

मडगाव: गोव्यातील सर्वांत जुन्या मठांपैकी एक असलेल्या श्री गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठाच्या उभारणीस यंदा ५५० वर्षे पूर्ण होत असल्याने २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान दहा दिवसांचा मोठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या दहा दिवसांत पर्तगाळी येथे एक लाखाहून अधिक भाविक उपस्थित रहाणार, अशी अपेक्षा आहे. २८ नोव्हेंबर रोजी श्रीरामाच्या भव्य मूर्तीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला २५ ते ३० हजार भाविक उपस्थित असतील, अशी अपेक्षा आयोजकांनी ठेवली आहे.
सध्या पर्तगाळी मठ परिसरात या उत्सवाची तयारी जोरात चालू असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या भाविकांची सोय करण्यासाठी वेगवेगळे मंडप आणि इतर तयारी चालू झाली आहे. या दहा दिवसांच्या उत्सवात दर दिवशी किमान दहा हजार लोकांची उपस्थिती असणार अशी आयोजकांनी खात्री व्यक्त केली आहे.
या दहा दिवसांच्या ५५० व्या वर्धापनदिन कार्यक्रमाला देशभरातील विविध मठाचे मठाधिपती उपस्थित राहून धार्मिक विधीत सहभागी होणार आहेत. यामध्ये पालमरू मठाचे मठाधिपती श्रीमद् विद्याधिराजेश्वर तीर्थ स्वामीजी, काशी मठाधीश श्रीमद् सम्यामिंद्रा तीर्थ स्वामीजी, श्री संस्थान गौडापादाचार्य कवळे मठाधीश श्रीमद् शिवानंद सरस्वती स्वामीजी, चित्रापूर मठाधीश श्रीमद् सद्यज्योत शंकराश्रम स्वामीजी यांची उपस्थिती राहणार आहे. वेगवेळ्या धार्मिक विधीत त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या ५५० वर्षपूर्तीच्या सोहळ्यानिमित्त पर्तगाळी मठ परिसरात उभारण्यात येणारी ७७ फूट उंच श्रीराम मूर्ती हे खास आकर्षण ठरणार असून दक्षिण भारतातील ही सर्वांत मोठ्या उंचीची श्रीराम मूर्ती ठरणार आहे.
सध्या ही मूर्ती कर्नाटकात टप्प्या टप्प्याने तयार केली जात असून त्या मूर्तीचे भाग पर्तगाळी येथे आणून बसविण्याचे काम चालू आहे. २० नोव्हेंबरपर्यंत ही मूर्ती पूर्णपणे उभी केली जाणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी याच मूर्तीचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण केले जाणार आहे.
सार्थ पंचशताब्दी महोत्सवानिमित्ताने २७ रोजी पालिमारू मठाधीश प. पू. श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामीजी आणि त्यांचे पट्टशिष्य श्रीमद् विद्याराजेश्वरतीर्थ स्वामीजी, तर ४ डिसेंबर रोजी कवळे मठाधीश श्रीमद् शिवानंद सरस्वती स्वामीजी आणि श्री चित्रापूर मठाधीश श्रीमद् सद्योजत शंकराश्रम स्वामीजी उपस्थित राहणार आहेत.
२७ व २८ रोजी सकाळी ६.३० ते ७.३० पर्यंत शिबिकोत्सव., २९ रोजी राम कल्याणोत्सव आणि श्रीराम पट्टाभिषेक महोत्सव, २ रोजी द्वादशा स्तोत्र पूजा, ३ रोजी मखरोत्सव, ४ रोजी शिबिकोत्सव, ५ रोजी नौकाविहार, ७ रोजी शिबिकोत्सव आणि अष्टावधान सेवा होईल., त्याशिवाय ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १० पर्यंत मठ प्राकारात वृक्षारोपण, ५ रोजी योग शिबिर, ६ रोजी रक्तदान शिबिर, ७ रोजी वैद्यकीय शिबिर, ८ रोजी स्वच्छ पर्तगाळी अभियान, २८ रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते श्रीराम मूर्तीचे अनावरण.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.