

Karo Kari Honor Killing Tradition Pakistan: दहशतवाद, भीषण आर्थिक कंगाली, उपासमार आणि अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे जगभरात बदनाम असलेला पाकिस्तान आता एका अत्यंत भयंकर कुप्रथेमुळे पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चेत आला. पाकिस्तानमध्ये सुमारे 12 कोटी महिलांच्या अस्तित्वावर टांगती तलवार बनलेल्या 'कारो-कारी' या भयंकर परंपरेच्या नावाखाली 2025 या एकाच वर्षात तब्बल 470 निष्पाप महिलांची हत्या करण्यात आली.
भारतात ज्याप्रमाणे 'ऑनर किलिंग' म्हणजेच सन्मानासाठी हत्या करण्याचे प्रकार घडतात, अगदी तसाच हा प्रकार आहे. या कुप्रथेनुसार एखाद्या महिलेला किंवा मुलीला 'कारी' म्हणून घोषित केले जाते आणि त्यानंतर तिला अत्यंत वेदनादायी व क्रूर मृत्यू दिला जातो. धक्कादायक बाब म्हणजे, या परंपरेतर्गंत मारल्या गेलेल्या महिलांना सामान्य माणसासारखे अंतिम संस्कारही मिळू दिले जात नाहीत; त्यांना दफन करण्यासाठी सर्वसामान्यांपेक्षा वेगळी दफनभूमी तयार केली जाते.
या अमानुष परंपरेमागे तथाकथित कुटुंबाची आणि समाजाची 'प्रतिष्ठा' जपण्याचे ढोंगी कारण दिले जाते. जर एखाद्या महिलेने किंवा मुलीने स्वतःच्या पसंतीने प्रेमसंबंध ठेवले, लग्नानंतर परपुरुषाशी संबंध ठेवल्याचा संशय आला किंवा कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केले, तर तिच्यावर कुटुंबाची आणि समाजाची इज्जत धुळीस मिळवल्याचा ठपका ठेवला जातो. समाज आणि पंचायतीतील तथाकथित प्रतिष्ठित लोक जेव्हा अशा महिलेला मृत्यूची शिक्षा सुनावतात, तेव्हा तिचे स्वतःचे कुटुंबही तिच्या मदतीसाठी पुढे येत नाही.
पाकिस्तानच्या (Pakistan) सिंध प्रांतात या कुप्रथेला 'कारो-कारी' म्हटले जाते, तर बलुचिस्तान आणि दक्षिण पंजाबमध्ये 'सियाह-कारी', खैबर पख्तुनख्वामध्ये 'तोर तोरा' आणि पंजाब प्रांतात 'काला-काली' या नावाने ही क्रूरता चालते. सर्वात संतापजनक बाब म्हणजे, निव्वळ जमिनीचे विवाद, कौटुंबिक वैर आणि वैयक्तिक भांडणे मिटवण्यासाठीही अनेकदा महिलांवर 'कारी' असल्याचा खोटा आरोप लावून त्यांचा बळी दिला जातो.
पाकिस्तानी कायद्यानुसार या परंपरेवर पूर्णपणे बंदी असून अशा प्रकारच्या हत्येला थेट 'खून' मानले गेले आहे. असे असले तरी प्रशासकीय अनास्था आणि कट्टरपंथी समाजाच्या दबावामुळे आजही अनेक राज्यांमध्ये ही अनिष्ट प्रथा उघडपणे सुरु आहे. कायद्याची कोणतीही भीती नसल्यामुळे निष्पाप महिलांचा बळी घेतला जात असून, या मध्ययुगीन अन् रानटी परंपरेमुळे संपूर्ण जगभरातून पाकिस्तानवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.