Iran America War: पुन्हा इतिहास मोठं वळण घेईल?

West Asia vs Middle East terminology: आखाती युद्ध, मध्यपूर्वेतील युद्ध, पश्चिम आशियाई युद्ध एकाच युद्धाची किती विविध प्रकारे वर्णने केली जातात.
Iran America War
Iran America WarDainik Gomantak
Published on
Updated on

आखाती युद्ध, मध्यपूर्वेतील युद्ध, पश्चिम आशियाई युद्ध एकाच युद्धाची किती विविध प्रकारे वर्णने केली जातात. मध्यपूर्व आशिया आणि पश्चिम आशिया हे जरी भूभाग एक असले तरी त्या संज्ञांना वेगळ्या अर्थाचे परिमाण लाभलेले आहे. काहींना हा प्रदेश पश्चिमेकडील वाटतो तर काहींना पूर्वेकडील. मध्य पूर्व या संज्ञेचा उगम १८५०च्या दशकात ब्रिटिश इंडिया ऑफिसमध्ये झाला. अमेरिकन नौदल रणनीतिकार अल्फ्रेड थायर यांनी १९०२मध्ये अरब आणि भारत यांच्यातील क्षेत्र निर्दिष्ट करण्यासाठी हा शब्द वापरल्यानंतर हे नाव मोठ्या प्रमाणात वापरले गेले.

तथापि, हा शब्द प्रामुख्याने युरोसेंट्रिक संदर्भात ऑटोमन साम्राज्य आणि आसपासच्या प्रदेशांचा संदर्भ घेण्यासाठी वापरला जात असे. ‘पश्चिम आशिया’ हा एक आधुनिक लोकप्रिय शब्द आहे. विशेषत: शैक्षणिक आणि भू-राजकीय संदर्भांमध्ये, अचूक वर्णन करण्यासाठी वापरात येतो. १४५३ ते १७७४ या काळात तुर्कस्तानने पाचशे वर्षांपूर्वी रेशमी मार्ग बंद केला व नव्या सागरीमार्गांचा शोध लावणे आवश्यक बनले. त्यातूनच अमेरिका नावाचा भूभाग आहे हे उर्वरित जगाला कळले. इतिहासातील एक मोठे वळण ह्या रास्ता-रोको मुळेच लाभले!

Iran America War
Goa Education: सरकारी शाळांत 380 शिक्षकांची पदे रिक्त, 'त्‍या' निर्णयामुळे शिक्षक भासणार कमी

पश्चिम आशियातील ताज्या युद्धामुळे मन भूतकाळात गेलं. मानवी इतिहासात युद्धे विविध कारणास्तव झाली आहेत. अन्न-निवारा इथपासून गुरे-ढोरे, गूळ- तांदूळ, मिरी-मिरची, चहा -कॉफी कापूस -रेशीम, अफू -तंबाखू, धर्म- पंथ, वंश, अर्थ, राष्ट्र असे अनेक विषय इतिहासातील युद्धाला पुरलेले आहेत. ह्या पूर्वी एके काळी युद्धामुळे झालेला नरसंहार पाहून काहींची मने बदलली. अस्त्रे टाकून शांततेचा मार्ग स्वीकारला. बुद्ध धर्म दक्षिण भारतात पोचण्याचा दरम्यानच पश्चिम आशियातून विस्थापित झालेले ज्यू केरळात पोचले व मलबारी ज्यू बनले.

पाठोपाठ सागरी मार्गाने ख्रिश्चन धर्म इ.स. ५२ च्या सुरुवातीच्या काळात सेंट थॉमसबरोबर भारतात म्हणजे केरळमध्ये पोचला. आणि तेथे ख्रिस्ती धर्माने मूळ धरले. त्यानंतर भारतात इतरत्र तो धर्म पोचला. नंतर अरब मुसलमान, पोर्तुगीज दर्यावर्दी यांचा केरळात पोचण्याचा मार्ग अरबी सागर होता. म्हणजे हा सगळा प्रवास पश्चिमेकडून पूर्वेला झाला का?

अरबी समुद्राला एडन, ओमान, कच्छ आणि खाम्बट अशी चार प्रमुख आखात (र्ॠीश्रष )आहेत. त्यातील ओमानचे आखात पर्शियन आखाताला जोडलेले आहे. पर्शियन आखात हे अरबी समुद्राचा भाग असा मानला जात नाही आखाती देश म्हणून आपल्याला परिचित आहेत ते ह्या पर्शियन गल्फच्या भोवतालचे. प्राचीन इतिहासात ‘सिंधुसागर’ नावाने ओळखला जाणाऱ्या ह्या समुद्राचे नाव अरबी समुद्र नेमके कधी बदलले ते हुडकणे कठीण आहे.

भारतासह पूर्व आशियातील देश व हिंदी महासागरातून होणाऱ्या जल वाहतुकीवर व व्यापारावर अरबांचे नियंत्रण आले आणि समुद्राची ओळख बदलली. अरब म्हणजे नेमके काय? ‘अरब’ (घ्-ी-ल) या शब्दाचा अर्थ ‘वाळवंट’, ‘भटकेपणा’, ‘पश्चिम’ किंवा ‘ओलांडणे’ अशा मूळ अर्थाच्या शब्दांकडे संबंधित असावा. सुरुवातीला शेजारील प्रदेशातील विकसित झालेल्या संस्कृतींनी त्यांचे वर्णन करण्यासाठी याचा वापर केला.

Iran America War
Goa Mankurad Mango: 5 हजारांवरून दर थेट 800 रुपयांवर, स्वस्त झाला 'मानकुराद'! येत्या आठवड्यात दर अजून कोसळण्याची शक्यता

बायबलमधील हिब्रू भाषेत, याचा संबंध ‘अरावा’ (अरण्य) आणि ‘एरेब’ (मिश्रण/पश्चिम) यांच्याशी आहे. तर अरब भूमी म्हणजे मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील प्रदेश, जिथे प्रामुख्याने अरबी भाषिक लोक राहतात आणि जो बहुतांशी अरब लीगच्या २२ सदस्य राष्ट्रांशी (उदा. सौदी अरेबिया, इजिप्त, इराक, अल्जेरिया) संबंधित आहे. ह्या विवेचनात पर्शिया म्हणजे इराण येत नाही याची नोंद घेणे आवश्यक आहे. पर्शियन आणि अरब हे भिन्न भाषा, इतिहास आणि सांस्कृतिक ओळख असलेले वेगवेगळे वांशिक गट आहेत.

पर्शियन प्रामुख्याने इराणचे असून ते इंडो-युरोपियन फारसी बोलतात, तर अरब हे जगभरातील विविध राष्ट्रांचे रहिवासी असून त्यांचा भाषिक आणि सांस्कृतिक वारसा जवळचा आहे. धर्म जरी एक असला तरी भाषा, संस्कृती आणि वंश वेगळे आहेत. एकदा ह्या गोष्टी ध्यानात आल्या की होर्मूझ स्ट्रेट असली तरी सरळ का नाही, ते समजायला सोपे जाते. काही शतकांपूर्वी गूळ, मिरी व्यापाराचा ताबा राखण्यासाठी इथे संघर्ष होत होता. त्याला धर्म प्रसाराची जोड मिळाल्याने तीव्रता प्राप्त झाली. नंतर अरबी घोडे, कापूस, चहा , तंबाखू असे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे जिन्नस आले. शतकापूर्वी इथे तेलाचे साठे मिळाले.

अरबी समुद्रातील नैसर्गिक वादळे गेल्या दोन शतकात ५०% वाढली. त्या वादळांची तीव्रता व एकूण वेळ ह्यातदेखील बरीच वाढ झाल्याचे तज्ज्ञ मंडळींना आढळून आले आहे. भारताची पश्चिम किनारपट्टी परशुरामाने समुद्र मागे हटवून केली अशी एक आख्यायिका आहे. त्याच परशुरामाची क्षत्रियांबाबतची प्रतिज्ञा आणि एकवीस वेळा केलेले प्रयत्न ही दंतकथा मानली तरी त्यातील मथितार्थ ध्यानात घ्यायला हरकत नाही.

कुठलाही वंश, धर्म किंवा राष्ट्र यांचा पूर्ण नाश करण्याचे प्रयत्न ‘रिअर व्ह्यू मिरर’मध्ये तरी दिसत नाही. मानवाची दुर्दम्य इच्छा भेदणारी अस्त्रे जेवढी तयार होतील तेवढीच दुसऱ्या बाजूने त्याचा प्रतिकार करणारी यंत्रणा उभी राहणार हे नक्की. गाडी हाकताना जरूर असेल तेव्हा रिअर व्ह्यू आरशात चालक पाहतो. ते किंचित वेळ. बहुतांश वेळ पुढे पाहूनच गाडी चालवावी लागते.

सध्या अरबस्थान व आसपासच्या भागात युद्धाचा वणवा पसरलेला आहे. १९७३- १९७४च्या सुमारास अरब - इस्राइल यांच्या दरम्यान योम किप्पूर युद्ध झाले. ह्याला रमदान युद्ध ह्या नावाने ओळखले जाते. हिब्रू धर्मात योम किप्पूर हा एक पवित्र दिवस मानला जातो. ह्याच दिवशी अरब देशांनी एकत्रितपणे इस्राइल वर अचानक हल्ला केला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑक्टोबरचा तो महिना रमजानचा होता. भारताने तेलाचे राजकारण ध्यानात घेऊन अरबांची बाजू घेतली. तेलाचे भाव प्रचंड वाढले व महागाई प्रचंड वाढली. आज मुस्लीम राजवट असूनदेखील इराण एकाकी पडल्याचे दिसत आहे. त्याला १९७४च्या युद्धाची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते.

इजिप्तसह सगळे अरब इस्राइलविरुद्ध लढत असताना इराणचे शाह मोहम्मद रझा पहलवी यांनी योम किप्पूर युद्धादरम्यान इस्राइलला लष्करी मदत करून खुला पाठिंबा दर्शविला. त्यातून शाह यांनी पाश्‍चात्त्य देशांकडे हातमिळवणी केली. युद्ध थांबले व इराणला सौदेबाजीचा मोबदला मिळाला. वाढलेल्या तेल दराचा प्रचंड फायदा इराणला झाला आणि तिथे आर्थिक सुबत्ता आली ती ह्या युद्धामुळे. त्यातूनच इराणचे शाह अमेरिकेचे बाहुले असल्याची भावना झाली व नंतर धार्मिक उठावात राजवट बदलली. अमेरिकी आणि इतर भांडवलदारी देश मनमानीसाठी कुठल्या तरी ‘शाहच्या’ शोधात असतात. आजचे युद्धदेखील त्याच हेतूने चालले आहे. इराणची अणू बॉम्ब सिद्धता हा केवळ एक बहाणा आहे

आता पश्चिम आशियातील महत्त्वाची होर्मूझ नावाची समुद्रधुनीची बंद करण्याचा मार्ग इराणने अवलंबला त्याला बऱ्याच अंशी अमेरिका जबाबदार आहे. अशा बंद केलेल्या समुद्रधुनीमुळे पुन्हा एकदा इतिहास मोठं वळण घेण्याची चिन्हे आहेत. ह्या युद्धामुळे अमेरिका- इस्राइल तसेच इराण ह्यांचे जागतिक राजकारणातील महत्त्व कमी होईल की नाही हे उद्याचा काळ ठरवेल.

- मधुसूदन जोशी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com