

Microsoft Outlook Servers Down Global Outage 2026: जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टच्या सेवांमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली. गुरुवार रात्री उशिरापासून मायक्रोसॉफ्टची अत्यंत महत्त्वाची ईमेल सेवा 'आउटलुक' आणि 'मायक्रोसॉफ्ट 365' चे सर्व्हर अचानक ठप्प पडले. या तांत्रिक अडचणीमुळे भारतासह जगभरातील लाखो युजर्सना ईमेल पाठवणे, प्राप्त करणे आणि आपल्या खात्यात लॉग-इन करणे कठीण झाले. मायक्रोसॉफ्टच्या या सेवा विस्कळीत झाल्यामुळे कोट्यवधी कॉर्पोरेट कार्यालये आणि व्यावसायिकांच्या दैनंदिन कामकाजाचा वेग पूर्णपणे मंदावला.
ऑनलाइन सेवांच्या तांत्रिक बिघाडावर लक्ष ठेवणाऱ्या 'डाउनडिटेक्टर' या प्लॅटफॉर्मनुसार, ईस्टर्न टाईमनुसार दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आउटलुकमध्ये ही समस्या सुरु झाली. पाहता पाहता जगभरातून तक्रारींचा ओघ वाढला आणि काही वेळातच आउटलुकसंदर्भात तब्बल एक लाखाहून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या. तसेच, मायक्रोसॉफ्ट 365 बाबतही 15 हजारांहून अधिक युजर्सनी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्या.
मायक्रोसॉफ्टने (Microsoft) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत या सर्व्हर आउटेजला दुजोरा दिला. सुरुवातीला हा तांत्रिक बिघाड केवळ अमेरिकेपुरता मर्यादित असल्याचे वाटत होते, परंतु नंतर कंपनीने याचा फटका जागतिक स्तरावर कोणत्याही क्षेत्रातील युजर्सना बसू शकतो, असे स्पष्ट केले. तांत्रिक टीम युद्धपातळीवर ही समस्या सोडवण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटी पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कंपनीने म्हटले.
दरम्यान, मायक्रोसॉफ्टने नुकतीच आपल्या 60,000 कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने नोकरी सोडण्याची विशेष ऑफर दिल्याची बातमी चर्चेत होती. कंपनी एआय आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत असताना, कंपनीबाहेर करिअर करु इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता. अशातच आता सर्व्हर डाऊन झाल्याने कंपनीसमोर मोठे तांत्रिक आव्हान उभे राहिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.