

Guinea-Bissau Military Coup: बांगलादेश पाठोपाठ आणखी एका मुस्लीमबहुल देशात लष्कराने बंड केले. पश्चिम आफ्रिकेतील गिनी-बिसाऊ मध्ये लष्कराच्या एका गटाने थेट संसदेवर हल्लाबोल करत राष्ट्रपती उमरो सिसोको एम्बालो यांना बेड्या ठोकल्या. या कारवाईनंतर देशातील सत्तेवर पूर्ण नियंत्रण मिळवल्याचे लष्कराकडून जाहीर करण्यात आले. निवडणूक वादांमुळे देशातील राजकीय वातावरण आधीच तापले असताना गोळीबार, धुराचे लोट आणि अचानक लागू झालेल्या कर्फ्यूमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली.
लष्करी बंडातील सर्वात मोठा धक्का म्हणजे राष्ट्रपती उमरो सिसोको एम्बालो यांना अटक करण्यात आली असल्याची बातमी. धर्म, समुदाय आणि वांशिक गट एकत्र राहणाऱ्या या देशात पुन्हा एकदा लष्करी राजवट आली. गिनी-बिसाऊमध्ये अंदाजे 45–50 टक्के मुस्लीम, 20–22 टक्के ख्रिस्ती आणि सुमारे 30 टक्के आफ्रिकन तसेच पारंपरिक धर्माचे लोक राहतात. देशाची ओळख धर्मनिरपेक्ष आणि मिश्रित आहे, परंतु राजकीय अस्थिरतेमुळे अनेक वर्षांपासून हा देश असुरक्षित राहिला. 1974 मध्ये पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाल्यापासून या देशात अनेकदा लष्करी बंड झाले.
अल जझीरा या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती एम्बालो यांच्यासोबतच मुख्य विरोधी पक्षनेते डोमिंगोस सिमोएस परेरा यांनाही लष्कराने ताब्यात घेतले. देशात इंटरनेट सेवा खंडित करण्याचेही प्रयत्न लष्कराकडून सुरु करण्यात आले. या बंडाचे नेतृत्व करणारा लष्करी अधिकारी डेनिस एन’काना हा राष्ट्रपतींचा सुरक्षा प्रमुख आहे. म्हणजेच, ज्याच्यावर राष्ट्रपतींच्या सुरक्षेची जबाबदारी होती, त्याच व्यक्तीने त्यांना अटक केली.
देशात रविवारी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक झाली आणि त्याचे निकाल गुरुवारी अपेक्षित होते. मात्र, निकाल येण्यापूर्वीच वातावरण बिघडले. दोन प्रमुख उमेदवार विद्यमान राष्ट्रपती एम्बालो आणि त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी फर्नांडो डायस यांनी कोणत्याही पुराव्याशिवाय स्वतःला विजयी घोषित केले. देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या PAIGC ला उमेदवार उभे करण्यापासून रोखण्यात आल्याने विरोधी पक्ष आणि नागरी संघटना निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत होते. याचदरम्यान वाढत्या तणावाचा फायदा घेत लष्कराने हीच संधी साधली. 2019 च्या निवडणुकीतही या दोन्ही उमेदवारांनी स्वतःला विजेता घोषित केल्यामुळे चार महिन्यांपर्यंत राजकीय संकट कायम राहिले होते.
बुधवारी दुपारी गिनी-बिसाऊची राजधानी बिसाऊमध्ये अचानक गोळीबाराचे आवाज सुरु झाले. निवडणूक आयोगाचे कार्यालय, राष्ट्रपती भवन आणि गृह मंत्रालयाच्या आसपास एकाच वेळी गोळीबार ऐकू आला. काही वेळातच टीव्हीवर लष्करी अधिकाऱ्यांचा एक गट दिसला. त्यांनी पुढील तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या.
निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत निलंबित केली जात आहे.
देशाच्या जमिनीवरील, हवाई आणि सागरी सर्व सीमा बंद करण्यात येत आहेत.
कर्फ्यू त्वरित लागू करण्यात आला आहे.
ही घोषणा म्हणजे सत्तेवर थेट कब्जा केल्याची लष्कराची अधिकृत घोषणा होती. राजकीय अराजकता, निवडणुकीतील वाद आणि विश्वासार्हतेचा अभाव यांमुळे देशात पुन्हा एकदा लष्करी बंड झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.