Cadbury Chocolate History: 'कुछ मीठा हो जाये'मागची संघर्षकथा! कॅडबरीच्या जागतिक उद्योगप्रवासाचा रंजक उलगडा

Cadbury Business Journey: कॅडबरी चॉकलेटची चव सगळ्यांच्या जिभेवर रेंगाळत असली, तरी या गोड उद्योगाचा प्रवास मात्र अनेक खडतर प्रसंगांनी भरलेला आहे.
Cadbury Business Journey
Cadbury Chocolate HistoryDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सखाराम शेणवी बोरकर

कॅडबरी चॉकलेटची चव सगळ्यांच्या जिभेवर रेंगाळत असली, तरी या गोड उद्योगाचा प्रवास मात्र अनेक खडतर प्रसंगांनी भरलेला आहे. चॉकलेट म्हटलं की आबालवृद्धांना हमखास आठवण येते ती कॅडबरी चॉकलेटची.

‘कुछ मीठा हो जाये…’ ही कॅडबरीची जाहिरात अनेक वर्षांपासून लोकप्रिय आहे. चॉकलेटच्या या गोड चवीमागे एका उद्योगाचा संघर्षमय इतिहास दडलेला आहे. याच इतिहासाचा वेध घेणारं राजहंस प्रकाशनाने नुकतंच प्रकाशित केलेलं ‘कॅडबरी : एका गोड उद्योगाचा खडतर जगप्रवास’ हे पुस्तक वाचनात आलं. या पुस्तकाचे लेखक आहेत निकेतन तावडे.

Cadbury Business Journey
Goa Government Jobs: आठवी, दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी संधी! 12 हजार तरुणांना रोजगाराचे लक्ष्य; सरकार उभारणार 25 कौशल्य केंद्रे

निकेतन तावडे यांना चॉकलेट या विषयात विशेष रुची आहे. त्यांनी चॉकलेट अँड कन्फेक्शनरी या क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलं आहे. जर्मनी, फ्रान्स यांसारख्या युरोपीय देशांत चॉकलेटियर म्हणून काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. मात्र, स्वतःचा उद्योग सुरू करण्याची महत्त्वाकांक्षा असल्याने भारतात परतल्यावर त्यांनी २०१८ साली ‘Chocoeclate Pvt. Ltd.’ या कंपनीची स्थापना केली. चॉकलेट उद्योगाचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या लेखकाने या विषयाकडे केवळ व्यावसायिक नव्हे, तर अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून पाहिलं आहे.

‘कॅडबरी’ हे नाव खरं तर एका कुटुंबाचं आडनाव आहे. या उद्योगाची सुरुवात जॉन कॅडबरी यांच्यापासून झाली. कौटुंबिक व्यवसायाची पार्श्वभूमी असलेल्या जॉन कॅडबरी यांनी १८२४ मध्ये इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे किराणा मालाचं दुकान सुरू केलं. चहा, कॉफी यांसारख्या वस्तूंबरोबरच ते कोको आणि पिण्यासाठी तयार केलेलं चॉकलेटही विकत असत. पुढे कोकोच्या वाढत्या मागणीमुळे त्यांनी या व्यवसायाचा विस्तार केला. इथूनच कॅडबरीच्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात झाली.

मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील प्राचीन संस्कृतींमध्ये कोकोला विशेष महत्त्व होतं. कोकोच्या बियांपासून तयार होणारं कडवट पेय शक्तिवर्धक मानलं जायचं. पुढे युरोपीय व्यापाऱ्यांमार्फत कोकोच्या बिया आणि त्यापासून तयार केलेलं पेय युरोपात पोहोचलं. सुरुवातीला चहा-कॉफीप्रमाणेच कोकोचंही प्रामुख्याने पेय म्हणून सेवन केलं जायचं. त्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी त्यात साखर आणि दूध घालण्याचे, तसेच त्याला घट्ट स्वरूप देण्याचे प्रयोग सुरू झाले. या प्रयोगांतून चॉकलेटच्या चवीत आणि स्वरूपात बदल होत गेले.

कोकोचा इतिहास, त्याच्याशी संबंधित प्राचीन संस्कृती आणि ‘थिओब्रोमा’, ‘चॉकलेट’ यांसारख्या शब्दांची उत्पत्ती यांविषयीची माहिती पुस्तकात रंजकपणे मांडली आहे. युरोपात चॉकलेटची लोकप्रियता वाढत असताना अनेक उद्योजक या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत होते. या स्पर्धेतून चॉकलेट उद्योगाचा विस्तार झाला. कॅडबरी, नेस्ले, हर्शे, क्राफ्ट आणि लिंड्ट अशा आज प्रसिद्ध असलेल्या कंपन्यांच्या इतिहासातही या उद्योगाच्या विकासाचे वेगवेगळे टप्पे दिसून येतात. त्यामुळे हे पुस्तक केवळ एका कंपनीचा इतिहास सांगत नाही, तर एकूण चॉकलेट उद्योगाच्या वाटचालीवरही प्रकाश टाकतं.

Cadbury Business Journey
Goa Dairy Workers: थकीत 'डीए'सह मागण्या मान्य करा, गोवा डेअरी कर्मचाऱ्यांचे 'घोषणाबाजी आंदोलन'

या पुस्तकाची लेखनशैली हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. कंपनीचं नेतृत्व करणारे शेवटचे कॅडबरी बंधू एकमेकांशी गप्पा मारत आहेत, अशा स्वरूपात पुस्तकाची मांडणी केली आहे. कॅडबरीला व्यावसायिक स्पर्धा, बदलती बाजारपेठ, दोन महायुद्धांचे परिणाम, वैयक्तिक संकटं आणि कौटुंबिक अडचणी अशा अनेक आव्हानांना कंपनीला सामोरं जावं लागलं. या संकटांवर मात करत कॅडबरी कुटुंबातील चार पिढ्यांनी कंपनीच्या प्रगतीत कसं योगदान दिलं, याची माहिती पुस्तकात मिळते.

पुस्तकाच्या शेवटच्या भागात अमेरिकेतील क्राफ्ट फूड्स कंपनीने कॅडबरी कंपनीचं अधिग्रहण कसं केलं, याची माहिती दिली आहे. अखेर कॅडबरी कुटुंबाचं कंपनीवरील नियंत्रण संपलं आणि कंपनीच्या प्रवासाला नवं वळण मिळालं. पुढे क्राफ्ट फूड्सच्या व्यवसायाची पुनर्रचना होऊन २०१२ मध्ये मॉन्डेलेझ इंटरनॅशनल ही स्वतंत्र कंपनी अस्तित्वात आली.

‘कॅडबरी’चा भारतातील प्रवेश आणि येथील उद्योगविस्तार यांची माहितीही शेवटच्या प्रकरणात दिली आहे. त्यामुळे या जागतिक ब्रँडचा प्रवास भारतापर्यंत कसा पोहोचला, हेही समजतं.चॉकलेट उद्योगाचा इतिहास जाणून घेऊ इच्छिणाऱ्या वाचकांसाठी हे पुस्तक निश्चितच वाचनीय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.