

Trump Signs Sanctioning Russia & Iran Act 2026: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि इराणविरोधातील अत्यंत कडक मानल्या जाणाऱ्या ‘सॅन्क्शनिंग रशिया अँड इराण ॲक्ट ऑफ 2026’ या विधेयकावर स्वाक्षरी केली असून आता या कायद्याची अंमलबजावणी सुरु झाली. या नव्या कायद्यामुळे रशियावर अत्यंत कठोर आर्थिक निर्बंध लादले जाणार आहेतच, शिवाय रशियाकडून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची मोठ्या प्रमाणावर खरेदी करणाऱ्या देशांवर तब्बल 100 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादण्याचा मार्ग मोकळा झाला.
रशियाकडून (Russia) मोठ्या प्रमाणात इंधन आयात करणाऱ्या देशांमध्ये भारत आणि चीनचा अग्रक्रमाने समावेश असल्याने, दोन्ही देशांवर अमेरिकेच्या या आर्थिक निर्णयाचा मोठा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली. सध्या अमेरिका भारतावर 18 टक्के आणि चीनवर 34 टक्के टॅरिफ आकारते, ज्यामध्ये आता प्रचंड वाढ होऊ शकते.
व्हाईट हाऊसने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ट्रम्प यांनी 18 सप्टेंबर रोजी लिंडसे ग्राहम पुरस्कृत या विशेष कायद्यावर स्वाक्षरी करुन रशिया आणि इराणला चारी मुंड्या चित करण्याचा प्रयत्न केला. हा कायदा राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर पुढील 30 दिवसांच्या आत पूर्ण शक्तीने प्रभावी होईल. कायद्यातील तरतुदींनुसार, गेल्या 12 महिन्यांत रशियन कच्च्या तेलाचे किंवा नैसर्गिक वायूचे सर्वाधिक खरेदीदार राहिलेल्या पहिल्या 5 देशांमधून अमेरिकेत येणाऱ्या उत्पादनांवर तब्बल 100 टक्क्यांपर्यंत कर लादला जाऊ शकतो.
सध्या भारत आपल्या गरजेच्या 40 टक्क्यांहून अधिक कच्चे तेल रशियाकडून खरेदी करत असल्याने भारतावर या कारवाईची टांगती तलवार आहे. भारताव्यतिरिक्त चीन, स्लोव्हाकिया, हंगेरी आणि अझरबैजान हे देश अमेरिकेच्या रशियन तेल खरेदीदारांच्या या यादीत समाविष्ट आहेत.
अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये अतिशय अटीतटीच्या मतदानात 214 विरुद्ध 211 मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आले होते. या कायद्याच्या माध्यमातून रशियन ऊर्जा क्षेत्रासोबतच मॉस्कोच्या संरक्षण उद्योगाला मदत करणाऱ्या आणि रशियाच्या तथाकथित ‘शैडो फ्लीट’ ला पाठिंबा देणाऱ्या परदेशी संस्था, जहाजांचे मालक, ऑपरेटर, व्यवस्थापक आणि विमा कंपन्यांवरही थेट कारवाई केली जाणार आहे.
मात्र, या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे पूर्ण अधिकार राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडेच ठेवण्यात आले आहेत. कोणत्या देशावर किती टॅरिफ लावायचा किंवा कोणाला निर्बंधातून सवलत द्यायची, याचा अंतिम निर्णय ट्रम्पच घेणार असल्याने आता भारताच्या मुत्सद्देगिरीची आणि जागतिक व्यापाराची मोठी परीक्षा ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.