Matoli: 'यंदाच्या वर्षी नवीन काय'? दुर्मिळ फळांची-वनस्पतींची, औषधी गुणधर्मांची लाखमोलाची 'माटोळी'

Ganesh Chaturthi Matoli: या माटोळींसाठी लागणारी फळे आणि वनस्पती शोधण्यासाठी महिनोन्महिने आम्हाला काम करावे लागते. दूरच्या ठिकाणी किमान तीनदा आमची फेरी होते.
Ganesh Chaturthi Matoli
Ganesh Chaturthi MatoliDainik Gomantak
Published on
Updated on

गेली वीस वर्षे आमच्या घरच्या गणेशोत्सवात मी भव्य अशी माटोळी गणपतीच्या माथ्यावर बांधत आलो आहे. 25 फूटx15 फूट या आकाराच्या या माटोळीमध्ये किमान ५०० वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, फळांचा अंतर्भाव असतो. माटोळीतील हे सगळे नग रानातील आणि स्थानिक असतात असे म्हणायला हरकत नाही.

या माटोळींसाठी लागणारी फळे आणि वनस्पती शोधण्यासाठी महिनोन्महिने आम्हाला काम करावे लागते. दूरच्या ठिकाणी किमान तीनदा आमची फेरी होते- पहिली फेरी केवळ तो अमूल्य नग पाहण्यासाठी होते, त्यानंतर दुसरी फेरी तो नग तिथे अजूनही आहे याची खात्री करून घेण्यासाठी होते आणि तिसरी फेरी तो नग तिथून आणण्यासाठी होते. या कामात कितीतरी पैसे खर्च होत असतात. माटोळीतील सारे जिन्नस गोळा करून आणण्यासाठी किमान लाखभर रुपये सहज खर्च होतात.

पावसाळा सुरू झाला की प्रत्येक जणांकडून आम्हाला विचारणा होत राहते- 'यंदाच्या वर्षी नवीन काय?' माटोळी जेव्हा तयार होते तेव्हाच त्यांची ती उत्सुकता शमते. जवळपासचे खूप लोक ही माटोळी पाहण्यासाठी येतातच परंतु त्याशिवाय दूरवरच्या (अगदी पणजी पासून) वेगवेगळ्या शाळांमधून विद्यार्थ्यांना घेऊन त्यांचे शिक्षकही येत असतात.

आता आम्हाला आमच्या माटोळीतील वेगवेगळ्या जिन्नसांची वैशिष्ट्ये ठाऊक झाली आहेत, त्यांचे औषधी गुणही आम्हाला माहित आहेत. माटोळीतील जिन्नसांचे हे गुण त्या विद्यार्थ्यांना समजावून सांगणे यात एक मोठा आनंद असतो.

पण केवळ खूप जिन्नस असणे हेच काही मोठ्या माटोळीचे लक्षण नाही तर माटोळी बांधताना त्यात कलात्मकता असेल याचीही खातरजमा करावी लागते.‌ माटोळी आणि त्याच्याखाली पूजेला लावलेला गणपती यामध्ये कलात्मक संगत साधली जाईल याकडेही बारकाईने लक्ष द्यावे लागते. एकंदर माटोळी म्हणजे एक कलात्मक सादरीकरणच असते.‌

माटोळीच्या निमित्ताने पुढील पिढीला (आमच्या घरातील तसेच अन्यही) अनेक दुर्मिळ फळांची, वनस्पतींची ओळखही होते ही त्यातील आणखीन एक सकारात्मक बाब आहे. इतकी वर्षे माटोळीसाठी रानावनात फिरल्यानंतर आज मलाही रानावनासंबंधी, त्यात मिळणाऱ्या वनस्पतीसंबंधी बऱ्याच गोष्टी ठाऊक झाल्या आहेत.

Ganesh Chaturthi Matoli
Matoli: कुसडो पाऊस, चवथ आणि गोव्यातील 'माटोळी'ची परंपरा

माटोळीसाठी वनस्पती शोधून आणण्यासाठी मी जेव्हा निघतो तेव्हा माझ्याबरोबर असणाऱ्या माझ्या मुलीलाही आपोआपच त्या वनस्पतीबद्दल कळते आणि तिच्याही मनात कुतूहल निर्माण होऊन अशा गोष्टींबद्दल एक ओढ निर्माण होते. त्या विशिष्ट वनस्पतीबद्दलचे तिला ठाऊक झालेले ज्ञान ती आणखीन चार जणांना सांगते.‌ अशाप्रकारे दुर्मिळ वनस्पतीबद्दलची माहिती माटोळीच्या निमित्ताने अनेक जणांना ज्ञात होते हा फायदा कमी आहे काय?

आज फक्त गणेश चतुर्थीचा देखावा पाहण्यासाठी लोक एकमेका ंच्या घरी जात नाहीत तर वैशिष्ट्यपूर्ण अशी माटोळी निरखण्यासाठी आणि त्यातील जिन्नसांबद्दल माहिती करून घेण्यासाठी देखील आवर्जून जातात.‌ फक्त विद्यार्थीच नव्हेत तर ज्यांना औषधी वनस्पतींबद्दल माहिती हवी असते किंवा जाणून घ्यायचे असते असे लोकही (ज्यात औषधोपचार करणारे वैद्यही सामील आहेत) माटोळी पाहण्यासाठी मुद्दाम येतात.

Ganesh Chaturthi Matoli
हत्तीने प्रलंयकारी होऊन नासधूस करू नये, म्हणून गजमुखी देवतेची पूजा प्रचलित झाली असावी; गणपतीपूजनाची गोमंतकीय प्रथा

माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर मी इतरांना हे सांगू इच्छितो की गणेश चतुर्थीच्या निमित्ताने घरच्या माटोळीत तुम्ही ज्या वनस्पती किंवा जी फळे वापरता त्याबद्दल, त्यांच्या औषधी गुणांबद्दल अवश्य जाणून घ्या व ते इतरांनाही सांगा. श्रावणी महिन्यात रविवार पुजण्यासाठी जी पाने-फळे आम्ही वापरतो त्यातही औषधी गुण असतात.‌ निसर्गाचा आणि आमच्या पूर्व पिढीचा जवळचा संबंध त्यातून प्रकट होत असतो.

- गजानन बांदेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com