
पणजी: शनिवारी अनंत चतुदर्शीच्या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, पोलिस स्थानके आणि घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. वाजत-गाजत आणि ढोल-ताशांच्या निनादात मिरवणूक, नृत्य-गायन सादरीकरणात गणेशोत्सव मंडळांनी श्री गणरायला निरोप दिला. यावेळी बालगोपाळांचे डोळे पाणावले.
पणजीतही पणजीकर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘पणजीचा राजा’ असे गणरायाचे नामकरण केले आहे. नव्याने मंडळाची व उत्सव समितीची सूत्रे हाती घेतलेल्या मंडळाने यावर्षी सलग पाच दिवस विविध कार्यक्रम आणि महाप्रसादाचा लाभ भाविकांना दिला. तसेच सर्वधर्म समभाव अशा समितीची निर्मिती केली आहे. त्यात ख्रिश्चन आणि मुस्लिम सदस्यांचाही समावेश आहे. आज तर मुस्लिम बांधवांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
गणेशोत्सवाच्या स्थापनेमुळे गेले दहा-अकरा दिवस सर्वत्र भक्तिमय वातावरण होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या परिसरात दिवसभर गणरायाच्या निरोपाची तयारी सुरू होती.
इतर राज्यांमध्ये ज्याप्रमाणे मानाच्या गणपतीची मिरवणूक सुरू झाल्यानंतर इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक निघते, तसे गोव्यात नाही. राज्यात मडगावमध्ये पिंपपळकट्टा, मुरगावचा राजा, केपे, सांगे येथील मोठ्या गणेशोत्सव मंडळांचे गणपतींची मिरवणूक महत्त्वाची मानली जाते. त्याप्रमाणे ही मंडळे सवाद्य मिरवणुकीने गणरायाला निरोप देतात.
सकाळपासून ‘पणजीच्या राजा’ला निरोप देण्यासाठी तयारी सुरू झाली होती. वाहनावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास मिरवणुकीला सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत ही मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पणजीकर गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांनी भगवा पेहराव, भगवी टोपी असा पेहराव केला होता. शिवाय या मिरवणुकीत मुलींचे लेझीम पथकही सहभागी झाले होते.
साखळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे पूजलेल्या अकरा दिवसीय श्री गणेशमूर्तीचे शनिवारी रात्री वाळवंटी नदीत मोठ्या जल्लोषात विसर्जन करण्यात आले.दुपारी गणेश मंडपात देणगी कुपनांचा निकाल जाहीर झाल्यानंतर संध्याकाळी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात मंडपातून श्रींची मूर्ती सजविलेल्या वाहनात विराजमान करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला.
ही मिरवणूक साखळी बाजारातून बसस्थानकमार्गे गोकुळवाडी, साखळी सरकारी इस्पितळ, पुन्हा गोकुळवाडी-दत्तवाडी मार्गे वाळवंटी नदीकिनारी दाखल झाली
वाळपई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अकरा दिवशीय श्री गणरायाला शनिवारी उत्साही वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते. करमळी-सत्तरी येथील श्री सातेरी दिंडी पथक विशेष आकर्षण ठरले. ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या गजरात लहान मुले, महिला, युवक तसेच मंडळाचे पदाधिकारी दिंडीच्या तालावर नाचत होते.
गेल्या अकरा दिवसांत मंडळातर्फे विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दहाव्या दिवशी स्थानिक आमदार व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या उपस्थितीत शैक्षणिक गौरव सोहळा झाला. यावेळी देणगी कुपनांचा निकालही जाहीर करण्यात आला. मंडळाचे यंदा चाळीसावे वर्ष असल्याने विशेष सांस्कृतिक उपक्रम घेण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.