
मुंबई-गोवा हायवेवरील कासुले या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गावात एक सुंदर तळी आहे. या तळीचे रक्षण आणि तिची नीट जोपासना व्हावी अशी तिथल्या ग्रामस्थांची इच्छा होती. गेली अनेक वर्षे येथील युवक त्यासाठी प्रयत्न करीत होते मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. शेवटी या तळीचे अस्तित्व राखण्यासाठी तेथील युवकांनी तिची स्वच्छता करून यंदा तिथे गणपतीच्या आकर्षक मूर्तीची स्थापना केली.
गोमंतकीय कलाकाराने ही आकर्षक मूर्ती तयार केली आहे. पावसात ही मूर्ती भिजून खराब होऊ नये यासाठी त्यावर विशिष्ट पद्धतीने कोटिंग केलं आहे. तळीच्या मध्यभागी तरंगत्या तराफ्यावर बसवलेली ही मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. या मूर्तीचा व्हिडिओ चौफेर झाल्यानंतर गणेश चतुर्थीच्या काळात लोकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भेटी देण्यास सुरुवात केली.
गोव्याच्या विविध भागांतून तसेच सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला या भागांतील भाविकही मोठ्या संख्येने या ठिकाणाला भेट देऊ लागले आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्गापासून या ठिकाणी येणारा रस्ता निमुळता असल्याने वाहतुकीची काही प्रमाणात तिथे कोंडीही होत आहे. स्थानिक युवक या ठिकाणी ट्राफिक व्यवस्था सांभाळत आहेत. दर दिवशी किमान चार ते पाच हजार लोक या ठिकाणी भेट देऊन तळीतील या गणेशासोबत सेल्फी घेताना दिसतात.
या मूर्तीला पाषाणाचा पोत आहे. मूर्तीच्या जवळ रचलेले खांब या मूर्तीची शोभा अधिकच वाढवत आहेत. त्याचप्रमाणे तळीच्या बाजूने असणारी झाडेही या तळीला आकर्षकता देत आहेत. विशिष्ट प्रकारे केलेली तेथील विद्युत रोषणाई रात्रीच्या वेळेला तिथल्या सुंदरतेत भर घालते.
या गणपतीची स्थापना करण्यात पुढाकार घेतलेले स्थानिक युवक संदीप मांद्रेकर माहिती देताना म्हणाले, ‘गेली वीस वर्षे आम्ही या तळीचे रक्षण करण्यासाठी सरकारदरबारी प्रयत्न करीत आहोत. स्थानिक पंचायतीमार्फत याविषयीचा प्रस्तावही आम्ही सरकारला सादर केला आहे. या गोष्टीला जवळजवळ वीस वर्षे होऊन गेली आणि तीन आमदारही बदलून गेले पण कोणीच या नैसर्गिक तळीकडे लक्ष दिले नाही.
त्यामुळे यावर्षी आम्ही गावातील युवकांनी एकत्र येऊन या तळीची स्वच्छता करून तिथे सुंदर आणि आकर्षक अशी भव्य गणेश मूर्ती बसवण्याचा संकल्प केला. त्यासाठी गोव्यातील नामवंत गणेश मूर्तिकाराची निवड करून त्याच्याकडून ही मूर्ती आम्ही तयार करून घेतली आहे. अंदाजे 30 ते 40 हजार रुपयाचा खर्च आम्ही स्वतःच्या खिशातून केला आहे.
गावाबाहेरील काही युवकांनीसुद्धा ही गणेश मूर्ती या ठिकाणी बसवताना आम्हाला सहकार्य केले. अर्थात, यासाठी आम्ही कुणाकडूनही आर्थिक सहकार्याची अपेक्षा केली नाही. आज शेकडो गणेश भक्त या ठिकाणाला भेट देत आहेत. त्यांच्याकडूनही कुठल्याही प्रकारची देणगी आम्ही गोळा करीत नाही. आमच्या गावाला पिण्याची पाण्याची सोय करणाऱ्या या तळीचे रक्षण करण्यासाठी आम्ही गावकरी प्रयत्नरत आहोत.
सरकारने जैवविविधतेचे महत्त्व लक्षात घेऊन, नैसर्गिक स्रोत असलेली ही पाण्याची तळी राखून ठेवण्यासाठी तिचं सुशोभीकरण करावं इतकीच आमची रास्त अपेक्षा आहे. या तळीचे काम हाती घेऊन ते पूर्णत्वास न्यावं आणि या निसर्गरम्य तळीत दरवर्षी श्री गणेशाचं आगमन व्हावं अशी आमची इच्छा आहे.’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.