

Indian Tourists Stealing in Bali Hotel: भारताबाहेर पर्यटनासाठी गेल्यानंतर आपल्या वर्तणुकीतून देशाची प्रतिमा उजळण्याऐवजी, काही पर्यटकांच्या संतापजनक कृत्यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर लाज काढल्याची घटना समोर आली. इंडोनेशियाची राजधानी बाली येथे फिरायला गेलेल्या भारतीय पर्यटकांच्या एका गटाने चक्क मुक्कामाच्या हॉटेलमधून वस्तूंची चोरी केल्याचे उघड झाले.
चेकआउटच्या वेळी हॉटेल कर्मचाऱ्यांनी संशयावरुन त्यांच्या बॅगा तपासल्या असता, त्यातून हेअर ड्रायर, पायपुसणी, टीव्ही रिमोट आणि हॉटेलची भांडी यांसारख्या वस्तू जप्त करण्यात आल्या. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून जगभरातून या पर्यटकांवर टीकेची झोड उठत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार भारतीय पर्यटकांचा एक समूह बालीच्या गियान्यार भागातील 'अस्वारा रिसॉर्ट उबुद' या आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. 16 एप्रिल रोजी दोन खोल्या बुक करुन हे पर्यटक वास्तव्यास आले होते. 19 एप्रिल रोजी सकाळी जेव्हा ते चेकआउट करुन जाण्याच्या तयारीत होते, तेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा चोरीचा प्रकार समोर आला. हॉटेलच्या नियमानुसार खोल्यांची तपासणी केली असता, काही वस्तू जागेवर नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी पर्यटकांना थांबवून त्यांच्या सूटकेस उघडण्याची विनंती केली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रिसॉर्टचे कर्मचारी रिसेप्शनजवळ पर्यटकांच्या बॅगा उघडून त्यातील वस्तू बाहेर काढताना दिसत आहेत. यावेळी पर्यटक अत्यंत अस्वस्थ असून नजर चोरताना दिसत आहेत. बॅगांमधून बाथ टॉवेल, पूल टॉवेल, गाऊन, हेअर ड्रायर, जेवणाची भांडी, पायपुसणी आणि अगदी टीव्ही रिमोटचा बॉक्सही हस्तगत करण्यात आला.
बाली टाइम्सच्या वृत्तानुसार, स्थानिक पोलीस प्रवक्त्यांनी या घटनेला दुजोरा दिला. मात्र, रिसॉर्ट प्रशासनाने हे प्रकरण कायदेशीर पातळीवर नेण्याऐवजी सामोपचाराने सोडवण्याचा निर्णय घेतला. पर्यटकांनी (Tourists) सर्व चोरलेल्या वस्तू परत केल्या आणि दोन्ही बाजूंनी कोणत्याही कायदेशीर तक्रारीशिवाय प्रकरण मिटवण्यावर सहमती दर्शवली. या सामंजस्यामुळे पर्यटकांना तेथून जाण्याची परवानगी मिळाली असली तरी, इंटरनेटवर या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
'X' वर एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले की, "हे लोक परदेशात फिरण्याचा खर्च तर करु शकतात, पण स्वतःसाठी चमचे आणि टॉवेल खरेदी करु शकत नाहीत का?" तर दुसऱ्या एका युजरने चिंता व्यक्त केली की, "भारतीयांच्या शिस्तीबद्दल आणि नागरी कर्तव्याबद्दल जगभरात आधीच नकारात्मक समज आहेत, अशा स्वस्त कृत्यांमुळे कामाच्या निमित्ताने वारंवार प्रवास करणाऱ्या सुसंस्कृत भारतीयांसाठी भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात." या घटनेने परदेशात फिरताना आपण देशाचे प्रतिनिधी असतो, याचे भान राखणे किती गरजेचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.