
Kolkata Birthday Party Sexual Assault: कोलकातामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका पॉश परिसरात एका 20 वर्षीय तरुणीसोबत तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी तिच्या दोन मित्रांवरच हा सामूहिक बलात्काराचा आरोप करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (6 सप्टेंबर, 2025) शहरातील रीजेंट पार्क परिसरात घडली. या घटनेमुळे कोलकाता शहरात महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी हरिदेवपूरची रहिवासी आहे. तिने केलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी तिचा वाढदिवस होता. तिचा मित्र चंदन मलिक याने वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने तिला त्याचा दुसरा मित्र दीपच्या घरी नेले. आरोपी (Accused) चंदन आणि दीप पीडितेला रीजेंट पार्क येथील दीपच्या फ्लॅटवर घेऊन गेले. तिथे त्यांनी एकत्र जेवण केले आणि वाढदिवस साजरा केला. मात्र, पार्टी संपल्यानंतर जेव्हा पीडितेला घरी परतायचे होते, तेव्हा आरोपींनी तिला थांबवले. त्यांनी खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
पोलीस (Police) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री पीडित तरुणीला त्याच घरात जबरदस्तीने ठेवण्यात आले. शनिवारच्या सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास ती कशीबशी पळून जाण्यात यशस्वी झाली. घरी परतल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून शनिवारीच एफआयआर दाखल केला. पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरु केला.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने तिच्या तक्रारीत म्हटले की, तिची चंदनसोबत काही महिन्यांपूर्वीच ओळख झाली होती. चंदनने स्वतःची ओळख दक्षिण कोलकात्यातील एका मोठ्या दुर्गा पूजा समितीचा प्रमुख म्हणून दिली होती. चंदनच्या माध्यमातूनच तिची ओळख दीपशी झाली आणि त्यानंतर तिघेही मित्र बनले. तिघांमध्ये नेहमीच संवाद व्हायचा आणि भेटीगाठीही होत असत. या दोन्ही आरोपींनी तिला त्यांच्या पूजा समितीत सामील करुन घेण्याचे आश्वासनही दिले होते, असेही पीडितेने आपल्या तक्रारीत नमूद केले.
दरम्यान, ही घटना अशा वेळी समोर आली, जेव्हा कोलकाता शहराला महिलांसाठी एक सुरक्षित शहर मानले जाते. मात्र, रीजेंट पार्कसारख्या उच्चभ्रू परिसरात अशी घटना घडल्यामुळे समाजाला मोठा धक्का बसला आहे. सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे, हा गुन्हा अनोळखी व्यक्तींनी नाही, तर पीडितेच्या ओळखीच्या आणि विश्वासपात्र मानलेल्या मित्रांनीच केला आहे. या घटनेमुळे मैत्री, विश्वास आणि सुरक्षिततेच्या संकल्पनांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अशा प्रकारच्या घटना पुन्हा-पुन्हा समोर येत असल्याने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आरोपी सरकारी कर्मचारी असल्याने या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे. पोलिसांनी फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी समाजातर्फे जोर धरत आहे. कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी व्हावी आणि महिलांना कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित वाटावे, यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.