

Pakistan AC Compressor Blast: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील 'पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' या नामांकित रुग्णालयात बुधवारी (26 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक आणि काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली. रुग्णालयाच्या गायनॉकॉलॉजी (स्त्रीरोग) विभागातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात अचानक भीषण आग लागून तब्बल 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. अवघ्या काही दिवसांपूर्वीच जन्माला आलेल्या निष्पाप बालकांचा अशा प्रकारे करुण अंत झाल्यामुळे संपूर्ण परिसरात आणि आरोग्य वर्तुळात तीव्र शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही आग (Fire) रुग्णालयातील नवजात शिशु विभागात लावलेल्या एअर कंडिशनिंग युनिटचा कॉम्प्रेसर अचानक मोठ्या आवाजासह फुटल्यामुळे लागली. कॉम्प्रेसरचा स्फोट इतका तीव्र होता की, काही क्षणातच संपूर्ण नर्सरीमध्ये दाट धूर आणि आगीच्या प्रचंड ज्वाळा पसरल्या. घटना घडली त्यावेळी या विशेष नर्सरी विभागात एकूण 16 नवजात बालके उपचारासाठी दाखल होती.
आगीची भीषणता एवढी जास्त होती की, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आणि पालकांना बालकांना बाहेर काढण्यासाठी पुरेशी संधीच मिळाली नाही. या भीषण दुर्घटनेत 16 पैकी 15 बालकांचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर सुदैवाने केवळ एकाच बालकाला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्कालीन बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून सध्या घटनास्थळी कूलिंग ऑपरेशन वेगाने सुरु आहे. या दुर्घटनेमुळे रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रुग्णालय व्यवस्थापनाने या घटनेच्या सखोल तपासाचे आदेश दिले असून एसी कॉम्प्रेसरच्या देखभालीत काही त्रुटी होत्या का, याचा तपास स्थानिक पोलीस आणि तांत्रिक पथकांकडून केला जात आहे. एकाच वेळी 15 निष्पाप जीवांचा बळी गेल्याने पाकिस्तानमधील रुग्णालयांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.