Vice President of Argentina: अर्जेंटीनाच्या उपराष्ट्राध्यक्ष आणि डाव्या विचारांच्या नेत्या क्रिस्टीना फर्नांडीज डी किर्चनर (Cristina Fernandez de Kirchner) यांना भ्रष्टाचार प्रकरणात सहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अर्जेंटिनातील एका न्यायालयाने एका हायप्रोफाईल भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना दोषी ठरवले आहे. या निकालाला क्रिस्टिना सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ शकतात.
69 वर्षीय किर्चनर 2007 ते 2015 या काळात दोन वेळा राष्ट्राध्यक्ष होत्या. त्या काळात प्रशासनाने सार्वजनिक बांधकामांच्या ठेक्याबाबत काही निर्णय घेतले होते, त्यात अनियमितता आढळून आली आहे. गुन्हेगारी समूह चालविल्याचाही त्यांच्यावर आरोप होता, तो आरोप मात्र तीन सदस्यीय खंडपीठाने फेटाळला. याच वर्षी ऑगस्ट महिन्यात क्रिस्टिना यांना 12 वर्षांचा तुरुंगवास आणि राजकारणात आजन्म बंदी अशी शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, मला सुनावण्यात आलेली शिक्षा चुकीच आणि पुर्वग्रहदुषित विचारातून दिली आहे. शिक्षा देण्याचा निर्णय आधीच झाला होता, असे किर्चनर यांनी म्हटले आहे. समांतर सरकार आणि न्यायालयीन माफियांची मी शिकार ठरले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. किस्टिना आणि त्यांचे पती नेस्टर यांना काही ठेक्यांच्या बदल्यात पैसे दिले गेले होते, असा त्यांच्यावर आरोप होता. क्रिस्टिना यांचे पतीदेखील 2003 ते 2007 या काळात अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष होते.
अर्जेंटिनात दीर्घकाळापासून राजकीय ध्रुवीकरण झाले असून त्यातच आर्थिक संकटही आहे. येथे महागाई वाढली आहे. त्यातच किर्चनर यांना शिक्षा सुनावल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये राग आहे. याचा परिणाम पुढील वर्षात होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडीज यांना भोगावा लागू शकतो, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, किर्चनर सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतात. किर्चनर यांच्यासह या खटल्यात आठजण दोषी आहेत. उर्वरीत दोषींना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. काही महिन्यांपुर्वीच किर्चनर यांच्यावर ब्युनास आयर्स येथे घराबाहेर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यांच्यावर एकाने बंदूक रोखून चाप ओढला होता, पण गोळी बाहेर पडली नव्हती, त्यामुळे त्या बचावल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.