West Indies vs India, 2nd Test 3rd Day Report: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल येथे गुरुवारपासून (20 जुलै) दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याचा शनिवारी तिसरा दिवस होता. या दिवशी खेळ सुरु झाल्यानंतर काही वेळातच पावसाचा अडथळा आल्याने बराच वेळ खेळ थांबला होता. पण पाऊस थांबल्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला.
तिसऱ्या दिवसाखेर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 108 षटकात 5 बाद 229 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजकडून एलिक अझानाझ 37 धावांवर आणि जेसन होल्डर 11 धावांवर नाबाद खेळत आहेत. तसेच भारत अद्याप 209 धावांनी आघाडीवर आहे.
या सामन्यात तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजने 42 षटकापासून आणि 1 बाद 86 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. यावेळी वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटने 37 धावांपासून आणि किर्क मॅकेन्झीने 14 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली.
तिसऱ्या दिवशीही या दोघांनी वेस्ट इंडिजला चांगली सुरुवात करून दिली. त्यांच्या भागीदारीमुळे वेस्ट इंडिजने 100 धावांचा आकडा सहज पार केला. पण, ही भागीदारी रंगत असतानाच मॅकेन्झीला 32 धावांवर मुकेश कुमारने बाद केले. ही त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली विकेट ठरली.
विशेष म्हणजे याच सामन्यातून मॅकेन्झी आणि मुकेश दोघांनी पदार्पण केले आहे. त्यानंतर पावसाने बराच वेळ थांबला.
नंतर पुन्हा सामना सुरु झाल्यानंतर ब्रेथवेटला जर्मेन ब्लॅकवूडने साथ दिली. यादरम्यान ब्रेथवेटने अर्धशतकही पूर्ण केले. पण ब्रेथवेटचा अडथळा 73 व्या षटकात आर अश्विनने दूर केला. 235 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 75 धावांवर खेळणाऱ्या ब्रेथवेटला अश्विनने त्रिफळाची केले.
काहीवेळात ब्लॅकवूडही 92 चेंडूत 20 धावांवर बाद झाला. तसेच यष्टीरक्षक फलंदाज जोशुआ डा सिल्वालाही काही खास करता आले नाही. तो 10 धावांवर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. अखेरीस अझानाझ आणि जेसन होल्डरने आणखी पडझड होऊ दिली नाही.
भारताकडून पहिल्या डावात रविंद्र जडेजाने 2 विकेट्स घेतल्या आहेत, तसेच मोहम्मद सिराज, आर अश्विन आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
तत्पुर्वी या सामन्यात भारताने पहिल्या डावात 128 षटकात सर्वबाद 438 धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.