Goa Matoli Vendors: माटोळी बाजारात 'सोपो'चा गोंधळ! जबरदस्‍तीने वसुली, विक्रेत्यांनी सरकारच्‍या नावाने मोडली बोटे

Goa Sopokar exemption notification: अखेर गणेशचतुर्थी दोन दिवसांवर आलेली असताना जाग आलेल्या सरकारने सोपोकर माफीची अधिसूचना जारी केली.
Goa Matoli Vendors
Goa Matoli VendorsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अखेर गणेशचतुर्थी दोन दिवसांवर आलेली असताना जाग आलेल्या सरकारने सोपोकर माफीची अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेची प्रत न मिळाल्याने पंचायत व पालिकेने माटोळी साहित्य विक्रेत्यांकडून बाजार शुल्क म्हणजेच सोपोकर आकारणे सुरू ठेवले होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सोपोकर आकारण्याची घोषणा केली होती. मात्र, राज्य सरकारच्या प्रशासनाने त्याची दखल घेत आवश्यक ती अधिसूचना आजवर जारी न केल्याने माटोळी साहित्य विक्रेत्यांत नाराजी होती. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर पडताच आज सकाळी प्रशासनाची चक्रे भराभर फिरली आणि दुपारी तशी अधिसूचना जारी करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनीच शनिवार रविवार आल्याने ही अधिसूचना जारी होण्यास उशीर लागण्याची कबुली दिली आहे. गोवा सरकारने गणेशचतुर्थी बाजारात पारंपरिक माटोळी विक्रेत्यांकडून सोपो (बाजार शुल्क) न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, यासंदर्भातील अधिसूचना थोड्या उशिरा निघाली असली तरी आता ती जाहीर करण्यात आली आहे.

अलीकडेच संपलेल्या गोवा विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते की, पंचायत आणि नगरपालिका यांना माटोळी विक्रेत्यांकडून सणाच्या काळात कोणतेही सोपो शुल्क घेऊ नये, अशा सूचना दिल्या जातील. मात्र, लिखित आदेश न झाल्याने अनेक ठिकाणी अद्याप सोपो वसुली सुरू होती.

कुडचडे, सांगे बाजारात वसुली

चतुर्थीच्या माटोळी बाजारात नगरपालिका किंवा पंचायतींनी सोपो कर गोळा करू नये, असा स्पष्ट आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला असतानाही कुडचडे व सांगे पालिका क्षेत्रात भरलेल्या माटोळी बाजारात विक्रेत्यांकडून सोपो वसूल केल्याचे प्रकार उघड झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रीस आणलेल्या साहित्याच्या प्रमाणावरून विक्रेत्यांकडून १०० ते २५० रुपये सोपो कर वसूल करण्यात आला. अनेक महिला विक्रेत्यांनी सरकारच्या आदेशानंतरही कर आकारला जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

सोपो गोळा करणाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘‘आम्हाला कुणाचाही लेखी आदेश मिळालेला नाही’’. शिवाय त्यांनी विक्रेत्यांना दिलेल्या पावत्या दाखवून सरकारकडून परतावा मिळवावा असा सल्लाही दिला, अशी माहिती महिला विक्रेत्यांनी दिली.

डिचोली बाजारातही सावळागोंधळ; मात्र आजपासून घेणार नाही ‘सोपो’

सरकारचे परिपत्रक उशिरा पोहोचल्याने डिचोली बाजारात आज सकाळी विक्रेत्‍यांकडून सोपो कर वसूल करण्‍यात आला. नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर यांनी सांगितले की, पालिका प्रशासनाला परिपत्रक उशिरा मिळाले. उद्या मंगळवारपासून विक्रेत्यांकडून सोपो वसूल केला जाणार नाही.

चतुर्थीनिमित्त आजपासून डिचोलीत माटोळीचा बाजार फुलून गेला. जंगली फळेफुले व माटोळीसाठी लागणाऱ्या साहित्याचे दर वाढलेले दिसून आले. गोव्याच्या सीमावर्ती महाराष्ट्रातील गावांसह डिचोली व सत्तरी तालुक्यातील ग्रामीण भागातून माटोळीचे साहित्य कालच बाजारात दाखल झाले. उद्या मंगळवारी बाजारात मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

माटोळीवर अतिरिक्त शुल्क नाही : मुख्यमंत्री

आता अधिसूचना जाहीर झाल्यामुळे विक्रेत्यांना दिलासा मिळणार असून माटोळी विक्रीवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे पारंपरिक माटोळी बाजारांना प्रोत्साहन मिळेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com