"लडकी हूॅं लड सकती हूँ": काँग्रेससह सर्वपक्षीय महिलांनी दाखवून दिलं...

पाच राज्यांमध्ये निवडणूक लढविलेल्या महिलांच्या कामगिरीचा हा आढावा.
Assembly Election 2022
Assembly Election 2022Dainik Gomantak

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत विविध पक्षांच्या तिकिटावर उभ्या असलेल्या काही महिला उमेदवारांनी भरभरून यश मिळविले. अनेक जणींनी प्रतिस्पर्ध्यांना जोरदार लढत दिली तर काहींच्या पदरी निराशाही आली. या पाचही राज्यात काही निवडक महिलांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. पाच राज्यांमधून निवडणूक लढविलेल्या महिलांच्या कामगिरीचा हा आढावा. (Assembly Election 2022)

  • उत्तर प्रदेश

अदितीसिंह: काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अदितीसिंह यांनी रायबरेली मतदारसंघातून विजय मिळविला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या रायबरेली सदर विधानसभा निवडणुकीत अदितीसिंह यांनी समाजवादी पक्षाचे राम प्रतापसिंह यांचा सात हजार 175 मतांनी पराभव केला. अदितीसिंह या काँग्रेसचे दिवंगत नेते अखिलेश सिंह यांच्या कन्या आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबरोबरील छायाचित्रामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.

रूपाली दीक्षित : समाजवादी पक्षाच्या आग्र्यातील फतेहाबाद मतदारसंघातील उमेदवार रूपाली दीक्षित यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपचे छोटे लाल वर्मा यांनी त्यांना 53 हजार 392 मतांनी हरविले. आग्र्याचे ‘बाहुबली’ अशोक दीक्षित यांच्या त्या कन्या आहेत. रूपाली यांनी लंडनमधून एमबीए केले आहे. त्यानंतर दुबईमधील बहुराष्ट्रीय कंपनीत त्यांनी नोकरी केली आहे.

पल्लवी पटेल : सिराथू मतदारसंघातून अपना दल कमेरावादी (समाजवादी पक्षाच्या आघाडीतील पक्ष) पक्षाच्या उमेदवार पल्लवी पटेल यांनी भाजपचे दिग्गज नेते व उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना धूळ चारली. पल्लवी पटेल या केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या बहीण आहेत.

उरुसा राणा: प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांची मुलगी उरुसा राणा उन्नावमधील पुरवा मतदारसंघातून उभ्या होत्या. येथे भाजपचे अनिल कुमारसिंह यांनी विजय मिळविला आहे.

रिचा सिंह: अलाहाबाद पश्‍चिम जागेवर उत्तर प्रदेशचे मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी रिचा सिंह यांचा पराभव केला आहे. अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या अध्‍यक्षा असताना रिचा यांनी 2016 मध्ये भाजपचे तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ यांच्या विद्यापीठ दौऱ्याला विरोध केला होता. त्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला होता.

मृगांका सिंह: पश्‍चिम यूपीतील हॉट सीट असलेल्या कैरानात ‘सप’च्या नाहीद हसन यांनी बाजी मारली. भाजपच्या उमेदवार मृगांका सिंह यांचा त्यांनी 18 हजार मतांनी पराभव केला. भाजपचे दिवंगत खासदार हुकूमसिंह यांच्या त्या कन्या आहेत.

अर्चना गौतम: काँग्रेसने हस्तिनापूर मतदारसंघातून अर्चना गौतम यांना तिकीट दिले होते. ‘बिकीनी गर्ल’ अशी ओळख असलेल्या गौतम यांची निवडणुकीतील कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. ही जागा भाजपचे दिनेश खटीक यांनी जिंकली.

आशा सिंह: उन्नाव बलात्कार घटनेतील पीडितेची आई आशा सिंह यांना उन्नाव सदर मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी दिली होती. पण राजकारणात त्यांना सहानुभूती मिळाली नाही. येथे भाजपचे पंकज गुप्ता यांनी त्यांचा पराभव केला. सिंह यांना केवळ 957 मते मिळाली आहेत.

Assembly Election 2022
Goa Election: मतांच्या टक्केवारीत 'आरजी' पक्ष राज्यात तिसऱ्या क्रमांकावर
  • उत्तराखंड

ऋतू खंडुरी: उत्तराखंडमधील कोटद्वार या प्रतिष्ठित जागेवर भाजपचे माजी मुख्यमंत्री भुवनसिंह खंडुरी यांच्या कन्या ऋतू खंडुरी यांनी काँग्रेसच्या सुरेंद्र सिंह नेगी यांचा तीन हजार 479 मतांनी पराभव केला.

अनुपमा रावत: माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांच्या कन्या व काँग्रेसच्या उमेदवार अनुपमा रावत यांनी हरिद्वार ग्रामीण मतदारसंघातून विजय मिळविला आहे. भाजपचे यतीश्‍वरानंद यांचा त्यांनी पराभव केला.

अनुकृती गोसेन- रावत: काँग्रेसचे माजी कॅबिनेट मंत्री हरक सिंह रावत यांच्या सून अनुकृती गोसेन यांना काँग्रेसने लॅन्सडाउन मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. भाजपचे दिलीपसिंह यांच्याकडून त्यांना हार पत्करावी लागली. अनुकृती यांनी ‘मिस इंडिया ग्रँड इंटरनॅशनल’ हा किताब जिंकला होता.

  • पंजाब

जीवनज्योत कौर: अमृतसर पूर्वमधून आम आदमी पक्षाच्या जीवनज्योत कौर यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते नवज्योत सिंग सिद्धू व शिरोमणी अकाली दलाचे नेते विक्रमसिंह मजेठिया यांना धूळ चारली.

मालविका सूद: अभिनेता सोनू सूद याची बहीण मालविका सूद यांना काँग्रेसने मोगातून उभे केले होते. पण त्यांना ‘आप’च्या उमेदवार डॉ. अमनदीप कौर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

Assembly Election 2022
गोवा विकासाच्या बाबतीत कसर करु नका; अन्यथा रस्त्यावरती उतरु
  • गोवा

दिव्या राणे: पर्ये मतदारसंघात भाजपच्या दिव्या राणे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळविला आहे. काँग्रेसचे रणजित जयसिंहराव राणे यांचा पराभव त्यांनी केला. गोव्याचे आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांच्या त्या पत्नी आहेत.

दिलायला लोबो: शिवोलीतून कॉंग्रेसच्या (Congress) तिकीटावर दिलायला लोबो यांना निवडून आणण्यात इतिहास घडविण्यात लोबो यशस्वी ठरले आहेत. शिवोलीचे माजी आमदार तसेच मंत्री राहिलेल्या विनोद पालयेकर यांना त्यांच्याच गोवा फॉरवर्डने (Goa Forward Party) तिकीट नाकारल्याने स्वबळावर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागलं.

अन्य विजयी महिला उमेदवार

उत्तर प्रदेश: बेबी राणा मौर्य, मनीषा (भाजप), सईदा खातून, महराजी प्रजापती, (समाजवादी पक्ष).

पंजाब: अरुणा चौधरी (काँग्रेस) बलजिंदर कौर (आप)

अन्य पराभूत उमेदवार

उत्तर प्रदेश: पंखुडी पाठक, लुईस खुर्शिद, निदा अहमद, सफद जफर (सर्व काँग्रेस), पूजा शुक्ला, सुभावती शुक्ला, काजल निषाद (समाजवादी पक्ष), चंद्रवती वर्मा (सप-राष्ट्रीय लोक दल आघाडी).

उत्तराखंड: गोदावरी थापली (काँग्रेस).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com