
गोव्यात अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश चतुर्थानिमित्त मृण्मयी गणपतीचे सार्वजनिकरीत्या पूजन उत्साहाने केले जाते . गोवाभर साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या रूढी आणि परंपरांचे मोठ्या आत्मीयतेनं आणि श्रद्धेनं पालन केले जाते.
एखाद्या कुटुंबात जेव्हा गणेश चतुर्थीनिमित्त रीतीरिवाज निर्माण होतात तेव्हा त्यांचे पालन प्रश्न न विचारता अथवा शंका न घेता पुढील कित्येक पिढ्या करत राहतात. त्यामुळेच बार्देशातल्या शिवोलीसारख्या गावातील चोडणकर कुटुंबीय गणेश चतुर्थीदिवशी मृण्मयी गणपतीचे पूजन करण्याऐवजी त्याचे मातापिता असलेल्या शिवपार्वतीचे पूजन करतात.
कोरगाव येथील शेट्ये कुटुंबात तर मातीच्या चौदा गोळ्यांपासून गणपतीची मूर्ती घरात तयार केली जाते.
काही ठिकाणी एकाच छपराखाली दोन वेगवेगळ्या मृण्मय मूर्ती पुजतात. पैंगीण येथील प्रभुगावकर कुटुंबात गणपतीच्या मूर्तीऐवजी मौसमी रानावनात उपलब्ध पत्री गोळा करून आणली जाते आणि तिचे दीड दिवस पूजन करून विहिरीत विसर्जन केले जाते. पूर्वापार चालत आलेल्या परंपरांचे पालन करणे गणेशचतुर्थीत महत्त्वाचे मानले जाते.
पेडणे ते काणकोणपर्यंत काही कुटुंबांत रक्तवर्णाच्या मृण्मयी गणपती मूर्तीचे पूजन करण्याची परंपरा आहे. त्याठिकाणी असलेले मूर्तिकार दरवर्षी आपल्या गावातल्या कुटुंबांखातर गणपतीच्या मृण्मय मूर्ती तयार करून परंपरेप्रमाणे रक्तवर्णाने रंगवतात.
रक्तवर्ण म्हणजे लाल रंग. गोव्याच्या काव मातीतून मुबलक प्रमाणात लाल रंग उपलब्ध व्हायचा आणि त्याच रंगाचा वापर करून मातीच्या मूर्तीचे रंगकाम केले जायचे.
भारतभर गणपतीच्या रक्त वर्णातल्या मूर्तींची पूजा करण्याची परंपरा अल्प प्रमाणात आहे. अष्टभूज महागणपती, षष्ठभूज गणपती, नृत्य गणपती, श्रीवर गणपती, एकाक्षर गणपती आणि श्री तरुण गणपतीच्या मूर्ती लाल रंगाने रंगवल्या जातात. अशा रक्तवर्णातल्या गणपतीच्या हाती पाश, अंकुश, मोदकपात्र आणि वरमुद्रा दाखवलेली असते.
या गणपतीला रक्तचंदन आणि लाल रंगाची फुले आवडत असल्याने त्याच्या पूजनात या बाबींचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. रक्तवर्णातले गणपती इच्छित मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करण्यात कारणीभूत ठरत असल्याची लोकमानसात धारणा प्रचलित असल्याने अशा मूर्तीचे पूजन करण्याची परंपरा गोव्यातल्या काही कुटुंबांत निर्माण झालेली असून नवी पिढीही तिचे काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करत असलेली पाहायला मिळते.
दरवर्षी कुंभारजुवे या बेटावरची ग्रामदेवी श्रीशांतादुर्गा कुंभारजुवेकरीणीच्या मंदिरात पुजली जाणारी रक्तवर्णीय गणपती मूर्ती सातव्या दिवशीच्या सांगडोत्सवाच्या विसर्जनाचे आकर्षण असून, या मूर्तीला दोन होड्या एकत्र करून निर्माण केलेल्या सांगडात आसनस्थ केले जाते.
पूर्वी कुंभारजुव्यातल्या वाडीये कुटुंबात रक्तवर्णातल्या गणपतीची पूजा करण्याची परंपरा होती. परंतु गावात जेव्हा रोगाची साथ आणि दुष्काळ आला तेव्हा वाडजी कुटुंबाने आपल्या घरात चतुर्थीनिमित्त पुजलेली मूर्ती गाव सोडतेवेळी श्रीशांतादुर्गा कुंभारजुवेकरीणच्या मंदिरात नेऊन ठेवली. तेव्हापासून गावातील शेजारी स्थायिक अन्य कुटुंबांनी ही परंपरा अव्याहतपणे चालू ठेवली.
हा रक्तवर्णीय गणपती आज ग्रामदेवीशी निगडीत असल्याने कुंभारजुवे कालव्यात जेव्हा सांगडोत्सवात ही मूर्ती सांगोडोत्सवात विसर्जनास आणली जाते तेव्हा उपस्थितांची दृष्टी त्या मूर्तीकडे केंद्रित होते. देवीशी निगडीत झालेल्या लाल रंगातल्या गणपतीला सांगोडोत्सवात महत्त्वाचे स्थान लाभलेले आहे.
सांगे तालुयातल्या नेत्रावळी गावात शेकडो वर्षांपासून रक्तवर्णीय मृण्मय गणपतीचे पूजन तेथील प्रभुदेसाई कुटुंबात होत असून, जवळपास दोनशेहून अधिक कुटुंबे गणेश चतुर्थीच्या सणात सहभागी होण्यासाठी शेकडो वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या वास्तूत एकत्रित येऊन आनंदोत्सवात सहभागी होतात.
फोंडा तालुयातल्या सावईवेरे येथील सूर्यराव सरदेसाई यांचा अडीचशेपेक्षा जास्त वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार असणारा राजांगणाने युक्त प्रासाद असून, भाद्रपद चतुर्थीला हे प्रासादतुल्य घर गोव्यात आणि भारत त्याचप्रमाणे परदेशात विखुरलेल्या सरदेसाई कुटुंबीयांच्या मनाने गजबजून उठते. दीड दिवसांच्या गणपतीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी मोठ्या उत्सुकतेनं ही कुटुंबे येथे येतात आणि रक्तवर्णातल्या गणपतीच्या मूर्तीच्या पूजनात एकरूप होतात.
कधीकाळी या कुटुंबातल्या शूरवीर पुरुषोत्तमांनी आपल्या पराक्रमाने रणभूमी गाजवली होती आणि त्यामुळे शौर्याची स्मृती जागवण्याच्या हेतूने रक्तवर्णी गणपती मूर्तीची परंपरा निर्माण झाल्याचे मानले जाते. रक्ताचा रंग लाल असून, शौर्य गाजवताना रक्तपात होत असतो.
शौर्याविषयीची स्मृती चिरंतन राहावी या हेतूने बहुधा रक्तवर्णीय गणपतीच्या मूर्तीचे पूजन करण्याची परंपरा रूढ झाली असावी. पेडण्यातल्या तुये गावातल्या आराबो येथे ज्या ठिकाणी कोलवाळ नदीच्या खाडीचा जलप्रवाह आलेला आहे तेथे मध्ययुगीन इतिहासाच्या काळात दर्यावर्दी व्यापाऱ्यांच्या वास्तव्याने गजबजलेला ऐतिहासिक चिरेबंदी वाडा आहे.
कालांतराने इथल्या वाड्यात देसाई मंडळी स्थायिक झाली आणि वाड्यातल्या जुन्या संचितांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याला प्राधान्य दिले गेले. नोकरी उद्योग धंद्यानिमित्त गोवाभर स्थायिक झालेली देसाई मंडळी या ऐतिहासिक वास्तूत पाच दिवसांसाठी साजरा होणाऱ्या गणेशचतुर्थीच्या उत्सवाप्रीत्यर्थ एकत्र येतात.
दीडशे वर्षांपेक्षा जास्त परंपरा असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण रीतीने सजवलेल्या मखरात रक्तवर्णीय गणपतीच्या मृण्मय मूर्तीची प्रतिष्ठापना करून उत्साहाने पूजन केले जाते. पेडण्यात देसाई कुटुंबीयांची शतकोत्तर वास्तू असून, इथल्या भिंतीवरती कावी कला आणि रंगशैलीने साकारलेल्या चित्रांत रक्तवर्णीय गणपतीच्या मूर्तीचे पूजन जेव्हा केले जाते, तेव्हा त्या वास्तूच्या वैभवात भर पडते.
पेडण्यातल्या म्हाऊस वाड्यावरचे हरी शेटकर दरवर्षी ४३ तर केप्यातील वासुराज करमळकर २१ लाल रंगात रंगवलेल्या मृण्मयी गणपतीच्या मूर्तीची मागणीप्रमाणे निर्मिती करतात. गोव्यातील ही रक्तवर्णीय गणपतीच्या मूर्तीची परंपरा इथल्या वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक संचिताचे दर्शन घडवते. गणेश चतुर्थीचा हा सण देश विदेशातल्या चाकरमान्यांना गावाकडे भाद्रपदात जेव्हा आमंत्रित करतो, तेव्हा विस्मृतीच्या उंबरठ्यावर वसलेल्या या ऐतिहासिक वास्तू माणसांनी गजबजून उठतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.