

Ishaq Dar Claim Iran Supported Pakistan Operation Sindoor: पाकिस्तानचे उप-पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी भारताने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'बाबत एक अत्यंत धक्कादायक आणि वादग्रस्त दावा केला. भारताच्या या लष्करी कारवाईदरम्यान इराणने पाकिस्तानला गुप्तपणे पाठिंबा दिला होता, असे वक्तव्य त्यांनी केले. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना इशाक दार यांनी हा दावा केला.
जून 2025 आणि फेब्रुवारी 2026 मध्ये अमेरिका व इस्रायलसोबत झालेल्या युद्धाच्या काळात पाकिस्तानने इराणला (Iran) भक्कम मुत्सद्दी आणि राजकीय पाठिंबा दिला. तर त्या बदल्यात मे 2025 मध्ये भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईत इराणने पाकिस्तानची बाजू घेतल्याचे दार यांनी म्हटले.
मे 2025 मध्ये इशाक दार यांनी इराणचा दौरा केला होता. 'ऑपरेशन सिंदूर'विरुद्ध पाकिस्तानला दिलेल्या सहकार्याबद्दल इराणचे आभार मानणे हाच या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता, असेही त्यांनी सांगितले. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर 7 मे 2025 रोजी भारताने पाकिस्तानविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' ही धडक लष्करी कारवाई सुरु केली होती. चार दिवस चाललेल्या तीव्र संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर झाली होती.
त्यावेळी पहलगाम हल्ल्यातील सहभागामुळे पाकिस्तान जागतिक स्तरावर पूर्णपणे एकटं पडला होता आणि जगातील बहुतांश देशांनी दहशतवादाविरुद्ध भारताच्या आत्मसंरक्षणाच्या हक्काचे समर्थन केले होते.
परंतु, दार यांच्या या दाव्याच्या सत्यतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. जेव्हा भारताने पाकिस्तानवर कारवाई केली होती, तेव्हा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी दोन्ही देशांचा दौरा करुन भारत आणि पाकिस्तान या दोघांशीही इराणचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच दोन्ही देशांना शांतता राखण्याचा आणि चर्चेद्वारे वाद सोडवण्याचा सल्ला दिला होता. असे असताना आता इशाक दार यांनी इराणच्या सहकार्याचा केलेला हा दावा पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील नापाक इराद्यांचेच दर्शन घडवतो.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आधीच स्पष्ट केले होते की, संयुक्त राष्ट्रांच्या 193 सदस्य देशांपैकी केवळ 3 देशांनी भारताच्या भूमिकेला विरोध दर्शवला होता, तर उर्वरित जगाने भारताच्या बाजूने ठाम उभे राहणे पसंत केले होते. अशा स्थितीत इशाक दार यांचे हे वक्तव्य केवळ स्वतःच्या देशातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि इराणसोबतचे संबंध ताणले जावेत यासाठी केलेले एक राजकीय कारस्थान मानले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.