Sant Dnyaneshwar: ज्ञानदेवांच्या रचनेला 'ज्ञानेश्वरी' नाव कसे मिळाले? संत एकनाथ, नामदेव महाराजांचे काय होते योगदान?

Dnyaneshwari History: भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान मराठी जनतेपर्यंत सोप्या भाषेत पोहोचविण्याचा उद्देश होता. म्हणूनच हा ग्रंथ केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही महत्वाचा ठरतो.
Sant Dnyaneshwar
Shri Dnyaneshwari Jayanti Dainik Gomantak
Published on
Updated on

या लेखातील तीन महत्वाचे मुद्दे

१. तुम्हाला इथे ज्ञानेश्वरीचा इतिहास आणि रचना याबद्दल माहिती मिळेल.

२. ज्ञानेश्वरी आणि संत नामदेव, एकनाथ यांच्या योगदानाबद्दल जाणून घेता येईल.

३. ज्ञानेश्वरी हे नाव कसे रूढ झाले याबाबत आढावा वाचायला मिळेल.

ज्ञानेश्वरी हा संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेला ग्रंथ मराठी साहित्यात तसेच वारकरी संप्रदायात अत्यंत महत्वाचा मानला जातो. इ.स. १२९० मध्ये अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानदेवांनी नेवासे येथे हा ग्रंथ लिहिला. भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान मराठी जनतेपर्यंत सोप्या भाषेत पोहोचविण्याचा उद्देश त्यांच्या मागे होता. म्हणूनच हा ग्रंथ केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही महत्वाचा ठरतो.

ज्ञानेश्वरीला ‘भावार्थदीपिका’ असेही म्हटले जाते. यात भगवद्गीतेतील अध्यायांचे साध्या, सरळ आणि लयबद्ध ओवीबद्ध भाष्य आहे. या ग्रंथात सुमारे ९,००० हून अधिक ओव्या आहेत. महाभारतातील युद्धभूमीवरील अर्जुनाचा संभ्रम आणि त्याला भगवान श्रीकृष्णांनी दिलेली शिकवण याचे स्पष्ट आणि जीवनोपयोगी विवेचन यात दिसते.

मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने संस्कृत, हिंदी, कन्नड, तमिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते भाषांतरित छापील ग्रंथ उपलब्ध आहेत.

पार्श्वभूमी

नेवासे गावात ज्ञानेश्वरांनी हा ग्रंथ लिहिला, असे मानले जाते. तेव्हा ते केवळ १६ वर्षांचे असूनही त्यांची तत्त्वज्ञानाची समज आणि भाषेवरची पकड विलक्षण होती. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाला विशेष नाव न देता "केले ज्ञानदेवें गीते, देशीकार लेणे" एवढेच नमूद केले.

संत नामदेव

संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव हे दोघेही वारकरी संप्रदायातील प्रमुख संत होते. संत नामदेवास बालपणापासूनच पांडुरंगाच्या सगुण रूपाचे आणि भक्तीचे वेड, तर संत ज्ञानदेव हे नाथसंप्रदायी योगमार्गाचे निर्गुण भक्तीचे उपासक होते. दोघांनी अनेक तीर्थक्षेत्रांची भ्रमंती केली. संत नामदेव यांच्या कालखंडात या ग्रंथाला ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका असे संबोधले गेले. त्यामुळेच पुढे ही नावे लोकमानसात रूढ झाली. ज्ञानेश्वरीच्या प्रसारात संत नामदेवांचेही योगदान होते.

एकनाथ महाराजांचे योगदान

ज्ञानेश्वरीची आज जी प्रामाणिक आवृत्ती आपल्याकडे आहे ती संत एकनाथ महाराजांच्या कष्टांमुळे. त्यांनी त्या काळातील शेकडो प्रती जमा करून शुद्धीकरण केले आणि सुधारित प्रत तयार केली. ही कृती इतकी महत्त्वाची होती की एकनाथ महाराज मराठी भाषेचे आद्य संपादक म्हणून ओळखले जाऊ लागले.

संशोधन

ज्ञानेश्वरीवर पुढे अनेक संशोधकांनी अभ्यास केला. गणेश बापूजीशास्त्री मालवणकर, गोंधळेकर, जांभेकर, सोहोनी, हर्षे, प्रियोळकर, मंगरूळकर, डांगे, कुलकर्णी यांसारख्या विद्वानांनी जुन्या प्रती शोधून काढल्या आणि सखोल संशोधन केले. त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या विविध आवृत्त्या आणि तिच्या भाषिक वैशिष्ट्यांचा अभ्यास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला.

ज्ञानेश्वरीला वारकरी संप्रदायात महत्वाचे स्थान आहे. पंढरीच्या वाटेवर हरिपाठ, अभंग आणि ज्ञानेश्वरी हीच साधना मानली जाते. या ग्रंथातून भक्ती, ज्ञान आणि कर्म यांचा अद्भुत संगम दिसतो असे वारकरी लोकांचे म्हणणे आहे. लोकांना धर्म, नीती, आत्मज्ञान आणि भक्तीचा सुलभ मार्ग यातून मिळाला असेही भक्तगण मानतात.

Sant Dnyaneshwar
Modak Significance: गणरायाला का प्रिय आहे मोदक? काय सांगते पुराण? वाचा महत्व..

आजचे महत्व

आजही ज्ञानेश्वरी घराघरांत वाचली जाते, कीर्तनांत गायली जाते आणि अभ्यासकांच्या संशोधनाचा विषय ठरते. हा ग्रंथ केवळ धार्मिक पुस्तक नसून जीवन जगण्याची दिशा दाखवणारा मार्गदर्शक आहे. 'भावार्थदीपिका' हे नाव यथार्थ ठरते, कारण ती गीतेचा भावार्थ प्रकाशमान करून सर्वसामान्यांपर्यंत नेते. ज्ञानेश्वरी म्हणजे भक्ती, ज्ञान आणि मराठी भाषेच्या सामर्थ्याचे प्रतीक होय. हा ग्रंथ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग असून भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठेवा राहणार आहे.

Sant Dnyaneshwar
Narsimha Jayanti: हिरण्यकश्यपूच्या वधानंतर 'नृसिंह' अवताराचे काय झाले? भगवान शंकरांना का घ्यावे लागले शक्तिशाली रुप?

FAQs

प्र.१ : ज्ञानेश्वरी ग्रंथ कोणी व केव्हा लिहिला?
उ. : संत ज्ञानेश्वर महाराजांनी इ.स. १२९० मध्ये अवघ्या १६ व्या वर्षी नेवासे येथे हा ग्रंथ लिहिला.

प्र.२ : ज्ञानेश्वरीला ‘भावार्थदीपिका’ का म्हटले जाते?
उ. : कारण यात भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान साध्या, सरळ आणि ओवीबद्ध भाषेत स्पष्ट केले आहे.

प्र.३ : ज्ञानेश्वरीची प्रामाणिक आवृत्ती कोणी तयार केली?
उ. : संत एकनाथ महाराजांनी जुन्या प्रती गोळा करून शुद्धीकरण केले व प्रामाणिक आवृत्ती दिली.

प्र.४ : वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरीचे महत्त्व काय आहे?
उ. : हरिपाठ, अभंगासोबत ज्ञानेश्वरी हीच वारकऱ्यांची साधना मानली जाते; ती भक्ती, ज्ञान आणि कर्माचा संगम दाखवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com