

Arunachal Pradesh Truck Accident: अरुणाचल प्रदेशातील अंजॉ जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. हैयूलियांग-चगलागाम या भारत-चीन सीमा मार्गावर मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रक अचानक नियंत्रण सुटून अत्यंत खोल दरीत कोसळला. या ट्रकमध्ये एकूण 21 मजूर प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातात 17 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, घटनेची गंभीरता लक्षात घेता तातडीने जिल्हा प्रशासनाने बचाव पथकांना घटनास्थळाकडे रवाना केले. सीमावर्ती भागात सुरु असलेल्या महत्त्वाच्या रस्ते बांधकाम प्रकल्पासाठी मजूर जात असताना हा अपघात झाला. या दुर्घटनेमुळे सीमावर्ती भागांमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अंजॉ जिल्ह्याचे उपायुक्त मिलो कोजिन (Milo Kojin) यांनी या भीषण अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, हा अपघात एका अतिशय धोकादायक आणि अरुंद डोंगराळ वळणावर झाला. कोजिन यांनी माहिती दिली की, हा रस्ता खूप अरुंद असून अनेक ठिकाणी तीव्र उतार आहेत. अशा भागांमध्ये वाहनांवरचे नियंत्रण सुटणे सामान्य आहे. अपघात होताच, परिसरातील स्थानिक गावकऱ्यांनी सर्वप्रथम घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरु केले. त्यानंतर पोलीस, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन आणि लष्कराची पथकेही बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली.
दोनशे ते तीनशे फूट खोल दरीमध्ये ट्रक कोसळल्यामुळे बचाव कार्यामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रक पूर्णपणे क्षतिग्रस्त झाला आहे. अनेक मजुरांचे मृतदेह दरीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अडकले आहेत. दरीत खोलवर अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकांना बराच वेळ लागत आहे.
दुसरीकडे, स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की मृत मजुरांचे मृतदेह दरीत अनेक ठिकाणी विखुरलेले आढळले आहेत. हा परिसर त्याच्या अवघड भौगोलिक परिस्थितीसाठी ओळखला जातो. भारत-चीन सीमारेषेशी जोडलेल्या रस्ते प्रकल्पांवर काम करणाऱ्या मजुरांना दररोज अशाच धोकादायक मार्गांवरुन प्रवास करावा लागतो. खराब हवामान, भूस्खलन आणि अरुंद रस्ते अनेकदा अशा अपघातांना कारणीभूत ठरतात.
प्रशासनाने आता या अपघाताची कसून चौकशी सुरु केली आहे. ट्रक वेगाने होता, चालकाला झोप लागली होती की रस्त्याच्या खराब स्थितीमुळे हा अपघात झाला, याचा तपास प्रशासन करत आहे. प्रशासनाने अपघातातील पीडित मजुरांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधायला सुरुवात केली असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या भीषण दुर्घटनेमुळे सीमावर्ती भागात सुरु असलेल्या विकास कामांचे महत्त्व आणि मजुरांच्या सुरक्षेचे आव्हान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.