणार आहेत का?

उत्तर: कुंकळ्ळीत एनआयटी प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पामुळे मतदारसंघातील युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय हमरस्ता बायपास हा प्रकल्प मागची कित्येक वर्षे रखडला होता. तो आता मार्गी लागणार आहे. हा रस्ता झाला तर कुंकळ्ळीकरांच्या नशिबातील वाहतूक कोंडी कायमची संपेल.

प्रश्न: पण तुमचे विरोधक असलेले काँग्रेसचे युरी आलेमाव म्हणतात कुंकळ्ळीचा विकास आपले वडील ज्योकी आलेमाव यांनी मंत्री असताना केला. यावर तुम्ही काय सांगाल?

उत्तर: ज्योकी आलेमाव यांनी केलेला तथाकथित विकास कसा हे कुंकळीकरांना पुरता माहीत आहे. त्यांनी सभागृह बांधले. मात्र, त्याला वातानुकूलित यंत्रणा बसविण्यासाठी सक्षम वीज यंत्रणेची सोय केली नाही. परिणामी तिथे आता ही सोय करणे कठीण झाले आहे. त्यांनी कित्येक कोटी रुपये खर्चून बसविलेले शोभेचे दिवे कधी पेटलेच नाहीत. त्यांच्या कारकिर्दीत बांधलेल्या सिमेंटच्या रस्त्याचे काम सदोष असल्याने हा रस्ता फोडून त्याजागी पुन्हा डांबरी रस्ता बनवावा लागला. अशा तऱ्हेने त्यांनी विकासाच्या नावावर भ्रष्टाचार आणि पैशांचा विध्वंसच केला. त्यांनी या मतदारसंघात फक्त सुडाचे राजकारण केले तेही लोकांना माहीत आहे.

Clafacio Dias
मतविभागणीसाठीच केजरीवाल वारंवार गोव्यात?

प्रश्न: तुम्ही भाजपात गेल्याने तुम्हाला ख्रिश्चन लोक मतदान करणार नाहीत, असे बोलले जाते. हे कितपत खरे आहे?

उत्तर: जिल्हा पंचायत निवडणुकीतही असाच प्रचार केला होता. मात्र दोन ख्रिश्चन उमेदवार असतानाही भाजपची संजना वेळीप ही जिंकून आली. त्यावेळी ख्रिश्चन मतदारांनी (Voters) भाजपला मतदान केले नव्हते का? हे बघा, मी मागची 35 वर्षे राजकारणात आहे. तीन वेळा मी पारोडा पंचायतीचा सरपंच होतो. दोनवेळा मी जिल्हा पंचायतीवर निवडून आलो आहे. त्यानंतर आता आमदार झालो. माझा एकाही निवडणुकीत पराभव झालेला नाही. मला भाजपचा उमेदवार म्हणून मते पडतील तशीच व्यक्ती म्हणूनही पडतील.

प्रश्न: भाजप बंडखोरीचा तुम्हाला त्रास होणार नाही का ?

उत्तर: त्या बंडखोरांना कुणी उभे केले आहे आणि त्यांच्या बरोबर कुणाची माणसे फिरतात याची सर्वांना माहिती आहे. माझी मते फुटून त्याचा फायदा काँग्रेसला व्हावा यासाठीच हा सारा खटाटोप आहे. पण, मतदार हुशार आहेत. अपेक्षांना मत देऊन ते आपले मत वाया घालविणार नाहीत. यावेळी मी किमान अडीज हजारांच्या आघाडीने जिंकून येईन याची मला खात्री आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com