Russia Ukraine War Updates: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत चालले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अलीकडेच पाश्चात्य देशांना इशारा दिला होता की, त्यांनी युक्रेनला युद्धात मदत करत राहिल्यास त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. दरम्यान, रशियामध्ये भारतीयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. रशियाने या तरुणांना जबरदस्तीने सैन्यात भरती केले. यानंतर त्यांना युक्रेनविरुद्ध युद्ध लढण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले, असा दावा पंजाबमधील होशियारपूर येथील रहिवासी असलेल्या 7 तरुणांच्या गटाने केला आहे. या तरुणांनी भारत सरकारकडे मदतीसाठी आवाहन केले आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, रशियात अडकलेल्या या भारतीयांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडे मदतीचे आवाहन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांना युक्रेनविरुद्ध युद्ध लढण्यासाठी कधीही पाठवले जाऊ शकते. दुसरीकडे, 105 सेकंदाचा या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हे तरुण एका अस्वच्छ खोलीत उभे आहेत. त्यापैकी गगनदीप सिंह नावाचा एक तरुण आपबीती सांगताना दिसत आहे. तर उर्वरित 6 जण त्याच्याबरोबर उभे असलेले दिसत आहेत.
गगनदीप व्हिडिओमध्ये सांगत आहे की, ''आम्ही सर्वजण नवीन वर्षात रशियाला भेट देण्यासाठी गेले होतो. दरम्यान, एजंटने आम्हाला अनेक ठिकाणी फिरवले. यानंतर एजंटने सांगितले की, तो त्यांना बेलारुसला घेऊन जाईल. मात्र, बेलारुसला जाण्यासाठी व्हिसा लागतो हे आम्हाला माहिती नव्हते. यानंतर एजंटने आमच्याकडे पैशांसाठी तगादा लावला. दरम्यान, प्रत्येकाने जे काही पैसे होते ते एजंटला दिले. मात्र त्याने आम्हा सर्वांना एका रस्त्यावर सोडले, जिथे पोलिसांनी आम्हाला पकडले आणि रशियन सैन्याच्या ताब्यात दिले.''
रशियन सैन्याने धमकी दिली की, प्रत्येकाने हे काम करण्यासाठी करारावर स्वाक्षरी करावी, अन्यथा त्यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल. यानंतर लष्कराने सर्वांच्या सह्या घेतल्या आणि त्यांचे प्रशिक्षण सुरु केले. तेव्हाच आपली फसवणूक झाल्याचे या तरुणांच्या लक्षात आले. गगनदीपने सांगितले की, त्यांना बंदूक कशी वापरायची हे देखील माहित नाही. युक्रेनविरुद्ध युद्ध लढण्यासाठी रशिया कधीही त्यांना सीमेवर तैनात करु शकतो. यापूर्वीही, अनेक भारतीयांना युद्धासाठी पाठवले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या 22 फेब्रुवारीच्या वृत्तानुसार, रशिया-युक्रेन सीमेवर चार भारतीयांना रशियन सैनिकांबरोबर लढण्ययासाठी पाठवण्यात आले. यातील एक तेलंगणातील तर तीन कर्नाटकातील आहेत. रशियन कंपन्यांनी या भारतीयांना मदतनीस म्हणून कामावर ठेवल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. यानंतर, त्यांना रशियाचे खाजगी सैन्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वॅगनर ग्रुपमध्ये भरती करण्यात आले. त्यानंतर त्यांना युद्धभूमीवर घेवून जाण्यात आले. या लोकांच्या नातेवाईकांनी सांगितले की, 'डिसेंबर 2023 मध्ये काही एजंटनी नोकरीच्या नावाखाली त्यांची रशियात फसवणूक केली.' आता हे भारतीय मदतीसाठी याचना करत आहेत.
रिपोर्टनुसार, इतर 60 भारतीयांनाही फसवून वॅगनर आर्मीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील एका व्यक्तीने या लोकांना रशियन भाषेत लिहिलेल्या एका कॉन्ट्रॅक्टवर सही करायला लावली.
दुसरीकडे, गेल्या आठवड्यात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते की, ते रशियात अडकलेल्या भारतीयांच्या संपर्कात आहेत, त्यापैकीच एक जम्मू आणि काश्मीरमधील आझाद युसफ कुमार हा 31 वर्षीय तरुण आहे. युद्धभूमीवर लढाईसाठी तैनात असताना कुमारच्या पायात गोळी लागली. दरम्यान, कर्नाटक, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातील 10 भारतीय रशियात अडकले आहेत. त्यांना नोकरी देण्याच्या बहाण्याने रशियाला घेवून जाण्यात आले. त्यांना फसवणाऱ्या एजंटने त्यांच्याकडून प्रत्येकी 3 लाख रुपये उकळले.
दरम्यान, गेल्या महिन्यात भारत सरकारने सांगितले होते की, काही भारतीय रशियामध्ये अडकल्याची आम्हाला कल्पना आहे. आम्ही त्यांच्या सुटकेसाठी मॉस्कोशी युद्धपातळीवर काम करत आहोत. अनेक भारतीयांना नोकऱ्यांचे आमिष देऊन रशियाला घेवून जाण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.