

Sajeeb Wazed Joy Statement: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे पुत्र आणि माहिती तंत्रज्ञान सल्लागार सजीब वाजेद जॉय यांनी एका महत्त्वपूर्ण मुलाखतीत भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीररित्या आभार मानले. तसेच, त्यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारने त्यांच्या आईच्या प्रत्यार्पणाची केलेली मागणी पूर्णपणे फेटाळून लावली.
ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सजीब वाजेद जॉय म्हणाले, “भारताने माझ्या आईचा जीव वाचवला. ऑगस्ट 2024 मध्ये त्या बांगलादेशमधून (Bangladesh) बाहेर पडल्या नसत्या, तर उग्रवाद्यांनी त्यांची हत्या केली असती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या आईला आश्रय दिला, त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो.”
जॉय यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारची त्यांच्या आईच्या प्रत्यार्पणाची मागणी पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "खटला सुरु होण्यापूर्वीच 17 न्यायाधीशांना हटवण्यात आले. संसदेची मंजुरी न घेताच कायदे बदलले गेले. माझ्या आईच्या वकिलांना कोर्टात प्रवेशही नाकारला गेला. जिथे कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली नाही, तिथे कोणताही देश प्रत्यार्पण करु शकत नाही. त्यांना पूर्ण विश्वास आहे की, भारत ही बांगलादेश सरकारची मागणी कधीही स्वीकारणार नाही.''
सजीब वाजेद जॉय यांनी कबूल केले की, त्यांच्या सरकारने सुरुवातीच्या विद्यार्थी आंदोलनाला हाताळताना काही चुका केल्या असतील. पण, त्यानंतर जे काही झाले ते लोकांचे आपोआप उभे राहिलेले आंदोलन नव्हते, तर हे एक सुनियोजित राजकीय तख्तापलट होते, असा आरोप त्यांनी केला. जॉय यांनी थेट पाकिस्तानच्या (Pakistan) गुप्तचर संस्था ISI वर आरोप केला. ISI ने आंदोलकांमध्ये घुसलेल्या उग्रवाद्यांना शस्त्रे पुरवली असल्याचा त्यांचा दावा आहे.
पाकिस्तानी सहभागाचे व्हिडिओ पुरावे असल्याचा हवाला देत जॉय यांनी गंभीर इशारा दिला. "या शस्त्रांचा पुरवठा उपखंडात कुठूनही होऊ शकत नाही, त्याचा एकमेव स्रोत ISI आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले. मुहम्मद युनुस यांच्या अंतरिम सरकारने हसीना सरकारच्या काळात शिक्षा झालेल्या हजारो दहशतवाद्यांना सोडले आहे. यामुळे आता लष्कर-ए-तैयबा ही दहशतवादी संघटना बांगलादेशात उघडपणे काम करत आहे, अशी गंभीर चेतावणी त्यांनी दिली. त्यांनी दिल्लीत अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा संबंधही बांगलादेशातील लष्करशी जोडलेल्या दहशतवाद्यांशी लावला.
जॉय यांनी मुहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारला पूर्णपणे अवैध म्हटले. "एक वर्षांहून अधिक काळ बिना-निवडणुकीचे सरकार सत्तेत आहे. सर्वकाही अलोकतांत्रिक पद्धतीने सुरु आहे. दहा हजारांहून अधिक राजकीय कैदी अजूनही तुरुंगात आहेत, ज्यात 100 हून अधिक माजी खासदारांचा समावेश आहे," असे त्यांनी सांगितले. "जर मुहम्मद युनुस इतके लोकप्रिय आहेत, तर ते एकाही निवडणुकीचे आयोजन का करत नाहीत?" असा सवाल जॉय यांनी केला. त्यांनी दावा केला की, विद्यार्थी आंदोलनाच्या पक्षाला सर्वेक्षणात केवळ 2 टक्के लोकांचा पाठिंबा मिळत आहे.
"बांगलादेशात भ्रष्टाचार होता, हे मी मानतो," असे जॉय म्हणाले. "पण माझ्या आईच्या काळात बांगलादेश जगातील सर्वात भ्रष्ट देशांच्या टॉप-10 यादीतून बाहेर पडला होता." हसीना सरकारच्या काळात देश सर्वात कमी विकसित देशांच्या श्रेणीतून बाहेर पडून 'एशियन टायगर' बनण्याच्या मार्गावर होता. इतकी जलद प्रगती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असताना शक्य नव्हती, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. जॉय यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचाही हवाला दिला. ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनाने USAID मार्फत बांगलादेशातील सत्ता परिवर्तनासाठी लाखो डॉलर्स खर्च केल्याचा दावा केला होता, असे जॉय म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.