

Trump Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी (10 नोव्हेंबर) आपल्या टॅरिफ धोरणाचे आक्रमकपणे समर्थन केले. या धोरणावर टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांनी थेट "मूर्ख" (Fools) संबोधले. एवढेच नाहीतर टॅरिफमुळेच अमेरिकेने मोठी आर्थिक प्रगती केल्याचा दावाही केला.
ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल' (Truth Social) वर एका पोस्टमध्ये त्यांचे मत मांडले. ते म्हणाले, "जे लोक टॅरिफच्या विरोधात आहेत, ते मूर्ख आहेत!" ट्रम्प यांनी दावा केला की, टॅरिफच्या धोरणामुळेच अमेरिका आज "जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात प्रतिष्ठित देश" बनला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, अमेरिकेतील आर्थिक परिस्थिती आतापर्यंतची सर्वोत्तम आहे. देशात महागाई "जवळजवळ शून्य" आहे आणि शेअर बाजार विक्रमी मूल्यावर पोहोचला आहे. तसेच, अमेरिकन नागरिकांच्या बचत योजना (401k) आजवरच्या सर्वात उच्चांकावर आहेत.
ट्रम्प यांनी पुढे बोलताना सांगितले की, टॅरिफच्या माध्यमातून अमेरिका "ट्रिलियन डॉलर्स" (Trillions of Dollars) चा महसूल कमावत आहे. यामुळे अमेरिका लवकरच आपले $37 ट्रिलियन (37 लाख कोटी डॉलर) इतके मोठे कर्ज फेडण्यास सुरुवात करु शकेल.
टॅरिफ धोरणाचे फायदे स्पष्ट करताना ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांना मोठे आर्थिक आश्वासन दिले. या महसुलातून लवकरच देशातील प्रत्येक व्यक्तीला किमान 2,000 (दोन हजार डॉलर) इतका लाभांश (Dividend) दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. हा लाभांश "उच्च उत्पन्न असलेल्या लोकांना वगळता" देशातील प्रत्येक नागरिकाला दिला जाईल.
देशात विक्रमी गुंतवणूक होत आहे, कारण "सर्वत्र नवीन कारखाने" उभे राहत आहेत, ज्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळत आहे, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, ट्रम्प यांनी या प्रस्तावित 2000 च्या लाभांशाची अंमलबजावणी कशी केली जाईल किंवा त्याची रुपरेषा काय असेल, याबद्दल कोणताही तपशील दिला नाही.
दुसरीकडे, ट्रम्प यांची ही विधाने अशा वेळी आली आहेत, जेव्हा त्यांच्या टॅरिफ धोरणांची कायदेशीरता तपासली जात आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 6 नोव्हेंबर रोजी ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात लागू केलेल्या जागतिक टॅरिफवर कायदेशीर चर्चा सुरु केली, ज्यामुळे त्यांनी बचाव केलेल्या धोरणांची सद्यस्थिती आणि कायदेशीर वैधता केंद्रस्थानी आली आहे.
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये टॅरिफ लावण्याच्या राष्ट्राध्यक्षांच्या अधिकारांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "दुसरे देश आमच्यावर टॅरिफ लावू शकतात, पण आम्ही त्यांच्यावर टॅरिफ लावू शकत नाही? हे त्यांचे स्वप्न आहे! केवळ टॅरिफमुळेच व्यवसाय अमेरिकेत येत आहेत. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाला हे सांगितले गेले नाही काय? नक्की काय चालले आहे??" ट्रम्प यांच्या या वक्तव्यांनी आगामी अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरील टॅरिफ आणि व्यापार धोरणांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.