

Donald Trump Dance: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या 5 दिवसांच्या आशियाई दौऱ्यासाठी रविवारी (26 ऑक्टोबर) मलेशियात पोहोचले. विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या स्वागतादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अचानक ठेका धरला आणि जोरदार ठूमके लावले. ट्रम्प यांना नाचताना पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. ट्रम्प यांच्या मलेशिया दौऱ्यातील हा डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ट्रम्प यांच्यासोबत मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम हे देखील व्हिडिओमध्ये थिरकताना दिसत आहेत.
मलेशियाला रवाना होण्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतच्या संभाव्य चर्चेबद्दल विचारले असता, त्यांनी थेट सांगितले की, "मी माझा वेळ वाया घालवणार नाही."
यावेळी ट्रम्प यांनी दावा केला की, रशियन राष्ट्राध्यक्षांनी अझरबैजान आणि आर्मेनिया यांसारख्या इतर संघर्षांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते. मात्र, रशिया-युक्रेन युद्ध थांबवणे हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प म्हणाले, ''मी माझा वेळ वाया घालवणार नाही. हा मात्र व्लादिमीर पुतिन यांच्याशी माझे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत."
आगामी आसियान (ASEAN) शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी ट्रम्प मलेशियाच्या दौऱ्यावर आहेत. मलेशियाला जाण्यापूर्वी, कतारमधील दोहा येथील अल-उदीद एअर बेसवर थांबून त्यांनी कतारचे अमीर तमीम बिन हमाद अल थानी आणि पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जसिम अल थानी यांचे विमानात स्वागत केले.
पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी मध्यपूर्वेत कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्याबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला, परंतु हमासला इशारा दिला की, जर त्यांनी इस्त्रायलसोबतच्या युद्धविराम कराराचे उल्लंघन केले, तर त्याचे गंभीर परिणाम होतील. ट्रम्प पुढे म्हणाले की, "मला वाटते की हा युद्धविराम टिकेल. जर तो टिकला नाही, तर ती हमासची (Hamas) चूक असेल. हमासशी सामना करणे इतके सोपे नाही. मला आशा आहे की तो हमाससाठीही टिकेल."
मलेशियानंतर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) जपान आणि दक्षिण कोरियाचा दौरा करणार आहेत. क्वालालंपूरमध्ये होणाऱ्या शिखर परिषदेदरम्यान ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात व्यापार युद्ध वाढू नये यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. चीनच्या निर्यात नियंत्रणांना प्रत्युत्तर म्हणून 1 नोव्हेंबरपासून अनेक टॅरिफ आणि व्यापार निर्बंध लागू होणार आहेत. ट्रम्प यांचा हा आशिया दौरा अनुकूल व्यापार करारांवर चर्चा करणे, टॅरिफ कमी करणे आणि अमेरिकेची निर्यात वाढवणे या उद्देशाने महत्त्वाचा ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.