Junta House: 1960 सालातील गोव्यातील सर्वात उंच इमारत! 'जुन्ता हाऊस'... सिर्फ नाम ही काफी है

Junta House Goa: सत्तरच्या दशकात या इमारतीच्या मागे असलेल्या दुधाच्या बुथवर (क्रमांक नऊ) काचेच्या बाटल्या घेऊन दूध घेण्यासाठी येत असणाऱ्या डॉ. सप्रे यांना आपल्यापैकी अनेक जणांनी पाहिले आहे.
Junta House Panaji
Junta House GoaDainik Gomantak
Published on
Updated on

जुन्ता हाऊस इमारत एका रिकाम्या जागेवर उभी राहिली होती. काही वडीलधारे सांगतात की भूकंपासारख्या मोठ्या आपत्तीच्या वेळी शहरातील लोकांना आश्रय मिळावा म्हणून पोर्तुगीजांनी ही जागा हेतुपुरस्सर रिकामी ठेवली होती.

मूळ ही जागा रवळू भट यांच्या मालकीची, त्यानंतर तिची मालकी कार्वाल्हो कुटुंबीयांकडे आली. जुन्ता हाऊस ही पहिली इमारत होती ज्यासाठी फायलिंग केले गेले. (फायलिंग म्हणजे इमारतीचा पाया मजबूत करण्यासाठी जमिनीत खोदकाम करून मजबूत साहित्याच्या मदतीने तिचा भाग जमिनीखाली स्थिर करणे).

ती पहिली सहा मजली उंच इमारत होती. 1960 च्या दशकात ती गोव्यातील सर्वात उंच इमारत होती. या इमारतीला तीन लिफ्ट होत्या. काकुलो यांनी या इमारतीचे बांधकाम केले होते तर गाडगीळ हे तिचे मुख्य अभियंता होते.

अनेकांनी त्या काळात काकुलो यांना त्यांच्या पिवळ्या फोर्ड टॅनस गाडीत बसून बांधकामाचे प्रत्यक्ष निरीक्षण करताना पाहिले आहे.‌

 15 ऑगस्ट 1966 या दिवशी जुन्ता हाऊसचे उद्घाटन होताना अनेक उच्च राजपत्रित अधिकारी तिथे हजर होते. गोवा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. कोराने डॉ. एनजीके शर्मा (मेडिसिन),  डॉ. शर्मा (फॉरेन्सिक मेडिसिन) डॉ. सप्रे हे तिथे हजर होते. त्याशिवाय माहिती खात्याचे संचालक जतकर, विजय राव वालावलीकर यासारखी मंडळीही तिथे हजर होती.

सत्तरच्या दशकात या इमारतीच्या मागे असलेल्या दुधाच्या बुथवर (क्रमांक नऊ) काचेच्या बाटल्या घेऊन दूध घेण्यासाठी येत असणाऱ्या  डॉ. सप्रे यांना आपल्यापैकी अनेक जणांनी पाहिले आहे. 

जुन्ता हाऊसच्या पहिल्या मजल्यावरचे आरटीओ कार्यालय तिथे सुरुवातीपासून होते. त्यानंतर श्रीमती लोबो या संचालिका असताना वनविभाग देखील प्रोव्हेदोरिया इमारतीमधून या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आला. जुन्ता हाऊसचा‌ दुसरा अर्धा भाग, ज्याला एनएक्सी म्हटले जाते, तो रमाकांत धारवाडकर यांनी 1977 मध्ये बांधला.

Junta House Panaji
Goa Culture: करमळाच्या पानावरचा नैवेद्य, भजनानंतर द्रोणात दिलेल्या उसळी, नागपंचमीला पातोळ्या; गोव्यातील पर्णपात्राची परंपरा

मी बरीच वर्षे जुन्ता हाऊसच्या समोर असलेल्या अकबराली या इमारतीत राहिलो आहे. 80 च्या दशकात ख्रितोफोर फोन्सेका यांनी केलेल्या आमरण उपोषणाचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे.‌ 1981 मध्ये होणाऱ्या आरटीओ रोड टेस्ट, विद्यार्थी आंदोलने, ते करत असलेली पथनाट्ये हे सारे मी पाहिले आहे.

तत्कालीन विद्यार्थिनी नेते नंदकुमार कामत यांना घोषणाबाजी करताना आणि संचालकाच्या गाडीवर चढतानाही मी पाहिले आहे. या इमारतीचा सहावा मजला तत्कालीन मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांनी स्वामी विवेकानंद सोसायटीला दान केला होता.

Junta House Panaji
Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

स्वामी विवेकानंद सभागृहात सादर होणारे अनेक कार्यक्रम, नाटके मी पाहिली आहेत- अनेक लग्नेदेखील. प्रभाकर यांचे तबला वर्ग, श्रीमती मांद्रेकर यांचे नृत्याचे वर्ग तिथे भरत असत. श्रीमती मांद्रेकर यांनी माझ्या बहिणीला (1968) आणि त्यानंतर तिच्या मुलीला (1983) शास्त्रीय नृत्य शिकवले आहे. 

आणखीन एक घटना सांगितल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही. माधव जोशी नावांचे गृहस्थ जुन्ता हाऊसमध्ये रहात होते. त्यांच्या पत्नी मासन दे अमोरीमध्ये आम्हाला मराठी शिकवायच्या. एक दिवशी ही दोघे पती-पत्नी लिफ्टमधून खाली उतरली आणि आपापल्या कामासाठी गेली. त्यानंतर पाचच मिनिटात जुन्ता हाऊसमधील लिफ्ट क्रमांक एक मध्ये बॉम्बस्फोट झाला. तो बॉम्ब तिथं कोणी पेरला होता हे आजपर्यंत कुणालाच कळलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com