
Jagdeep Dhankhar Resigns: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा तात्काळ प्रभावाने राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात, आरोग्य संबंधी कारणे आणि वैद्यकीय सल्ल्याचा हवाला देत राज्यघटनेच्या कलम 67(A) अंतर्गत आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.
राष्ट्रपती मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात धनखड यांनी म्हटले की, "आरोग्याला प्राधान्य देत आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत मी भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा तात्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे." त्यांनी राष्ट्रपतींचे त्यांच्या सहकार्याबद्दल आणि सलोख्याच्या संबंधांबद्दल आभार मानले. तसेच, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचेही त्यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.
धनखड यांनी आपल्या पत्रात पुढे लिहिले की, "मला संसदेच्या सर्व माननीय सदस्यांकडून प्रेम, विश्वास आणि सन्मान मिळाला." उपराष्ट्रपती म्हणून आपला कार्यकाळ आठवताना ते म्हणाले की, "या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मिळालेला अनुभव आणि दृष्टीकोनांसाठी मी अत्यंत कृतज्ञ आहे. भारताच्या आर्थिक विकासाचा आणि अभूतपूर्व परिवर्तनाच्या काळाचा साक्षीदार होणे हे माझ्यासाठी सौभाग्य आणि समाधानाची बाब राहिली." भारताच्या जागतिक उदयावर आणि उज्ज्वल भविष्यावर त्यांचा अतूट विश्वास व्यक्त करत धनखड आपले त्यागपत्र पूर्ण केले.
जगदीप धनखड यांच्या आधी आणखी दोन उपराष्ट्रपती असे होते, ज्यांनी आपला पूर्ण कार्यकाळ पूर्ण केला नाही.
कृष्णकांत: त्यांनी 21 ऑगस्ट 1997 रोजी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली होती, परंतु 27 जुलै 2002 रोजी कार्यकाळातच त्यांचे निधन झाले.
वराहगिरी वेंकट गिरी (व्ही.व्ही. गिरी): यांनीही 1969 मध्ये उपराष्ट्रपती म्हणून आपल्या कार्यकाळात राजीनामा दिला होता, जेणेकरुन ते राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू शकतील.
जगदीप धनखड यांनी 2022 मध्ये भारताचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. 6 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत त्यांनी विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला होता. धनखड यांना एकूण 725 पैकी 528 मते मिळाली होती, तर मार्गारेट अल्वा यांना 182 मते मिळाली होती.
उपराष्ट्रपती बनण्यापूर्वी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. जगदीप धनखड यांचा जन्म 18 मे 1951 रोजी राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण गावातील शाळेतूनच पूर्ण केले. त्यानंतर शिष्यवृत्ती मिळवून चितोडगड सैनिक शाळेत शिकायला गेले. धनखड यांची निवड नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्येही झाली होती, परंतु तिथे ते गेले नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.