

Telangana Ganesh Immersion Accidents 2026: तेलंगणात गणपती विसर्जनादरम्यान घडलेल्या विविध दुर्देवी घटनांमध्ये 13 लोकांचा मृत्यू झाला, तर सुमारे 26 जण गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एका सबइन्स्पेक्टरचाही समावेश आहे. तेलंगणाचे पोलीस महासंचालक सीव्ही आनंद यांनी या जीवितहानीची पुष्टी केली. राज्यभरात प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त आणि सुरक्षेचे उपाययोजना करण्यात आल्या होत्या, कारण अधिकृत आकडेवारीनुसार केवळ मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या सुमारे 1.24 लाख गणेशमूर्ती स्थापित करण्यात आल्या होत्या, तर घरगुती व सोसायट्यांमधील मूर्ती धरुन हा आकडा तब्बल 4 लाखांच्या घरात पोहोचत होता.
दरम्यान, सर्वात मोठी आणि हृदयद्रावक घटना तेलंगणातील (Telangana) संगारेड्डी जिल्ह्यातील पेद्दाकंजेरला गावात घडली. या ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले शिरीषा चॅरिटेबल ट्रस्टचे सहा विद्यार्थी एका तलावात विसर्जनासाठी गेले असताना अचानक पाय घसरुन पाण्यात बुडाले. या दुर्देवी घटनेत सर्व सहा विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या सहा विद्यार्थ्यांच्या अकाली मृत्यूवर शोक व्यक्त केला.
याशिवाय, रंगारेड्डी जिल्ह्यातील शंकरपल्ली येथेही एक मोठी दुर्घटना टळली. येथील फतेहपुरच्या जुन्या मुसी पुलावरुन काही जण मूर्ती विसर्जन करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक एक तरुण मूर्तीसह थेट नदीत पडला. मात्र, सुदैवाने काही वेळातच तो सुरक्षित बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु, याच शंकरपल्ली मंडलात विसर्जन मिरवणुकीदरम्यान एका उड्डाणपुलावरुन खाली पडून एक तरुण गंभीर जखमी झाल्याची आणखी एक घटना समोर आली, ज्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अशा गर्दीच्या आणि संवेदनशील प्रसंगी सुरक्षेचे नियम पाळणे किती गरजेचे आहे, हे या घटनांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करुनही विसर्जनादरम्यान झालेल्या या वेगवेगळ्या अपघातांमुळे संपूर्ण तेलंगणात हळहळ व्यक्त होत असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.