
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) पोहोचलेले पहिले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि अन्य तीन अंतराळवीरांचा पृथ्वीवरील परतीचा प्रवास सोमवारी (ता.१४) सुरू होणार आहे. ‘ॲक्सिओम स्पेस’ने ही माहिती शुक्रवारी दिली.
शुक्ला यांच्यासह ‘नासा’च्या पेगी व्हिटसन, पोलंडचे स्लावोझ उझांस्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे सर्व अंतराळवीर १४ दिवसांपासून ‘आयएसएस’वर मुक्कामास असून तेथील प्रयोगशाळेत विज्ञान, शिक्षण आणि व्यावसायिक असे अनेक प्रयोग त्यांनी केले आहेत.
स्पेसएक्स ड्रॅगन यानाच्या हार्मनी मोड्यूलमधून सोमवारी भारतीय वेळेनुसार सायंकाळी चार वाजून ३५ मिनिटांनी त्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल, असे ‘ॲक्सिओम स्पेस’ने सोशल मीडियावरून आज जाहीर केले आहे. त्यानंतर काही तासांनी पॅसिफिक महासागरात कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ यान उतरणार आहे. तेथे तैनात मदत पथकांद्वारे अंतराळवीरांना सुखरूप बाहेर काढण्यात येईल.
‘नासा’च्या व्यावसायिक अंतराळ कार्यक्रमाचे व्यवस्थापक स्टिव्ह स्टिच पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, ‘‘ अवकाश मोहिमेबरोबर आम्ही काम करीत असून ‘अॅक्सिओम-४’ च्या वाटचालीवर आमचे लक्ष आहे. १४ जुलैला यानाचा प्रवास पुन्हा सुरू करणे हे सध्या आमचे ध्येय आहे.’’ भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा हे १९८४ मध्ये अंतराळात गेले होते. त्यानंतर ४१ वर्षांनी अंतराळात जाणारे शुक्ला हे दुसरे भारतीय तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर आहेत.
‘आयएसएस’वर असताना शुक्ला यांनी भारतासाठी सात विशिष्ट प्रयोग केले. देशाच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मानवी अंतराळ कार्यक्रमासाठी ते महत्त्वाचे आहेत. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात होणारी स्नायूंची झीज, संगणकाच्या मदतीने मेंदूद्वारे दुसऱ्या यंत्राशी थेटपणे संवाद साधण्याची प्रणाली विकसित करणे आणि अवकाशात हरभरा आणि मेथी बियांची उगवण असे प्रयोग त्यांनी केले. लखनौ आणि केरळमधील विद्यार्थ्यांची त्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवादही साधला.
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे सुखरूप परत येण्याची वाट पाहत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्याशी बोलून आनंद आणि अभिमान वाटल्याचे त्यांनी सांगितले. शुक्ला यांचे वडील शंभू दयाल शुक्ला आणि अन्य कुटुंबीयांनी लखनौ येथील घरातून ‘पीटीआय व्हिडिओ’शी संवाद साधला. ‘‘ॲक्सिओम -४’ मोहिमेची वाटचाल सुरळीत असल्याचे ऐकून समाधान वाटले. अंतराळात सर्व काही ठिक आहे. त्याचे काम व्यवस्थित सुरू आहे, हे पाहून खूप छान वाटले. तो कुठे काम करतो, कुठे झोपतो, त्याची प्रयोगशाळा आणि त्याची दैनंदिन दिनचर्या कशी असते, हे त्याने आम्हाला दाखविले, ’’ असे ते म्हणाले.
अंतराळातून पृथ्वी आणि विश्व किती सुंदर दिसते, हे त्याने आम्हाला सांगितले. तो जिथे काम करतो आणि राहतो ते अंतराळ स्थानकही त्याने दाखवले. हे सर्व पाहून खूप समाधान वाटले. त्याहूनही अधिक म्हणजे आमच्या मुलाला तेथे चांगले काम करताना पाहून खूप आनंद झाला.
आशा शुक्ला, शुंभाशू शुक्लाची आई
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.