Netherlands Leader Geert Wilders: नेदरलँडचे पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत असलेले नेते गीर्ट वाइल्डर्स यांनी पुन्हा एकदा भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिला आहे. वाइल्डर्स यांनी ट्विट करत नूपूर यांच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव केला.
नुपूर शर्माला भेटण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली. प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल तीव्र टीका होत असताना विल्डर्स यांनी दोन वर्षांपूर्वी नुपूर शर्माचे उघडपणे समर्थन केले होते. मात्र, या वक्तव्यानंतर भाजपने नुपूर यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. गीर्ट यांनी तेव्हा म्हटले होते की, नुपूरवर झालेली टीका आणि कारवाई निराधार आहे कारण त्या काहीही चुकीचे बोलल्या नव्हत्या. आता पुन्हा एकदा वाइल्डर्स यांनी नुपूरला पाठिंबा दिला आहे.
गीर्ट वाइल्डर्स यांनी शनिवारी सकाळी ट्विट केले की, "मी नूपुर शर्मा यांना पाठिंबा देणारा संदेश पाठवला आहे. त्या एक धाडसी आहेत, ज्यांना केवळ सत्य बोलण्यासाठी कट्टर इस्लामवाद्यांकडून सतत धमक्या येत आहेत. त्यांना पाठिंबा द्यायला हवा. मी भारत दौऱ्यावर गेल्यावर त्यांना भेटेन.''
दरम्यान, गीर्ट वाइल्डर्स यांनी गेल्या काही वर्षांत सातत्याने इस्लामविरोधी वक्तव्ये केली आहेत. निवडणुकीदरम्यानही मुस्लिमांना विरोध हा गीर्ट यांच्या पक्षाच्या प्रचाराचा भाग होता. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी इस्लामिक हेडस्कार्फ घालणे बेकायदेशीर ठरवणे, मशिदी बंद करणे आणि कुराणवर बंदी घालणे अशी आश्वासने दिली होती, ज्यावर अनेक देश आणि संघटनांनी टीकाही केली होती. निवडणुकीनंतरही (Election) त्यांनी मुस्लिमांबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या वक्तव्याबाबत अनेक खटलेही त्यांच्यावर आहेत.
वाइल्डर्स यांचा पक्ष पीव्हीव्हीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत 37 जागा जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. नेदरलँडच्या संसदेत बहुमतासाठी 76 जागा आवश्यक आहेत. अशा स्थितीत बहुमत गाठण्यासाठी इतर पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी अलीकडेच NSC, BBB ॲग्रिरियन पार्टी आणि केंद्र-उजव्या VVD पक्षाशी सरकारमध्ये सामील होण्यासाठी चर्चा केली आहे. मात्र, एनएससीने अलीकडेच त्यांच्यासोबतच्या युतीतून माघार घेतली. त्यामुळे गीर्ट यांच्या पंतप्रधान होण्याच्या शक्यतांनाही मोठा धक्का बसला आहे. नेदरलँडमधील (Netherlands) राजकीय स्थिती येत्या काही दिवसांत स्पष्ट होऊ शकते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.