

London Train Accident: लंडनच्या उत्तरी भागातील बेडफोर्ड परिसरात शुक्रवारी (19 जून) दुपारी दोन प्रवासी ट्रेनची जोरदार टक्कर होऊन भीषण अपघात झाला. या काळीज हेलावून टाकणाऱ्या अपघातामध्ये एका ट्रेन चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, 80 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी 11 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून इतर 22 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण ब्रिटनमध्ये एकच खळबळ उडाली. प्रशासनाने या अपघाताला 'मोठी दुर्घटना' म्हणून घोषित केले.
दुसरीकडे, अपघाताची (Accident) माहिती मिळताच आपत्कालीन सेवा आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले.
रेल ट्रॅकिंग वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताला बळी पडलेल्या दोन्ही ट्रेन लंडनच्या सेंट पॅनक्रास स्टेशनच्या दिशेने दक्षिणकडे जात होत्या. बेडफोर्ड शहराच्या बाहेर स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास हा अपघात झाला. तिथे आधीच उभी असलेल्या एका ट्रेनला मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनने जोरात धडक दिली. धडक झाली त्यावेळी ट्रेनचा वेग फारसा जास्त नव्हता, तरीही दोन्ही गाड्यांची टक्कर एवढी भीषण होती की, डब्यातील प्रवाशांना जोरदार झटका बसला आणि मोठ्या संख्येने लोक जखमी झाले.
या धडकेमुळे अनेक प्रवाशांचे हात-पाय फ्रॅक्चर झाले असून संपूर्ण डब्यात रक्ताचे थारोळे आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या. एका प्रवाशाने सांगितले की, तो इतका थक्क झाला होता की, डब्याच्या दरवाजातील बारीक फटीतून त्याने कसेबसे रांगत बाहेर पडून आपला जीव वाचवला.
घटनेची गांभीर्याने दखल घेत आपत्कालीन सेवा विभागाने घटनास्थळी एअर अॅम्ब्युलन्स, ईस्ट ऑफ इंग्लंड अॅम्ब्युलन्स सर्व्हिसच्या विशेष आपत्ती व्यवस्थापन पथकासह अनेक तुकड्या रवाना केल्या. बेडफोर्डशायर पोलीस, स्थानिक अग्निशामक दल आणि बचाव पथकांनी संयुक्तपणे प्रवाशांना रेस्क्यू केले. सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये अनेक जखमी प्रवासी रेल्वे ट्रॅकच्या कडेला असलेल्या रस्त्यावर हतबल होऊन बसलेले दिसत होते. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या 'आरएमटी युनियन'ने रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.
ईस्ट मिडलँड्स रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कॉर्बीहून सेंट पॅनक्रासकडे जाणाऱ्या ट्रेनची नॉटिंघमहून येणाऱ्या ट्रेनशी टक्कर झाली. या अपघातानंतर सेंट पॅनक्रास स्टेशनवरुन सुटणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व गाड्या शुक्रवारसाठी रद्द करण्यात आल्या.
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी या रेल्वे अपघातावर तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी लिहिले की, "बेडफोर्डजवळ दोन प्रवासी ट्रेनची टक्कर झाल्याची बातमी अत्यंत चिंताजनक आहे. माझी पहिली संवेदना त्या मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबासोबत आहे, ज्याने या दुर्घटनेत आपला जीव गमावला, तसेच गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांच्याही पाठीशी मी उभा आहे." संकटसमयी तातडीने धावून जात बचावकार्य करणाऱ्या सर्व आपत्कालीन यंत्रणांचे आणि वैद्यकीय पथकांचेही पंतप्रधानांनी आभार मानले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.