

Viral Video Of Old Man Bike Stunt: सोशल मीडियावर मनोरंजक व्हिडिओसोबत अनेकदा अजब आणि धक्कादायक गोष्टीही व्हायरल होतात. रस्त्यावरुन प्रवास करताना अनेकदा आपल्याला अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, ज्या लोकांना विचार करायला भाग पाडतात. काही लोक अशा गोष्टी पाहून आपल्या मार्गाने निघून जातात, तर काही जण त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करतात. सध्या असाच एक अजब आणि काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका बाबांनी बाईक चालवताना केलेले स्टंट पाहून लोक चक्रावून गेले.
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक वृद्ध बाबा बाईकवरुन कुठेतरी जात असल्याचे दिसत आहे, परंतु त्यांची बाईक चालवण्याची पद्धत अत्यंत धोकादायक आणि थरारक आहे. हे बाबा बाईकवर अत्यंत आरामात आणि बिनधास्तपणे बसले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्यांचा एक पाय बाईकच्या सीटवर आहे, तर दुसरा पाय अॅक्सिलेटर देण्याच्या हँडलवर आहे. एवढेच नाही तर त्यांनी आपले दोन्ही हात आरामात गुडघ्यांवर ठेवले असून बाईकचे हँडल अजिबात पकडलेले नाही. कोणत्याही अपघाताची भीती न बाळगता ते इतक्या आत्मविश्वासाने आणि आरामात गाडी चालवत आहेत की, जणू काही बाईक चालवण्याची हीच खरी पद्धत आहे.
हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर 'bittu_22k' नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) येताच लोकांनी तो मोठ्या प्रमाणात पाहायला आणि लाईक करायला सुरुवात केली असून आतापर्यंत 20 हजारांहून अधिक युजर्संनी या व्हिडिओला लाईक केले. बाबांचा हा खतरनाक स्टंट पाहून नेटकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत त्यांना चांगलेच ट्रोल केले. एका युझरने उपरोधाने लिहिले की, ही बाबांची 'कोअर ड्रायव्हिंग स्किल' आहे. दुसऱ्या युझरने कमेंट केली की, बाबा सध्या त्यांच्या वेगळ्याच तपस्येत मग्न आहेत.
बाबांच्या या धाडसाला डिजिटल युगाशी जोडत एका युझरने त्यांना 'टेस्ला बाबा' असे नाव दिले, कारण टेस्ला कार ऑटो-पायलट मोडवर चालतात आणि बाबांनीही बाईक ऑटो-पायलटवर टाकली. तर एकाने लिहिले की, बाबा सध्या पूर्णपणे चिल मूडमध्ये आहेत. या स्टंटवर चिंता व्यक्त करताना एका युझरने अतिशय गंभीर टोमणा मारला की, बाबांचे थेट यमराजासोबत उठणे-बसणे दिसते आहे. तर दुसऱ्या एका युझरने संताप व्यक्त करत लिहिले की, हे बाबा स्वतः मरणार नाहीत, पण रस्त्यावरुन जाणाऱ्या एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव नक्की घेतील. अनेक युजर्संनी यावर हसण्याचे इमोजी पोस्ट केले असले, तरी महामार्गावरील असे जीवघेणे स्टंट कोणत्याही मोठ्या अपघाताला आमंत्रण देऊ शकतात, हे मात्र नक्की.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.