

पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरवर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचा मोठा भाऊ शाहिद अख्तर यांचे नुकतेच निधन झाले. या दुःखद प्रसंगी इस्लामाबादमधील एच-८ स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शोएब अख्तरने स्वतः सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली होती. मात्र, या अंत्यविधीच्या निमित्ताने एक धक्कादायक बाब समोर आली असून, पाकिस्तानचे दहशतवादाशी असलेले घनिष्ठ संबंध पुन्हा एकदा जगासमोर उघड झाले आहेत.
शाहिद अख्तर यांच्या अंत्यविधीसाठी शोएब अख्तरचे अनेक चाहते आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. परंतु, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या अंत्यसंस्काराच्या वेळी प्रतिबंधित दहशतवादी संघटना 'लश्कर-ए-तैयबा'शी संबंधित नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले. यामध्ये 'पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीग' (PMML) या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये PMML चे इस्लामाबाद अध्यक्ष इनाम-उर-रहमान कंबोह, उपमहासचिव अब्दुल्ला तूर आणि हाफिज उमर यांच्यासारखे नेते स्पष्टपणे दिसत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीग ही संघटना थेट लश्कर-ए-तैयबाचा संस्थापक आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. या नेत्यांच्या उपस्थितीमुळे पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना आणि मुख्य प्रवाहातील राजकारण किती एकरूप झाले आहे, यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शोएब अख्तर यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत पाकिस्तानसाठी अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत. त्यांनी ४६ कसोटी सामन्यांत १७८ विकेट्स, १६३ एकदिवसीय सामन्यांत २४७ विकेट्स आणि १५ टी-२० सामन्यांत १९ विकेट्स घेतल्या आहेत.
जगातील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जाणारे 'रावळपिंडी एक्सप्रेस' अशी ख्याती असलेले शोएब अख्तर सध्या आपल्या कौटुंबिक दुःखातून सावरत आहेत. मात्र, त्यांच्या भावाच्या अंत्यविधीतील या वादग्रस्त उपस्थितीमुळे त्यांनाही टीकेचा सामना करावा लागत आहे. या घटनेने पाकिस्तान पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅकफूटवर आला असून, दहशतवादाला पोसण्याचे त्यांचे धोरण पुन्हा एकदा उघड झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.