

रेल्वे स्थानक म्हटलं की गर्दीने भरलेले प्लॅटफॉर्म, चहा विक्रेत्यांचा गजबजाट, हातात सामान घेऊन धावपळ करणारे प्रवासी आणि गाडीची वाट पाहणारी माणसं असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने हे चित्रच बदलून टाकले आहे. या व्हिडिओमध्ये रेल्वे स्थानकावर प्रवाशांऐवजी म्हशी मुक्तपणे फिरताना, तर ट्रेनच्या डब्यात बकऱ्या सीटवर आरामात बसलेल्या दिसत असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ बिहारमधील छपरा रेल्वे स्थानकाचा असल्याचे सांगितले जात असून, त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
प्लॅटफॉर्मवर म्हशींचा मुक्त संचार
व्हिडिओच्या सुरुवातीलाच रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर अनेक म्हशी निवांत फिरताना दिसतात. आसपास रेल्वेची वर्दळ असतानाही त्या कोणत्याही भीतीशिवाय वावरताना दिसतात. हा प्रकार पाहून तेथील काही प्रवासी आश्चर्यचकित झाले, तर अनेकांनी मोबाईलमध्ये हा क्षण कैद केला. नेहमी गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर जनावरांचा असा मुक्त वावर पाहून अनेकांना धक्का बसला.
ट्रेनच्या सीटवर बकऱ्यांचा मुक्काम
व्हिडिओतील सर्वात लक्षवेधी दृश्य म्हणजे ट्रेनच्या जनरल डब्यातील. ज्या डब्यात साधारणपणे उभे राहायलाही जागा मिळत नाही, त्याच डब्यात दोन बकऱ्या आरामात सीटवर बसलेल्या दिसतात. त्या खिडकीजवळ शांतपणे बसलेल्या असून, जणू त्या देखील प्रवासाचा आनंद घेत असल्याचे चित्र पाहायला मिळते. विशेष म्हणजे, आजूबाजूचे प्रवासीही या दृश्याकडे हसत पाहताना दिसतात.
सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हा प्रकार ग्रामीण जीवनशैलीशी जोडत मजेशीर प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. एका नेटकऱ्याने, "बकऱ्यांचं तिकीट कन्फर्म असावं, म्हणूनच सीट मिळाली," अशी मिश्कील टिप्पणी केली. तर दुसऱ्याने, "त्यांनाही त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचायचं आहे," असे लिहित हशा पिकवला.
व्हिडिओची सत्यता स्पष्ट नाही
हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत असला तरी तो नेमका कधीचा आहे किंवा कोणत्या परिस्थितीत चित्रीत करण्यात आला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे त्यातील दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. मात्र, प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या म्हशी आणि ट्रेनच्या सीटवर बसलेल्या बकऱ्यांचे दृश्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले असून, लाखो लोक हा व्हिडिओ पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.