Iran-Pakistan Relations: इराणने अलीकडेच पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात क्षेपणास्त्र हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी सैन्याने इराणच्या सिस्तान प्रांतावर हल्ला केला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, चीनचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री सन वेइडोंग यांनी सोमवारी सांगितले की, त्यांचा देश दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरुन मतभेद दूर करता येतील. विदोंग यांचे हे वक्तव्य त्यांच्या इस्लामाबाद दौऱ्यादरम्यान आले आहे.
दरम्यान, 26 जानेवारी 2024 पर्यंत दोन्ही देशांचे राजदूत आपापल्या पदावर परत जातील यावर पाकिस्तान आणि इराणने परस्पर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र विभागाने सोमवारी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्री जलील अब्बास जिलानी यांच्या निमंत्रणावरुन इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्लायान 29 जानेवारीला पाकिस्तानला भेट देणार असल्याचेही पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे.
दुसरीकडे, इराणमधील पाकिस्तानचे राजदूत मुदस्सीर टिपू यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये लिहिले की, पाकिस्तान आणि इराण या दोन्ही देशांच्या नेतृत्वाने आव्हानात्मक स्थिती हुशारीने हाताळली आणि त्वरीत संबंध पुन्हा रुळावर आणले याचा मला आनंद आहे. ते पुढे म्हणाले की, दोन्ही देशांनी एकत्रितपणे या प्रदेशात शांतता आणि विकासाला चालना दिली पाहिजे.
दरम्यान, 16 जानेवारीला इराणच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानात घुसून काही दहशतवादी संघटनांच्या तळांना लक्ष्य केले होते. यावर नाराजी व्यक्त करत पाकिस्तानने 17 जानेवारीला इराणमधून आपले राजदूत परत बोलावल्याचे जाहीर केले होते. एका दिवसानंतर, 18 जानेवारी रोजी, पाकिस्तानने देखील इराणमधील दहशतवाद्यांच्या लपलेल्या ठिकाणांवर हल्ला करुन प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये दोन मुले ठार झाली आणि तीन मुली जखमी झाल्या. इराणच्या लष्कराने पाकिस्तानच्या भूमीवरील जैश अल-अदलच्या तळांना लक्ष्य केल्याचे सांगितले होते. त्याचवेळी, पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) च्या तळांना लक्ष्य करण्याचा दावा केला होता. दोन्ही देशांमध्ये या हल्ल्यांचे वर्णन त्यांच्या सार्वभौमत्वावरील हल्ला असे करण्यात आले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.