

Chinese Gamer Viral Video: हॉटेलमध्ये राहण्याचे काही शिष्टाचार आणि अघोषित नियम असतात, ज्याचे पालन करणे प्रत्येक सुसंस्कृत पाहुण्याचे कर्तव्य मानले जाते. चेक-आउट करण्यापूर्वी आपली खोली शक्य तितकी व्यवस्थित ठेवणे, विजेची उपकरणे बंद करणे, वापरलेले टॉवेल्स नीट ठेवणे आणि कचरा डब्यात टाकणे यांसारख्या छोट्या गोष्टी हॉटेल कर्मचाऱ्यांप्रती असलेला आदर दर्शवतात. मात्र, चीनमधून एक अशी धक्कादायक घटना समोर आली, जिथे एका तरुणाने या सर्व शिष्टाचारांना हरताळ फासला.
एका हॉटेलच्या (Hotel) खोलीत सलग दोन वर्षे राहिल्यानंतर या व्यक्तीने खोलीची जी अवस्था केली, ती पाहून केवळ हॉटेल कर्मचारीच नाही तर संपूर्ण जग हादरुन गेले. एका ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाने ग्रासलेल्या या तरुणाने हॉटेलच्या रुमला अक्षरशः कचराकुंडी बनवले.
'द सन' ने दिलेल्या वृत्तानुसार, ही संतापजनक घटना चीनमधील (China) चांगचुन येथील एका हॉटेलमध्ये घडली. हा तरुण एक वेडा ऑनलाइन गेमर होता, ज्याने दोन वर्षांसाठी या हॉटेलमध्ये एक रुम बुक केली होती. विशेष म्हणजे, हे हॉटेल प्रामुख्याने 'ई-स्पोर्ट्स' खेळाडूंना राहण्याची सुविधा पुरवते, जिथे हाय-स्पीड इंटरनेट, विशेष गेमिंग खुर्च्या आणि संगणक उपकरणे उपलब्ध असतात.
हॉटेल कर्मचाऱ्यांच्या सांगण्यानुसार, हा तरुण या दोन वर्षांच्या काळात क्वचितच खोलीच्या बाहेर पडला असेल. त्याचे संपूर्ण जग त्या चार भिंतींच्या आत आणि संगणकाच्या पडद्यावरच मर्यादित होते. मात्र, जेव्हा तो दोन वर्षांनंतर खोलीबाहेर पडला आणि साफसफाईसाठी कर्मचारी आत गेले, तेव्हा त्यांना जे दृश्य दिसले ते कल्पनेपलीकडचे होते.
या खोलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर 'DefiantLs' नामक हँडलवरुन शेअर करण्यात आला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, संपूर्ण खोलीत साधारण एक मीटर उंचीपर्यंत कचऱ्याचा मोठा ढिगारा साचला होता. या कचऱ्यामध्ये खाद्यपदार्थांची पाकिटे, रिकाम्या बाटल्या, कॅन्स आणि ऑनलाइन मागवलेल्या जेवणाचे प्लास्टिक डबे यांचा समावेश होता.
हा कचरा इतका जास्त होता की, त्याखाली गेमिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या महागड्या खुर्च्या आणि टेबल पूर्णपणे गाडले गेले होते. तो तरुण त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बसून दोन वर्षे गेम कसा खेळत होता, याचेच आश्चर्य सर्वांना वाटत आहे. त्याने जेवण मागवण्यासाठी फूड ॲप्सचा वापर केला होता, पण रिकामी पाकिटे बाहेर टाकण्याऐवजी तो खोलीतच फेकून देत असे.
खोलीच्या मुख्य भागापेक्षाही भयंकर अवस्था बाथरुमची झाली होती. व्हिडिओत पाहायला मिळते की, बाथरुमच्या जमिनीवर शेकडो ओले टॉयलेट पेपर्स आणि वापरुन फेकलेल्या वस्तूंचा खच पडला होता. इतकेच नाही तर घाणीमुळे वॉशबेसिन आणि टॉयलेट सीट देखील कचऱ्याने पूर्णपणे झाकले गेले होते. त्या खोलीत दुर्गंधीचा इतका उग्र वास येत होता की, साध्या माणसाला तिथे एक क्षण उभे राहणेही कठीण झाले असते.
हॉटेल व्यवस्थापनाने सांगितले की, या खोलीची पूर्णपणे साफसफाई करण्यासाठी आणि ती निर्जंतुक करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सलग तीन दिवस मेहनत घ्यावी लागली. इतकी साफसफाई करुनही त्या खोलीचे मोठे नुकसान झाले असून पुन्हा नवीन पाहुण्यांसाठी ती खुली करण्यापूर्वी मोठी दुरुस्ती करावी लागणार आहे.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी हॉटेल प्रशासनावरही कडाडून टीका केली. अनेक वापरकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, "दोन वर्षे एक माणूस खोलीत बंद होता, तरीही व्यवस्थापनाला त्याच्या खोलीतून येणाऱ्या दुर्गंधीचा पत्ता कसा लागला नाही?" एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले की, "इतकी साफसफाई केल्यानंतरही कोणत्या ग्राहकाला या खोलीत राहायला आवडेल का?" तर दुसऱ्याने विचारले की, "हॉटेल कर्मचाऱ्यांनी दोन वर्षांत एकदाही खोलीची पाहणी का केली नाही?" यावर हॉटेल प्रशासनाचे म्हणणे आहे की, गेमरने अनेकदा कर्मचाऱ्यांना आत येण्यापासून रोखले.
मिळालेल्या माहितीनुसार, या गेमरने केवळ खोलीची नासधूसच केली नाही, तर त्याने त्याच्या शेवटच्या 10 दिवसांच्या मुक्कामाचे पैसेही दिलेले नाहीत. हे बिल सुमारे 300 पाऊंड (भारतीय चलनात सुमारे 30 हजार रुपयांहून अधिक) इतके आहे. ही घटना ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याचे एक भयानक उदाहरण ठरली. एका बाजूला गेमिंगची क्रेझ वाढत असताना, दुसरीकडे अशा प्रकारच्या घटना मानसिक आरोग्याबद्दल आणि सामाजिक जबाबदारीबद्दल मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. सध्या हे प्रकरण चीनमध्ये चर्चेचा विषय ठरले असून, हॉटेल उद्योगात अशा पाहुण्यांवर कडक निर्बंध आणण्याची मागणी केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.