Matoli: पोर्तुगिजांनी मंदिरांची तोडफोड सुरु केली, काही लोक वेंगुर्ल्यात जाऊन स्थायिक झाले; अंत्रुजातील माटोळी वैभव

Matoli decoration Goa: माटोळीमध्ये विविध चित्रे साकारण्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतीबद्दल ज्ञान असणे गरजेचे असते. दोन दिवसांनंतर माटोळीचे रंगरूपच जणू बदलू लागते.
Matoli decoration Goa
Matoli decoration GoaDainik Gomantak
Published on
Updated on

माटोळीमध्ये महत्त्वाचे स्थान लाभलेल्या कांगला, कवनाळा, माट्टुला, घागरी, कुडेफळा, शेरवाडा, आंब्याची पाने यांसारख्या घटकांचा त्यांच्या रंगानुसार कमी जास्त प्रमाणात वापर केल्याने माटोळी किती मनमोहक दिसू शकते याचा प्रत्यय फोंडा तालुक्यातील कल्पकतेने सजवलेल्या माटोळीकडे बघितल्यावर येतो. शेरवाडाचा पांढरा शुभ्र रंग, घागरी, तसेच कुडेफळा आणि कवनाळा यांच्या पिवळ्या, केशरी रंगामुळे हिरव्या गर्द पानांनी सजलेल्या माटोळीला रंगीत साज चढतो.

माटोळीमध्ये विविध चित्रे साकारण्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतीबद्दल ज्ञान असणे गरजेचे असते. दोन दिवसांनंतर माटोळीचे रंगरूपच जणू बदलू लागते. त्यामुळे गणेशचतुर्थीमध्ये सर्व दिवस माटोळी ताजीतवानी कशी राहील याचाही विचार करावा लागतो.

काही फळे एक दोन दिवसानंतर गळून पडायला लागतात तर काहींचा रंग पिकल्यानंतर बदलतो. माटोळी बांधताना हिरवी असलेली कांगला पिकल्यानंतर त्याच्या बाहेरील कवच फुटते आणि आतील लाल रंगाच्या बिया दृष्टीस पडतात.

त्याचप्रमाणे बाहेरून पिवळ्या रंगाची असलेले कुडेफळा पिकल्यानंतर उघडतात आणि आतील लाल रंग दृष्टीस पडतो. त्याचप्रमाणे कवनाळा सुरुवातीला हिरवी असतात नंतर लाल होतात. त्यामुळे यांसारख्या घटकांचा वापर नाटोळेच्या एका बाजूने केला जातो तर आपल्याला हवी तशी कलाकृती निर्माण करण्यासाठी विशेष वृक्ष वनस्पतींचा वापर केला जातो.

पूर्वी गणपतीच्या माथ्यावर जी चौकोनी आकाराची माटोळी बांधली जायची ती स्वतः घरीच बनवली जायची. बांबूचे लहान तुकडे करून अतिशय कल्पकतेने केवणीचे दोर वापरून ती बांधली जायची.

दरवर्षी त्यात एक तरी बांबूची नवीन काठी बांधावी अशी लोकमानसाची धारणा होती. आज माटोळीतून आपली कला आणि वेगवेगळ्या वनस्पतींबद्दल पारंपरिक ज्ञानाचा प्रसार करणारे गावातील कलाकार देवाच्या खोलीत पताका लावण्याऐवजी भव्य माटोळी बांधतात. त्यामुळे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना, प्रेक्षकांना मान वर करून काही क्षण माटोळीत दर्शविलेले चित्र जणू वेडच लावतात.

गोव्यात गणेश चतुर्थीच्या सणात माटोळी ही महत्त्वाची परंपरा इथल्या कष्टकरी जातीजमातीतल्या निसर्ग आणि पर्यावरणाचे पूर्वापार संस्कार दर्शन घडवत असते.

एकेकाळी गोव्यातल्या जंगलात जी वृक्षवनस्पतीची वैविध्यपूर्ण संपदा आढळते त्याच्या समृद्धीचा आविष्कार माटोळीतून घडवला जायचा.

गेल्या दशकभरापूर्वी गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती खात्यातर्फे माटोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते आणि त्यात सुरुवातीपासून अंत्रुज महालातली हिरव्यागार कुळागरात आणि शेताभाताच्या परिसरात राहणारी कुटुंबे सहभागी होत असून, दरवर्षी माटोळीची सजावट करताना आपल्या कल्पकतेनं आणि सृजनशीलतेनं या परंपरेला नवे आयाम देण्याचे काम करत आलेले आहे. ही परंपरा वनस्पती ज्ञानाचा शोध घेण्यासाठी येणाऱ्या संशोधक, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींसाठी एक मोठा खजिनाच ठरलेला आहे.

दत्ता नाईक, तानाजी गावडे, श्रीकांत सतरकर, तृप्ती पालकर, विशांत गावडे ही मंडळी गणेश चतुर्थीच्या सणात आपल्या घरात गणपतीच्या मृण्मय मूर्तीच्या माथ्यावरती माटोळीची आरास अधिकाधिक आकर्षक, उद्बोधक करण्याकडे विशेष लक्ष देत आलेली आहेत. आजतागायत त्यांनी आपले हे कार्य माटोळीद्वारे चालवलेले आहे.

प्रियोळ येथील गावठण येथे दत्ता नाईक यांनी आपल्या माटोळी सजावटीतून नवदुर्गा गावशीकान्न देवीची प्रतिमा साकारलेली आहे. आज जरी देवी मडकईची ग्रामदेवता असली तरी पूर्वी तिचे पूजन देवी दुर्गा म्हणून केले जायचे.

जेव्हा पोर्तुगिजांनी मंदिरांची तोडफोड करण्याचे षड्यंत्र आरंभले व येथे स्थायिक असलेल्या जनतेचा छळ करू लागले तेव्हा गावशी येथील काही लोक महाराष्ट्रातील वेंगुर्ला येथे जाऊन स्थायिक झाले तर काही लोक गोव्यातील मडकई येथे पळून आले. जुवारी नदीच्या पैलतीरी वसलेल्या मडकई गावातील तळेखोल पारांपई येथे आलेल्या भाविकांनी श्रीनवदुर्गा ‘गावशीकान्न’ देवीची मुख्य मूर्ती आपल्यासोबत आणली आणि तिची स्थापना केली.

कधीकाळी ही देवी गावशी येथे निसर्गाच्या सांनिध्यात प्रकट झाली तेव्हा ती कष्टकरी समाजातील महिलेच्या रूपात पारंपरिक वस्त्र परिधान करून उभी होती अशी कथा लोकमानसात प्रचलित आहे. वस्त्र परिधान करण्याच्या या विशेष प्रकाराला ‘देठली’ असे म्हणतात. या देवीने आपल्या उजव्या खांद्याकडे पुढच्या दिशेने एक गाठ बांधलेली आहे.

एखाद्या महिलेचा चेहरा आपण वृक्ष वनस्पतीच्या मदतीने कसा दर्शवू शकतो असा विचार केल्यावर कित्येक कल्पना आपल्या समोर येतात. परंतु मुखावरचे हावभाव अतिशय प्रभावीपणे दर्शवण्यासाठी घोसाळ्याच्या आतील घटकाचा उपयोग करण्याची कल्पना त्यांना सुचली आणि त्यातूनच देवीचे शरीर साकारले.

इंग्रजीमध्ये त्याला ‘स्पाँज गोर्ड’ असे म्हणतात. कारण त्याच्या आतील भाग मऊ असून खरखरीत असतो. त्यामुळे आंघोळीसाठी ब्रश म्हणून त्याचा पूर्वी उपयोग केला जायचा. वस्त्र परिधान करण्यासाठी घनदाट जंगलात आढळणाऱ्या ‘घायपात’ किंवा ‘रेड्या अणस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृक्षाच्या पानांचा वापर त्यांनी केला.

तानाजी गावडे यांनी साकारलेल्या हनुमानाची भव्य प्रतिमा तर विचारांपलीकडचीच. सुपारी सुकवल्यानंतर बाहेरची साल बाजूला करून त्याची बी उपयोगात आणली जाते. माटोळी मधील हनुमानाला त्वचेचा रंग देण्यासाठी त्यांनी या सालींचा उपयोग केलेला आहे.

त्यामुळे कोणताही रासायनिक रंग न वापरता बरोबर शरीराचा रंग त्याला प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर वस्त्र बनवण्यासाठी त्यांनी भाताच्या कणसांबरोबर इतर पुष्प वनस्पतींचा वापर विचारपूर्वक वापर केलेला आहे. हनुमानाच्या हातापायातील अलंकार बनवण्यासाठी ताज्या सुपारीचीच माळ गोलाकार गुंतलेली आहे.

Matoli decoration Goa
Matoli: 'यंदाच्या वर्षी नवीन काय'? दुर्मिळ फळांची-वनस्पतींची, औषधी गुणधर्मांची लाखमोलाची 'माटोळी'

विशांत गावडे यांनी आपल्या माटोळीत उंदरावर बसलेला गणपती दर्शविलेला आहे. गणपतीचे शरीर बनवण्यासाठी त्यांनी रानभाजीच्या फुलांचा उपयोग केलेला आहे. कुर्डू नावाची भाजी आपल्या परिसरात व माळरानात भरपूर प्रमाणात उगवते. त्याला या दिवसात भरभरून पांढऱ्या रंगाची फुले येतात.

ही फुले व्यवस्थित बांधून गणपतीचे शरीर बनवलेले आहे. त्याचबरोबर उंदीर बनवण्यासाठी त्यांनी एका औषधी गुणधर्म लाभलेल्या परंतु कमी प्रमाणात आढळणाऱ्या फळाचा उपयोग केलेला आहे. त्याला गजरे असे म्हणतात.

Matoli decoration Goa
Goa Matoli Vendors: माटोळी बाजारात 'सोपो'चा गोंधळ! जबरदस्‍तीने वसुली, विक्रेत्यांनी सरकारच्‍या नावाने मोडली बोटे

सागवानाच्या फुलांचा वापर करूनसुद्धा हुबेहूब गणपतीची प्रतिमा बनवता येते हे कुर्टी येथील श्रीकांत सतरकर यांनी आपल्या लक्षात आणून दिलेले आहे. गणपतीचे शरीर आणि त्याचे मुख या फुलापासून बनवलेले आहे. तर त्याला परिधान केलेले वस्त्र त्यांनी भरली माडाच्या घटकांचा वापर करून बनवलेले आहे. सावईवेरे येथील तृप्ती पालकर हिने भगवान श्रीविष्णूची प्रतिमा साकारलेली आहे. त्याच्या हातातील शंख, चक्र, गदा आणि पद्म दर्शविण्यासाठी तिने वेगवेगळ्या फळांचा उपयोग केलेला आहे.

आज आपण चिकटवण्यासाठी स्टेपलर पिन, स्टेपलर किंवा ग्लु गनमध्ये आढळणाऱ्या प्लास्टिक चिकटपट्टीचा वापर करतो. परंतु ही माटोळी मात्र पारंपरिक पद्धतीने केवणीच्या किंवा केळीच्या गब्यांच्या दोराने बांधलेली आहे. त्यामुळे माटोळीतील कुठलीही गोष्ट निसर्गाला हानिकारक ठरणार नाही अशीच असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com