Goa Culture: करमळाच्या पानावरचा नैवेद्य, भजनानंतर द्रोणात दिलेल्या उसळी, नागपंचमीला पातोळ्या; गोव्यातील पर्णपात्राची परंपरा

Goa leaf traditions: आदिमानव अश्मयुगीन कालखंडात जेव्हा प्रारंभी कंदमुळे खाऊ लागला आणि कालांतराने आपल्या परिसरातील जंगली श्वापदांना दगडी हत्यारे वापरून त्यांची शिकार करून मांस भक्षण करण्यास सुरुवात झाली.
Goan leaf traditions
Goa festivals nature leavesDainik Gomantak
Published on
Updated on

अ‍ॅड. सूरज मळीक

गोव्यातल्या जनतेत भारतीय उपखंडातील जनतेप्रमाणे परिसरातल्या निसर्ग आणि पर्यावरणाविषयी आत्मीयता आणि जिव्हाळा पूर्वापार आहे. आदिमानव अश्मयुगीन कालखंडात जेव्हा प्रारंभी कंदमुळे खाऊ लागला आणि कालांतराने आपल्या परिसरातील जंगली श्वापदांना दगडी हत्यारे वापरून त्यांची शिकार करून मांस भक्षण करण्यास सुरुवात झाली त्यावेळी अन्न भक्षण करणे सोयीचे व्हावे म्हणून त्याने जंगली वृक्षांची पाने पात्र म्हणून वापरण्यास सुरुवात केली.

गोव्यातील लोकजीवन आणि संस्कृतीत विविध वृक्षांच्या पानांना दिलेले महत्त्व अनन्यसाधारण आहे. गोव्यातील सण-उत्सवांमध्ये उपयोग केल्या जाणाऱ्या पानाने मानवाचे आणि वृक्षाचे नाते दृढ केलेले आहे. वर्षभरात निसर्ग आपल्या वृक्ष आच्छादनातून पानांचा गडद-फिका रंग, लहान-मोठा आकार, त्यांच्या कमी-जास्त संख्या यामधून सतत बदलणाऱ्या निसर्गाच्या रम्यतेचे दर्शन आपल्याला घडवतो.

जंगलात मौसमानुसार जे वृक्ष पसरट, टिकाऊ आणि सुबक आकाराची पाने देतात, त्यांचा अश्मयुगीन माणसांनी अन्न धारण करण्यासाठी पात्र म्हणून वापर करण्यास सुरुवात केली. त्यातून जंगलातील पळस, केळ, करमळ, सागवान, कुमयो, फणस आदी वृक्षांची पाने वापरण्यास प्रारंभ केला.

सदाहरित झाडांमध्ये येणाऱ्या विशेष करून फणस आणि आंब्यासारख्या झाडाची पाने गोमंतकातील कित्येक सण-उत्सवांमध्ये उपयुक्त ठरलेली आहेत. कारण या झाडांना बाराही महिने नवीन पाने येत राहतात. शिशिर ऋतूत पानांचा त्याग करणारी झाडे चैत्रापासून ते आषाढापर्यंत भरगच्च हिरवळीने नटून शीतलता, प्रसन्नता याबरोबर नेत्रसुखद निसर्गाच्या पैलूंचा साक्षात्कार घडतात. गोव्यात करमळ आणि पळस यांसारख्या पानगळीच्या झाडांच्या पानांनाही विशेष महत्त्व लाभलेले आहे.

आषाढ हा चांद्र कालगणनेनुसार चौथा महिना आहे. या महिन्यात गोव्यातील हवामानात शीतलता असते. पर्जन्यवृष्टीमुळे विविध वृक्षांना फुले बहरायला सुरुवात होते. त्यामुळे आषाढ, श्रावण आणि भाद्रपद या तीन महिन्यांत जे सण साजरे केले जातात तेव्हा नैसर्गिकपणे उपलब्ध असलेल्या वृक्ष वनस्पतीच्या वैभवाचे दर्शन होते.

काही वनस्पतींची पाने सुरुवातीच्या कालखंडात एकाच आकाराची असतात व जेव्हा या वनस्पतींची ठरावीक काळात वाढ होते तेव्हा त्यांची पानेही आपला आकार बदलतात. आषाढ महिन्यापर्यंत गोव्यात भरपूर प्रमाणात आढळणारी शेरवाड नामक झुडूप-वनस्पती आपल्या पांढऱ्या शुभ्र पानांमुळे ठळकपणे आपल्या नजरेस येते.

ही एक सदाहरित वनस्पती असली तरी गोमंतकीय लोकमानसात तिच्या पांढऱ्या पानांबद्दल आकर्षण आहे.

वर्षभर हिरवी पाने धारण केलेल्या वनस्पतीला काही पांढऱ्या रंगाची पाने येतात. आषाढ महिन्यात घडणारा हा निसर्गातील देखणा सोहळा वैज्ञानिक दृष्टीने बघितला तर ही पाने नसतातच. त्यांना निदल (सेपल्स) असे म्हणतात. त्यामुळे येथूनच केशरी रंगाची फुले बहरलेली दिसतात. एकाच वनस्पतीची दोन वेगळ्या आकाराची पाने किंवा दोन रंगांची पाने याबद्दल कुणालाही नवल वाटेल!

गोव्यातील ‘आयतार’ पूजन आणि नागपंचमीच्या सणाला शेरवाडाची पाने वापरली जातात. सत्तरीत गावांमध्ये ‘आयतार’ पूजनाच्या दिवसच संध्याकाळी तुळशीसमोर शेरवाडाच्या पानावर पंचखाद्य ठेवले जाते. हा प्रसाद शेजारी असलेल्या मुलांना दिला जातो. निसर्गाच्या या ऋतुचक्रानुसार पौष्टिक गुणधर्म लाभलेली पाने गोमंतकातील लोकसंस्कृतीत महत्त्वाची भूमिका बजावतात.

गोव्यातील जंगलांच्या सांनिध्यात असलेल्या काही गावांमध्ये आदिवासी समाज निसर्गाशी समरस होऊन तन्मयतेने जीवन व्यतीत करतात. वेळीप समाजामध्ये करमळ वृक्षाच्या पानाला विशेष स्थान आहे. आपल्या सण-उत्सवांत आजही या समाजात परंपरेनुसार करमळाच्या पानावर देवाला नैवेद्य दाखवला जातो. दरवर्षी आषाढी पौर्णिमा ‘आसाडी पूनव’ या नावाने साजरी केली जाते. करमळाची नवीन पाने काढून त्यावर तांदूळ, गूळ, नारळ, दूध यापासून बनवलेला गोड पायस देवाला नैवेद्य म्हणून दाखवला जातो.

मान्सुनात करमळ वृक्षावरती आलेल्या नवीन पानांवर पहिला नैवेद्य देवाला अर्पण केला जातो. आणि त्यानंतर ही मोठ्या आकाराची पाने पात्र म्हणून जेवणासाठी वापरली जातात. काणकोण, सांगे, केपे येथील आदिवासी जमातीने हा वारसा पुढे चालवलेला आहे. फोंडा येथे देवचाराला ‘रोट’ अर्पण केले जाते. केळीच्या पानावर तांदूळ, गूळ आणि खोबरे एकत्रित करून तयार केलेली भाकरी ‘रोट’ म्हणून अर्पण केली जाते.

सत्तरीतील वांते गावात आषाढ द्वादशीदिवशी गावातील सतेरी केळबाईच्या देवळात करमळाच्याच पानावर नैवेद्य दाखवावा लागतो आणि त्याच पानातून तो देवाचा प्रसाद म्हणून संपूर्ण गावात वाटला जातो. करमळाची एवढी मोठी पाने प्रत्येक घरात देणे शक्य नसल्याने त्याचे लहान लहान तुकडे करून त्यात प्रसाद दिला जातो.

चांदिवडाचे एक एक पान म्हणजे जणू काही स्वतंत्र पात्र. पसरट आकाराचे हे पान खास करून पर्णपात्र म्हणून वापरतात. त्यामुळे या पानामध्ये कुठलाही खाद्यपदार्थ सहज गुंडाळून ठेवता येतो. पूर्वी नातेवाइकांना भेट म्हणून काही न्यायचे असेल तर या पानाच्या आधारे केळीच्या दोराने बांधून ते नेले जायचे.

श्रावण महिना सुरू झाला की गोमंतकीयांना भजनाची ओढ लागलेली असते. देवळातील भजनात सहभागी झालेले ग्रामस्थ पानांच्या द्रोणात घालून दिलेल्या उसळीचा आनंद घेतात. द्रोण बनवण्यासाठी गोव्यातील स्थानिक वृक्षांच्या पानांचा उपयोग भरपूर प्रमाणात केला जायचा. कधी, फणस, कुमयो, तर कधी पळसाची पाने वापरली जायची. त्यामुळे त्या पानांचा आकारसुद्धा आपल्या लक्षात राहायचा. हल्ली सुपारीच्या पोवलीचा द्रोण बनवला जातो आणि पात्र म्हणूनही वापर केला जातो.

गोमंतकीय अन्नसंस्कृतीत औषधी गुणधर्माने युक्त हळदीला उल्लेखनीय स्थान आहे. हळदीच्या कोवळ्या पानांपासून काढलेले सुगंधित तेल सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरले जाते. पावसाळ्यात हळदीच्या कंदाला पाने फुटलेली असतात. नागपंचमीच्या सणाला ‘पातोळ्या’ हळदीच्या पानांमध्ये लपेटून वाफेवर ठेवून त्याला चविष्ट स्वाद दिला जातो.

Goan leaf traditions
Surangi Flowers: सूर्य वर आल्यावर उमलणारी, जुन्या फांद्यांवरती येणारी 'सुवासिक सुरंगी'

या पातोळ्यांचा आस्वाद घेण्याची गोव्यातील हिंदूंची परंपरा धर्मांतरित झालेल्या ख्रिस्ती समाजाचे कायम ठेवली. त्यामुळे श्रावण महिन्याच्या आसपास येणाऱ्या अवर लेडी ऑफ अझम्पशन सायबिणीच्या फेस्तालासुद्धा ‘पातोळ्या’ हमखास बनवल्या जातात. नागपंचमीला केळीच्या पानाचे द्रोण बनवून त्यात दूध आणि मका घालून नागोबाला अर्पण केले जाते.

मान्सूनच्या पावसाळ्यातील ज्येष्ठ पौर्णिमा म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाते. आपल्या पतीला वटवृक्षासारखे अक्षय निरोगी आयुष्य लाभावे म्हणून त्याची पूजा केली जाते. वडाची पाने लहान असली तरी मजबूत असतात. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला या पानांचे द्रोण बनवतात. त्यामध्ये भिजवून फुगवलेले चणे, त्याचबरोबर केळी, आंबा, अननस, संत्रे यांसारखी मौसमी फळे घालून सर्वांना वाटले जाते.

Goan leaf traditions
Apefly Butterfly: अद्भुत! गोव्यातील वांते गावात आढळले 'वानरमुखी फुलपाखरू'

पूर्वी लग्नकार्यासाठी फणसाच्या किंवा कुमयाच्या पानावर जेवण वाढले जायचे. एक एक पान माडाच्या चुडताचा हीर वापरून हातानेच गुंतली जायचे. परंतु प्लास्टिक पात्रे बाजारात हातोहात उपलब्ध असल्यामुळे स्वस्त आणि मस्त अशा प्रवृत्तीने माणसाला झाडे, झुडपे, वेली यांच्यापासून चार हात दूर ठेवलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com