Doctor Shot Dead In Karachi: पाकिस्तानमध्ये आणखी एका हिंदू डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेत हिंदू डॉक्टरांचा सहाय्यक जखमी झाला आहे.
पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, कराची महानगरपालिकेचे सेवानिवृत्त संचालक आणि नेत्रतज्ज्ञ डॉ. बिरबल जेनानी यांची लियारी एक्सप्रेसवेजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात त्यांचे सहायक डॉक्टर कुरात-उल-ऐन जखमी झाले.
दरम्यान, गुरुवारी संध्याकाळी शहरातील गार्डन भागात आपल्या खाजगी दवाखान्यातून बाहेर पडत असताना सशस्त्र हल्लेखोरांनी डॉक्टरांच्या गाडीवर गोळीबार करुन त्यांची हत्या केल्याचे सांगितले जात आहे.
घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हे टार्गेट किलिंगचे प्रकरण असल्याचा संशय आहे.
डॉ.बिरबल यांच्या डोक्यात दोन गोळ्या लागल्याचे पोलिसांनी सांगितले. 6:46 वाजता डॉ. बिरबल यांना रुग्णालयात आणले तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
दुसरीकडे, डॉ. बिरबल यांचे सहकारी डॉ. कुरुतुलेन यांच्या खांद्यावर गोळी लागली आहे, मात्र त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
तसेच, दक्षिण पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) इरफान अली बलोच यांनी सांगितले की, ही घटना लक्ष्यित हत्या असल्याचे दिसते, परंतु नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.
त्याचवेळी एसएसपी आरिफ अजीज यांनी सांगितले की, डॉ. बिरबल रोज त्यांच्या सहाय्यकाला घरी सोडत असत. या घटनेसंदर्भात जखमीची चौकशी करण्यात येत आहे.
दुसरीकडे, पाकिस्तान (Pakistan) मेडिकल असोसिएशनचे (पीएमए) महासचिव डॉ. अब्दुल गफूर शोरो यांनी या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या घटनेचा निषेध करताना ते म्हणाले की, डॉ बिरबल यांनी लियारी येथील स्पेन्सर आय हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक आणि केएमसीच्या आरोग्य सेवा संचालक म्हणून काम केले होते.
या महिन्यात पाकिस्तानात हिंदू (Hindu) डॉक्टरवर हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानातील हैदराबाद येथील डॉ धरम देव राठी यांची त्यांच्या ड्रायव्हरने घरातच हत्या केली होती. पोलिसांनी पाकिस्तानी न्यूज आउटलेट द नेशनला सांगितले की, ड्रायव्हरने चाकूने डॉक्टरांचा गळा चिरला होता.
पोलिसांनी धरम देव राठी यांच्या चालकाला त्याच्या खैरपूर येथील घरातून अटक केली असून त्याची ओळख हनिफ लेघारी असे आहे.
डॉक्टरांच्या कूकने पोलिसांना सांगितले की, घरी जाताना दोघांमध्ये बाचाबाची झाली. घरी पोहोचल्यानंतर ड्रायव्हरने किचनमधून चाकू काढला आणि त्यांच्याच घरात डॉक्टरची हत्या केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.